संगम..!

युवा विवेक    05-Jun-2024
Total Views |


संगम

जुजबी आठवणींचे दिवस होते, सूर्य उदयाला आला की मी तालुक्याच्या माझ्या गावावरून एका मोडकळीस आलेल्या फटफटीवर औरंगाबाद शहर जवळ करायचो. कारण काही नाही चांगली चालती नोकरी सोडून कॉलेज करण्याचं भूत डोक्यात शिरले होते.

शिक्षणावर पुढे चांगली नोकरी लागेल या आशेपायी मी कॉलेजच्या खेट्या घालायचो. जसं एखादी बाई पोट पाडून आता पोर होत नाहीये म्हणून दवाखान्याच्या नाहीतर मग एखाद्या देवस्थानाच्या खेट्या घालत असते.

पहाटेच शहराची वाट जवळ करायला लागलो की, थंडीच्या दिवसात अंगात हुडहुडी भरून यायची. ढवळे तलमचे असलेलं स्वेटर रस्त्यावरील धुळीने जिल्ह्याच्या शहरापर्यंत येवोस्तोवर मातकट झालेलं असायचं. केसं पार भुरके अन् त्यात धूळ गेल्यानं पिंजारल्यासारखे होऊन जायचे.

औरंगाबादला पोहचलं की, एखादा आडोसा बघून मग ते स्वेटर काढून घेणं व्हायचं. शर्ट पँटच्या आत खोचून व्हायचा, धुळीने खराब झालेले काळे बुट पुसून व्हायचं, खिळखिळी झालेली गाडी पुसून भेगा पडलेल्या हेल्मेटला सावरून घेत पुन्हा प्रवास सुरू व्हायचा.

औरंगाबाद शहरातून रेल्वे स्टेशन मार्गे १० की.मी गेलं की बीड बायपास ओलांडून ३ की.मी माझं कॉलेज होतं. दोन-अडीच वर्ष हा कॉलेज नावाचा माझ्या आयुष्यात असलेला दुष्काळ अनुभवला. यातून हाती काय लागलं हा प्रश्न अजूनही सुटला नाहीये पण; अजून भटकंती सुरू आहे.

या दोन-अडीच वर्षात एक व्यक्ती कायम भेटत राहिली, ओळखीची वाटत राहिली. ती म्हणजे बीड बायपासला एम.आय.टी कॉर्नरला भेटत राहणारी "संगम" नावाची तृतीयपंथी मैत्रीण. औरंगाबाद शहरात मला मिळालेली ही पहिली मैत्रीण म्हणजे संगम. ती भेटली तसं पुढे दोन वर्ष औरंगाबाद आलो की तिची भेट या कॉर्नरला आवर्जून व्हायची.

कधीतरी मी निवांत असलो, ती पण निवांत असली की एम.आय.टी कॉर्नरला असलेल्या चहाच्या टपरीवर ती मला चहा पाजायची. तेव्हा एम.आय.टी अन् जवळपास महाविद्यालयात जाणारे सर्व मुलंमुली आमच्याकडे बघायची, येणारी जाणारी माणसं आमच्याकडे बघायची.

पण तिच्यासोबत गप्पा करणं तिच्या आयुष्याचा पट तिनं मला उलगडून सांगणं हे सगळं खूप भारी वाटायचं मला. अन्; तिलाही माझा एकूण हा खुळखुळ्या फटफटीवर चालू असलेला माझा जीवनप्रवास भारी वाटायचा.

तर ते दिवस असे होते की, मी नव्यानं कॉलेज जायला लागलो होतो. बीड बायपास म्हणजे औरंगाबादकरांचा चर्चेचा विषय मी जोवर कॉलेज केलं तोवर हा रस्ता काही पूर्ण झाला नाही. तिथे असणारं धुळीचे साम्राज्य, आता रस्ता नावाला झाला असला तरी अजूनही तसेच आहे.

तर एकदा असंच मी माझी फटफटी घेऊन कॉर्नरला क्रॉस करण्यासाठी थांबलो होतो, समोर ट्रॅफीक पोलीस होते. माझी गाडी अन् माझी भेदरलेली अवस्था बघितली, माझा गावाकडचा लूक बघितला तर मला फाईन पक्का होता. म्हणून मी गाड्यांच्या मागे गाडी लपवत गाडी काढत होतो.

