मनाची स्थित्यंतरं..!

युवा विवेक    17-Jul-2024
Total Views |


विंडोग्रीलच्या तावदानातून डोळ्यावर येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे मगाशी जाग आली. बराचवेळ स्लॅबला केलेल्या डिझाईनमध्ये खेळत असलेल्या पालींना बघून झालं. आज काही अंथरुणातून उठण्याचा विचार नाहीये. एकटं असलं की हे छान असतं निवांत आयुष्य, निवांतवेळी कितीही वेळ आपण अंथरुणात पडून राहू शकतो.

मला हे हिवाळ्याच्या शेवटच्या काही महिन्यांतील अन् उन्हाळ्याची चाहूल लागणारे हे काही दिवस भयंकर अस्वस्थ करून जातात. आयुष्यात एक हळुवार पण नकळत या काही दिवसांत वाट्याला येऊन जातं.

विंडोग्रीलला लावलेले पांढऱ्या पडद्याचे कर्टन, भिंतीला असलेला डार्क पांढरा रंग अन् आयुष्यात असलेलं हळुवारपण. वॉश बेसिनमधील ठीबकत असलेला नळ त्या वॉश बेसिनचा एक लयीत एकाही मायक्रो सेकंदाची चूक न होता बरोबर नळातून ठीबकत असणारा थेंब.

अंथरुणाच्या बाजूला असलेल्या तीपाईवर ठेवलेला कॉफीचा मग नियमित तिथं कॉफी मग ठेऊन त्या तीपाईवर कॉफीची तयार झालेली वर्तुळे. तिथं कित्येक दिवसांची वाचून तशीच ठेऊन दिलेली पुस्तकं. अधूनमधून मित्र फ्लॅटवर आले की त्यांचं सिगारेट ओढणे, त्यामुळे माझ्यासारख्या कधीही सिगारेट न पिणाऱ्याच्या फ्लॅटवर सिगारेटच्या थोटकांनी भरभरून वाहत असलेला अॅश ट्रे.

दररोज कॉफीचा भरलेला मग दिवसांतून पाच-सहा वेळा ओठाला लावणं, तिला शरीराच्या आत रिचवत राहणं. जसं एखाद्या मैत्रिणीला अवेळी सोबत करणं अन् तिच्या अंगाला असलेल्या परफ्यूमचा गंध पुढे दोन-चार दिवस आपल्या शरीरावर, कपड्यांवर,फ्लॅटवर अन् अगदीच मनात दरवळत राहणं. अगदी तसंच कॉफीचं आहे, तिचा मंद हवाहवासा दरवळ माझ्या आत इतका भिनला आहे की, माझ्या घामालासुद्धा कॉफीचा गंध येतो. असो ती कॉफीसुद्धा अवेळी सोबत करणाऱ्या त्या मैत्रिणीपेक्षा किंचित स्ट्रोंग आहे.

फ्लॅटवर अस्तव्यस्त पडलेली पुस्तकं, विंडोग्रीलच्या तावदनातून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने तिपाईच्या खालच्या कप्प्यात ठेवलेल्या पेपरची होणारी फडफड. अर्धवट वाचून सोडून दिलेल्या पुस्तकांच्या बाहेर डोकवणारी पाने त्यांना एकदा कवेत घेण्यासाठी होत असलेला त्यांचा आग्रह.

काही वेळापूर्वी मनोज सारंगांच्या वाचलेल्या कविता, त्यांचं मनावर दाटून आलेलं मळभ. हल्ली पुस्तकं जगायला शिकवतात हे वाक्य मला खोटं वाटू लागलं आहे. ती पुस्तकं माझ्या आत मलाच खात राहतात, कदाचित माणूस होण्याची ही सुद्धा एक निरंतर आयुष्यभर घडणारी प्रोसेस असावी.

नोटपॅडवर शेवटचं मैत्रिणीनं चौदा- पंधरा दिवसांपूर्वी लिहून ठेवलेलं पत्र कित्येकदा वाचून झालं. दोन-तीनवेळा तिच्या जगण्याची गणितं जुळवून झालं. आयुष्याला घेऊन जगण्याची तिची थिअरी किती वेगळी आहे, माझ्या आयुष्याला जोडून मी मनाला सावरण्यासाठी मग मीच कित्येकदा हे सगळं मलाच शून्यापासून एक्सप्लेन करून झालं.

आयुष्यात पुस्तकांच्या समवेत शांत वाटण्याचा अन् फार काही जगण्यासाठी अपेक्षा नसलेला हा प्रवास किती दिवस चालायचं कळत नाहीये. एखादं पुस्तक याचं उत्तरही देत नाहीये अन् दिलं तरी ते मला जाणून घेण्यात स्वारस्य नाहीये.

मगाशी उठलो बराचवेळ बाल्कनीत खेळत असलेला पेपर आत घेऊन आलो, तो चाळून घेतला. आयुष्य जिच्या लेखनामुळे बेफिकीर वाटते ती आपली क्रश भासावी अशी "गौरी देशपांडे" यांचा एक लेख वाचून घेतला. पुन्हा कॉटवर निवांत झोकून दिलं, गौरी देशपांडेसारखी मैत्रीण तिच्या पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्यात आहे त्यामुळं आयुष्य थोडं सेक्यूअर वाटतं. तिच्या लेखनाबद्दल विचार करत बसलो अन् "विलास सारंग" यांच्या कवितांनी आलेला हँगओव्हर काही अंशी कॉफीतून उतरला.

वॉश बेसिनमध्ये ठीबकणारा नळ आताश्या शांत झाला आहे. कारण वॉश बेसिन कॉफीच्या भांड्यानी तुंबले आहे. ती धुवून घ्यावी आता उठायला हवं. आजच्या दिवसाची सुरुवात शिशिराच्या ऋतूत झाडांची पानगळ व्हावी तशी झाली आहे. का माहित नाही, आज बऱ्याच काही गोष्टी आठवून जात आहे. तूर्त सावरायला हवं दुपार ढळून जाईल तेव्हा उन्हं ओसरीला आलेली असेल. लॅपटॉपवर पुन्हा घेतलेलं काम करायची वेळ आलेली असेल.

भारत लक्ष्मण सोनवणे