व्यथा कंत्राटी कामगारांच्या आयुष्याच्या..!

युवा विवेक    26-Jun-2024
Total Views |


व्यथा कंत्राटी कामगारांच्या आयुष्याच्या..!

 

दोन दिवस सलग पाऊस पडल्यामुळे काळवंडलेल्या ढगांच्या आडून काही केल्या सूर्याचं दर्शन झालं नाही. या काळात दिड कीलो वजनाचे सेफ्टी बुट पाण्यात भिजल्याने दोन कीलोचे वाटू लागले होते.

आमच्यासारख्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना पावसाचे काही सोयरसुतक नसते, तो येवो न येवो काही एक घेणंदेणं आम्हाला नसतं. बस अट एकच कंपनीत जायच्या वेळी अन् यायच्या वेळी तो यायला नको. नाहीतर गेले दोन दिवस जी बुटांची झालेली अवस्था अन् त्यांना ओढूनताणून वापरताना कंपनीत माझी झालेली खराब हालत हे वाईट्ट आहे.

अखेर आज दुपारी सूर्याने दर्शन दिलं, ओझरते का होईना सूर्याचे किरण आमच्या उबट वास येणाऱ्या फ्लॅटमध्ये आले. माझी गोधडी सादळल्याने उबट वास मारत असल्यानं दुपारी तिला भर उन्हात गॅलरीत टाकून दिली अन् दोन दिवसांचे चार सॉक्सचे जोड धुवून वाळू घातले. अन्; सोबतच बुटही स्वच्छ करून मस्त पॉलीश करून चकचकीत करून गॅलरीत उन्हं खायला ठेऊन दिली.

स्लीपर घालून खाली फ्लॅट मालकाच्या मुलीला तिने दिलेली पुस्तकं परत केली आणि मग कॉफीसोबत तिच्याशी बऱ्याच गप्पा "ऑक्टोबर जंक्शन" या पुस्तकाला घेऊन मारल्या.

तिला बाय केलं, फ्लॅटमध्ये आलो शॉवर घेतला अन् मनसोक्त दुपारच्या उन्हात केसं वाळवत बसलो. तितक्यात सायलेंट असलेला मोबाईल व्हाईब्रेट झाला. मोबाईलवर सूनितचा कॉल येत असल्याचं कळलं. कॉल घेतला, आज संध्याकाळी चारला कॅनॉटला जाऊ अन् तिथून काळाराम मंदिरात जाऊ असं ठरलं. त्याची फिरकी घेत त्याला विचारलं सोबत कोणी असेल का.? त्याने सांगितलं हो, Girlfriend असेल मग त्याला नसतो येत म्हणून सांगितलं. अन् माझा दुसरा प्लॅन आहे असं खोटं बोलून कॉल ठेवला.

मस्त भर दुपारी ग्लासभर चहा अन् बनमस्का पाव खाऊन मस्त झोपी गेलो. वाढलेल्या ओल्या केसाला जसं जसं फॅनची गार हवा लागू लागली तसं नकळत डोळे मिटून गेले अन् मग तेच मित्राने संध्याकाळी मेसला जायचं म्हणून उठवले, तेव्हा उठलो. एरवी मित्राने पावसाचा अंदाज पाहून माझी गोधडी अन् शूज, सॉक्स आत आणून ठेऊन दिले होते.

फ्रेश होऊन मेसकडे निघालो मित्राला काय वाटलं माहित नाही चहा पिऊया व तुला आवडणाऱ्या तुझ्या दुनियेचं तुला दर्शन करवतो असं म्हणून तो मला त्याच्या बाईकवर पैठण गेटला घेऊन आला. मी स्लीपर, नाईट पॅन्ट अन् टी-शर्टवर इकडे कधी आलो नव्हतो जरा अवघडल्यासारखे वाटत होते. पण; मग एका टपरीवजा हॉटेलमध्ये मित्र मला घेऊन गेला.

त्याने दोघात तीन चहा अन् एक सिगरेट ऑर्डर केली, तिथे असलेल्या फळकटीवर आम्ही बसून राहिलो. एका आठ-दहा वर्षाच्या बारक्याने थरथरत्या हाताने दोन चहाचे ग्लास आणले अन् माझ्यासमोर ठेवले अन् सुटकेचा निःश्वास सोडला.

