क्षमा शस्त्र

युवा विवेक    02-Jun-2024
Total Views |


क्षमा शस्त्र

 

शांती ही अहिंसेत असते, त्यातून ती प्राप्त होते हे सत्य बौद्ध तत्वज्ञानापासून ते अगदी महात्मा गांधी, विनोबा भावे आदी सर्वांनीच आत्मिक जिव्हाळ्याने सांगितलेलं आहे. पण अहिंसा ही सर्वकाळ सर्वस्थळी सहजी लागू पडणारी जादू नाही, हे सत्य नाकारता येत नाही. अशावेळी सावरकरांची मर्यादित अहिंसा स्वीकारणं हिच खरी शहाणीव! शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसंगी शस्त्र वापरावीत हा अनेक शस्त्रांचा निर्वाळा. भारतीयुद्ध म्हणजे याचा वस्तुपाठच! पण एखादं शस्त्र ज्याने शांती प्रस्थापित होते आणि ती देखील हिंसा न होता, डोळ्यांतले अश्रू सांडत नाहीत की मांसातले रक्त. माणसातील माणूसपण जिवंत ठेवणारं, किंबहुना फुलवणारं कदाचित हे एकमेव अहिंसक शस्त्र म्हणायला हरकत नाही! हे शस्त्र म्हणजे क्षमा. हाती बाळगायला अत्यंत कठीण आणि ते वापरायला लागणारं सामर्थ्य म्हणजे खरा पुरुषार्थ म्हणावा असं हे क्षमा नामक शस्त्र. गीतेतील दैवासूर्संपत्तिविभाग्योगात क्षमा हा दैवी गुण वर्णिलेला आहेच! या क्षमा शस्त्राची महती आणि फलश्रुती तुकोबांनी एका अभंगातून नेमकी सांगितली आहे.

क्षमा शस्त्राबद्दल लिहावं आणि तेही तुकोबांनी यासारखा दुग्धशर्करा योग अन्य नाहीच! तुका आकाशाएवढा असण्यामागील एक ठळक कारण क्षमाच आहे असं वाटतं. भले तुकायचा शब्द काटेरी बोचरा असेल, पण त्यामागे कळवळाच तर आहे! म्हणूनच तर मंबाजी भट, वाघोलीकर, रामेश्वर भट्ट, या विरोधकांनाही क्षमा करून शेवटी तुकोबांनी त्यांना आपलसं केलं. माऊलींच्या क्षमेला कारुण्याची झालर आहे, अद्वैताची गाढ बैठक आहे, आणि तुकोबांच्या क्षमेला मात्र कळवल्याची आर्त किनार..

हिच क्षमा सांगताना ते म्हणतात -

क्षमा शस्त्र जया नराचिया हाती। दुष्ट तयाप्रती काय करी ।।

गदा धरायला ती खांद्यावर पेलण्याच सामर्थ्य गरजेचं, धनुष्यासाठी बोटांची आणि नजरेची एकाग्रता, तलावरीसाठी मनगटातील बळ, पण क्षमा शस्त्र पेलण्यासाठी मात्र मनाची कमालीची ताकद जरूर आहे. पण एकदा हे शस्त्र जो मानव हाती धरतो त्याच्यापुढे अवघे दुष्ट निरुपाय होऊन जातात. कारण प्रत्येक शस्त्राची धार निस्सार करणारं हे शस्त्र. संत संताजी जगनाडे यांनीही साधारण याच आशयाचा चरण लिहिलेला आहे.

'क्षमा शांती जया नराचिये देहीँ ।

दुष्ट तया कांही करीत नाही ।।'

मनात क्षमा नसली, की अहंकाराचे उतावीळ काटे अखंड जागे असतात. कुणाचा एखादा शब्द, वागण्यातील अगदी बारीक गोष्ट, बोलणं, असं काहीही दुखावून क्रोधाच्या यमद्वारकडे घेऊन जातात. पण ज्याच्या ठायी क्षमा असते, त्या व्यक्तीला मात्र अशी कुठलीही गोष्ट व्यथित करत नाही. का? कारण अहंकार, वृथा अभिमान, मान, असले आसुरी गुण क्षमेसोबत नांदू शकत नाहीत.

तृण नाही तेथे पडिला दावाग्नि। जाय तो विझोनी आपोआप ।।

ज्याच्याकडे क्षमा असते, त्या ठिकाणी तण नसतं. हे तण कोणतं? क्रोधाहंकारत वाया घालवण्यासाठी वेळ याचं सुद्धा तृण तिथे नाही! मग दावाग्नी तिथे पडला, तरी जाळायला काहीच नाही पाहून तो विझून जातो. आपोआप!! इथेच या शस्त्राची नवलाई सूचकपणे सांगितली आहे. हे शस्त्र असं, की प्रतिकार न करताच समोरची आग विझून जाते. आपोआप या शब्दात ती क्षमा किती सहज काम करते हे दिसतंच पण सोबतच ती किती सहज असावी, गवगवा न करता आणि क्षमाकर्त्याचा अहंकार न बाळगणारी असावी याचं सूचन आहे.

म्हणूनच तर -

तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित। धरा सुखरूप अखंडीत ।।

इथे या शस्त्राची दुसरी महत्ता स्पष्ट होते. असं शस्त्र, ज्याने दोन्ही पक्षांचं स्वहित साध्य होतं. जो विरोधात उभा, त्याला क्षमा करून त्याचंही स्वहित साधणं ही या शस्त्राची अपूर्वाई! हिच नेमकी फलश्रुती. म्हणून हे शस्त्र हाती धरा. सुखरूप धरा नि त्याने सुखरूप व्हा. ते धरायचं आहे ते अखंड. फळ म्हणून असणारी शांतता देखील अखंड आहे हे वेगळं सांगायला नको.

इथे एक बाब महत्वाची. क्षमा म्हणजे स्वाभिमानाला तिलांजली देणं नव्हे, की दीनता पत्करणही नव्हे. कुठल्याही स्वार्थी हेतुशिवाय क्षमा करतो तो उदारचेतस असतो. तुका आकाशाएवढा होता आणि आहे म्हणून तो गाऊ शकला क्षमेचं विक्रमी कवन. हे क्षमागान त्यांच्या आयुष्यात विलसलं आहे, सोसून सोडून दिल्याची निस्संगता त्यात आहे.

अर्थात या क्षमेचं मूळ आणि आकाश पांडुरंग आहे हे विसरायला नको!!

- पार्थ जोशी