नवनिर्मितीची ओढ..

युवा विवेक    13-Jul-2024
Total Views |


नवनिर्मितीची ओढ..

मानवी जीवन इतर सजीवांपेक्षा काहीसे वेगळे आहे. भावभावना सर्वच सजीवांमधे असतात. पण त्या प्रकट करण्याची शक्ती म्हणा किंवा प्रेरणा म्हणा ती माणसाला निसर्गतः इतर सजीवांपेक्षा अधिक असते. आपल्या भावना आणि विचार तो दुस-या माणसाला कायमच वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतो. दुस-याचे विचार तो त्यावर जाणून घेत असतो. या वैचारिक देवाण-घेवाणीतून सर्वसाधारणपणे माणसाचा विकास होत असतो. जीवनाविषयीचे ध्येय तो निश्चित करतो. नवनवीन कल्पना आणि स्वप्ने तो पाहू लागतो. ती पूर्ण करण्याचे मार्ग शोधतानाच त्याला नाविन्याची जाणीव होते. वैचारिक देवाणघेवाणीशिवाय प्रत्येक माणसात स्वतः देखील स्वतःचा विकास साधण्याची शक्ती असते. त्याला आत्मिक प्रेरणा असे नाव काही विचारवंतांनी दिलेले आहे. या प्रेरणेतूनच माणूस सतत नवीन काहीतरी शोधत असतो. नवनिर्मितीची ओढच त्याला लागते.

स्त्री आणि पुरूष यांच्या शारीरिक संयोगातून नवा जीव जन्माला येतो. असे असले तरी मूल जन्माला घालण्याची कल्पना आधी स्त्री आणि पुरूषाच्या मनात उत्पन्न होत असते. मूल जन्माला घालणे ही नवनिर्मितीचीच ओढ असते. मूल जन्माला येण्यापूर्वीच त्या निरागस नव्या जीवाविषयी नाना कल्पना आपण करीत असतो. त्या मुलाचे नाव काय ठेवावे, त्याला कुठल्या शाळेत घालावे, त्याला मी डाॅक्टर करणार वगैरे कल्पना आपण करतो. मूल प्रत्यक्ष जन्माला आले म्हणजे आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. नवनवीन गोष्टी आपण त्याला शिकवू लागतो. असे असले तरी ते मूलच स्वतःहून काही गोष्टी शिकत असते. खरंतर लहान मुलांनाच नवनिर्मितीची अधिक ओढ असते. खिडकीतून दिसत असणा-या आभाळाचे, पावसाचे, रस्त्याचे, माणसांचे, गाड्यांचे ते मूल निरीक्षण करते. त्याचेच एका कागदावर नव्याने चित्र काढते. त्या चित्रात ते मूल रंग भरते. पुढे मनात असलेल्या विचारांशी साम्य असणारे चित्र मुले रेखाटतात. हे रेखाटन ही खरी नवनिर्मिती असते. काही जणांना चित्रकला, हस्तकला, संगीत, गायन, नाट्य, नृत्य, कला यांची आवड निर्माण होते आणि सृजनात्मकतेच्या दिशेने हळूहळू पावले जाऊ लागतात. कलेच्या अविष्कारातून सृजनरंग दिसायला लागतात. या सृजनाची हळूहळू वागण्या-बोलण्यातही छटा दिसू लागते.


माणूस आणि कला यांचा ख-या अर्थाने संयोग घडून येणे ही नवनिर्मितीची प्रथम प्रक्रिया आहे. एखाद्याला पाककला अवगत असते. आपल्या रोजच्या न्याहारीत उपमा हा पदार्थ आपण घरोघरी करतो. पण त्याचेही किती निरनिराळे प्रकार आहेत. उपमा, सांजा, शेवयाचा उपमा... हल्ली तर 'इन्स्टंट ' उपमा देखील मिळतो. उपम्यासारख्या रोजच्या पदार्थातही नवनवीन प्रकार आपण जेव्हा पाहतो तेव्हा नवनिर्मितीची ओढ त्या पाककला अवगत असलेल्या व्यक्तीलस किती असते, याची आपल्याला कल्पना येईल. नवनिर्मितीची ओढ माणसाची कल्पकता वाढवते. विचाराला नवा अर्थ देते. एखादा कवी बाप म्हणून, भाऊ म्हणून, मित्र म्हणून कविता करतो. एखाद्या वेळी त्याला स्त्रीच्या भूमिकेतूनही कविता करावीशी वाटते. सतत काहीतरी करावंसं वाटणं हीच नवनिर्मितीची ओढ आहे. सण आणि उत्सवात आपण दारासमोर रांगोळी काढतो. त्याच रांगोळीचा उपयोग करुन आपण लहान मुलांना अक्षरे शिकवू शकतो. एका ताटात रांगोळी पसरुन त्यावर अक्षरे गिरवता येतात. एका ठिकाणी लग्नाच्या रुखवतात मी पुस्तकांचं सुरेख घरकुल केलेलं पाहिलं. लग्नात मंगलाष्टकांची एक विशिष्ट चाल असते. पण त्या विशिष्ट चालीत कितीतरी नवे शब्द गुंफलेली मंगलाष्टके आपण ऐकतो. हल्ली घराच्या बाल्कनीत टाकाऊ खराटे आणि चटयांच्या काड्यांचा छान गोल करुन छोटंसं घरटंही काही जण तयार करतात. गणेशोत्सवात तर सजावटीसाठी किती नवनवीन गोष्टी दरवर्षी आपण पाहतो. कृत्रिमतेतून पुन्हा निसर्गाकडे वळणारे काही जण नैसर्गिक फुलांच्या पाकळ्यांची रेखीव सजावटही दरवर्षी अगदी वेगवेगळी करतात. मूर्तीकार तर विशेषच असतात. गणेशाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर किंवा मुकुटावर किती सुरेख आणि कोरीव नक्षीकाम केलेलं असतं. देवळातल्या मूर्ती तर दगडावर निरनिराळ्या प्रक्रिया करुन तयार केलेल्या असतात. गणपतीच्या दोन देवळातल्या वेगवेगळ्या मूर्तींचं बारकाईने निरीक्षण केलं म्हणजे दोन नव्या कल्पना कशा प्रत्यक्षात येतात हे आपल्या लक्षात येतं. ह्या सा-या गोष्टी नवनिर्मितीची ओढ लागल्याखेरीज कशा घडल्या असतील!


अभियांत्रिकी, गृहसजावट यासारखी क्षेत्रे नवनिर्मितीच्या ओढीनेच प्रत्यक्षात अवतरली आहेत. देवालाही नवनिर्मितीची किती ओढ असते.. केवळ रस, रंग आणि रुपे वापरुन कितीतरी निरनिराळी माणसे त्याने निर्माण केली.. तरीही त्याची निर्मितीची ओढ तसूभरही कमी झालेली नाही. कवी बा . भ . बोरकर 'लावण्यरेखा' या आपल्या कवितेत लिहितात, " देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे.." याप्रमाणेच आपल्याला नवनिर्मितीची ओढ लागली म्हणजे आयुष्यातले सोहळे 'सुंदराचे' होतात. ही नवनिर्मितीची ओढ माणसातले माणूसपण जिवंत ठेवत असते..


- गौरव भिडे