ट्रॅफीक लागली अन् तिथं संगम आली, ती लोकांकडे टाळ्या वाजवत पैसे मागत होती. तिने माझी बेचैनी हेरली. हळूहळू ट्रॅफीक ओसरली मी पोलिसांना चुकवून रस्ता क्रॉस केला अन् संगमने मला आवाज दिला.

आता रस्त्यावर ट्रॅफीक नव्हती, तो निवांत वाहत होता. ती माझ्या बाजूने दुतर्फा असलेल्या कठड्याच्या बाजूला उभी होती. तिने आवाज दिला मी तिच्याकडे गेलो. ती हसतच बोलली बहोत डरते हो पोलीससे, चुपकेसे बाईक निकाल लिये..!

मी एक न दोन हो..! म्हणून गेलो, तसं ती हसायला लागली. मग काय करतो, इकडे कुठे अश्या गप्पा झाल्या. तिने जवळच्या चहा टपरीवर मला नेले, दोघांनी सोबत चहा घेतला अन् जुजबी बोलून मी निघून गेलो.

पुढे औरंगाबाद ईतर दुसऱ्या कामाने जरी आलो तरी संगमला भेटायचं म्हणून; शहराच्या एका अंगाला असलेल्या या बीड बायपासला येणं व्हायचं. ती पण तिचा वेळ द्यायची, फार काही नाही मस्त गप्पा व्हायच्या. दोन-अडीच वर्ष मी कॉलेज आलो की या कॉर्नरला तिला भेटायचो अन् मग कॉलेजची वाट जवळ करायचो.

छान मैत्री झाली होती, पुढे शहरातल्या एकदोन मित्रांशी पण तिची भेट करून दिली. मग मी शहराला आलो की आमचं सगळ्यांचं या सिग्नलवर भेटणं व्हायचं.

माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांची मोठी वाचता येईल इतकं शिकलेली, शिकण्याची इच्छा असूनही तिच्या आयुष्यात आलेली वळणं तिला रस्त्यावर घेऊन आली होती. आता तिचं हे असं जगणं नजरेसमोर होतं. ती म्हणायची,

कूछ भी हो पढाई मत छोडना..!

अन् मी पण शिकत राह्यलो.

पुढे लॉकडाऊन लागलं, कॉलेजचा संपर्क, इतर कामे मोबाईलवर होऊ लागले. तसं संगमशी होणारी भेटही दुरावत गेली. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर जेव्हा दोन वर्षांनी शहरात आलो, तेव्हा पहिले या सिग्नलला आलेलो पण संगम तेव्हा भेटली नाही.

नंतर शहरात इतक्या भटकंती नंतर ती अजूनही मला शहरात दिसली नाही. लॉकडाऊन पूर्वी औरंगाबाद शहरात सिग्नलवर फार किन्नर बंधूभगिनी नव्हते. हलाखी नव्हतेच असं म्हंटले तरी चालेल. तेव्हा ही संगम एकटीच दिसायची.

अजूनही शहरात प्रत्येक सिग्नलवर सिग्नल लागला की माझी नजर तिला शोधत राहते. पण; ती नजरी पडत नाही. असंच एकदा पुण्यात एका सिग्नलवर संगम सारखीच दिसणारी एक मैत्रीण भेटली. तिला बोललो पण ती "संगम" नव्हती. खिश्यातून वीसची नोट तिच्या हातात टेकवली अन् तिला माझी कथा दोन वाक्यात सांगितली.

ती जे काही बोलली ते आयुष्यभर आयुष्य जगण्यास कारणी ठरतील अशी वाक्य होती. म्हणून ना संगमसारख्या या अश्या मैत्रिणी आयुष्यात असाव्या असं वाटून जातं.

एकदा असंच चहाचा घोट घेत घेत ती बोलली होती की, ऐसीही भटकती भटकती प्रवरा संगम की ब्रीजपर मैं आ पहुची..! और वहा मुझे मेरी गुरू मिली, जिस्ने मुझे आशियाना दीया..! और तबसे मेरा नाम "संगम" है..!

बेफिकीर आयुष्य जगणारी "संगम" खरच बेफिकीर होती.

 

भारत लक्ष्मण सोनवणे.