मित्राने सिगरेट शिलगवली अन् तिच्या प्रत्येक कशसोबत अन् चहाच्या घोटासोबत त्याची समाधी लागत गेली. मी माझ्या चहाचा ग्लास खाली केला तेव्हा तिसरा चहाचा ग्लास त्याने अर्ध्या सिगरेटनंतर खाली केला. तोवर मी सभोवताली घडणाऱ्या घटना बघत बसलो होतो.

सायंकाळची अजान झाली होती, सर्व मुस्लीम बांधव मशिदीतून नमाज अदा करून पुन्हा आपापल्या कामात व्यस्त झाली होती. तिसऱ्या ठोक्याची अजान व्हायची तेव्हा परिसरात असलेली सर्व कुबुतरे एकाकी आसमंतात फडफड करत उडायची अन् पुन्हा कौलं पडलेल्या दफन भूमीच्या कमानीवर येऊन बसायची. अन् तालेवार गप्पा आपसात करत बसायची.

इकडे खारे शेंगदाणे,फुटाणे विकणारा सलीम चाचा नमाज अदा करून आला अन् त्याच्या लोट गाडीवर ठेवलेल्या मडक्याशी तो खेळ करू लागला. लाकडाच्या ठोकळ्याला त्यानं उभ्याने कुऱ्हाडीनं फोडले अन् त्या मडके ठेवलेल्या शेगडीत घालून त्या विस्तवाला छेडले अन् मग त्यातून निघणारा धूर गुगुळच्या धुरासारखा आसमंतात फेर धरून जवळच असलेल्या दर्गाहतील समाधीशी जाऊन एकरूप झाला.

मित्राने उरलेल्या सिगारेटच थोटुक खाली टाकून दीड किलो वजनाच्या सेफ्टी बुटाने तिला चेंदून विझवले. त्या टपरीवाल्याला पन्नास रुपये देऊन वापीस आलेल्या पैश्यातून पाच रुपये त्या चहा घेऊन येणाऱ्या पोराच्या खिश्यात घातले.

भटकत भटकत मेसवर आलो. सोनाली वहिनी खूप दिवसांनी मेसवर दिसली कदाचित आजच दिवाळी करून माहेरून आलेली असावी. तिने मला बघताच मज्याक करायच्या मूडमध्ये येत मला बघून टोमणे देत बोलू लागली, काय आठवण आली की नाही सोनालीची का भेटली कोणी दुसरी कोणी.? असं काहीतरी बरच ती बरतळत होती.

कदाचित आज मेसवरच तिने भर सायंकाळी एक चपटी रीचवली होती. आज जरा तिचं वागणं नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते. ती वाढत होती आम्ही जेवत होतो. ती तिच्या माहेरच्या कथा सांगत होती आम्ही ऐकत होतो. अधूनमधून अंगाला चोरटा स्पर्श करून जात होती. पण; तिचं हे वागणं पिल्यावर असंच असतं याची रीत सगळ्यांना पडली होती.

त्यामुळं तिचं असं वागणं कुणी फार मनावर घेत नसत, कारण ती होती म्हणून आम्ही होतो. कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे कित्येक पोरं तिच्या जीवावर दोन वेळचं पोटभरून खाऊ शकत होतो. कारण तिचे मेसचे रेटही तसेच कमी होते जसे कुंटनखान्यात एखादी चाळीशीतील स्त्रीचे शरीर खंगले म्हणून भाव नकळत उतरले जातात. मग नवखे तरुण आपली नव्याची हौस, पैश्याची असलेली वानवा म्हणून या अनुभवी स्त्रीजवळ झोपून पूर्ण करतात.

जेवण झालं तसं ताटात हात धरून मी हाच विचार करत बसलो होतो. मित्राने माझं विचार करणं न्याहाळले अन् डोळ्यासमोरून हात फिरवत मला चालण्याचा इशारा केला. हे सोनाली वहिनीने बघितलं अन् ती बोलून गेली, काय आज जरा जास्तच लक्ष हरवलं..!

मी भानावर आलो अन् बेसिनमध्ये हात धुवून सोनाली वहिनींची नजर चुकवत मेस बाहेर पडलो. आता काळाराम मंदिरात जायची इच्छा उरली नव्हती अन् कॅनॉटला मगाशी कॉल आलेल्या मित्राला भेटायचीही. कारण सोनाली वहिनी पुन्हा डोक्यात शिरली होती.

भारत लक्ष्मण सोनवणे.