चोखोबांचा एक अभंग वाचला, आणि त्यांच्या काही शब्दांचं फार आश्चर्य वाटलं. चोखोबांनी आपल्या अभंगांमधून आरध्याला मारलेली हाक हृदय पिळवटून टाकणारी आहे. त्यात नसेल माऊलींच्या शब्दकळेचं अपार लावण्य, नसेल तुकोबांची प्रसंगी काटेरी वाटणारी स्पष्टता, थेटपणा.. पण चोखोबांच चरित्र वाचल्यावर त्यांचं कष्टमय आयुष्य पाहिल्यावर, तथाकथित यातिहिनत्व समजल्यावर, त्यांची शब्दांमधली निःशब्द हाक आणखीनच आर्त होते. सामजिक बंधनांमुळे महाद्ववरापाशी थांबूनच त्यांनी घेतलेलं दर्शन आणि तरी देखील असलेली त्यातली नवलाई, समाधान, हे सारं शब्दापलिकडचं आहे. म्हणूनच, चोखोबा विठ्ठलाला इतक्या दुरवरून पाहून देखील प्रेमाचा पुतळा म्हणतात, तेव्हा त्यांच्या व्याकूळ दृष्टीचं आणि त्यातील विठ्ठलाच्या प्रतिबिंबाचं दर्शन सुद्धा प्रासादिक वाटतं!
अवघा प्रेमाचा पुतळा ।
विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥
जन्ममरणाची येरझारी ।
तुटे भवभय निर्धारी ॥२॥
ऐसा प्रताप आगळा ।
गाये नाचे चोखामेळा ॥३॥
केवळ तीन चरणांचा हा अभंग किती बोलका आहे! आपण ऐकायला हवं.. पहिल्या चरणात - तो विठ्ठल म्हणजे प्रेमाचा पुतळा आहे, उघड्या डोळयांनी तो पाहा. असं साधं विधान वाटलं, तरी त्याच्यापलिकडे इथे बरंच काही आहे असं वाटत राहतं. थांबतो आपण.. शोधू जातो शब्दांमधून विठ्ठल.. विठ्ठलतत्व..
'विठ्ठल पाहा उघडा डोळा' याचा अर्थ काय घ्यावा? उघड्या डोळ्यांनी तो पहा, असा अर्थ घेतला तर वाटतं, की चोखोबा इतक्या लांबून बघतात त्याच्या मूर्तीला आणि तरी त्यांना तो प्रेमाचा पुतळा वाटतो. असं बघणं म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहणं. बाकी, आपल्यासारखं न संपणारी मागणी मागतच त्याला पाहणं म्हणजे शुद्ध आंधळेपणा! किंवा त्याला उघड्या डोळ्यांनी पाहा म्हणजे जाणवेल की तो चराचरी भरला आहे. सगळीकडे त्याचंच दर्शन, प्रत्येक कर्म हे त्याचं पूजन. हा एक अर्थ. पण पुढे वाटलं, की उघडे डोळे असणारा विठ्ठल पहा, असं तर म्हटले नसतील चोखोबा?? या जाणिवेने आपलेच डोळे चमकून जातात. लक्षात येतं, विठ्ठलमूर्तीमध्ये डोळे उघडे नाहीत! तरी चोखोबा याच अर्थी हे म्हणत असतील तर? पण का मिटलेले असतील त्याचे डोळे? नीट विचार केला, तर लक्षात येईल की विठ्ठलाच्या दर्शनात त्याचं मुख, त्याचे डोळे पाहण्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते पायांवर डोकं ठेवणं. एखाद्या वारकऱ्याला बराच काळ देवाचं मुखदर्शन दिलं, पण पायी माथा टेकूच दिला नाही तर त्याला दर्शन पूर्ण वाटणारच नाही! म्हणूनच चरणांचं महत्त्व असणारा असा हा देव असल्याने त्याची दृष्टी देखील त्याच्या चरणांशी कुठला भक्त आहे हे पाहण्यात व्यग्र असल्याने तो खाली पाहतोय, नमस्कार करणाऱ्या भक्तांकडे पाहतोय, म्हणून डोळे मिटलेले वाटतात अशी मांडणी मी एका कवितेतून पूर्वी केली होती. ते असो. पण त्याचे डोळे असे दिसत नसले, तरी ते उघडे आहेत, 'तो आपल्याला कृपेने करुणेने पाहतो आहे' हे जाणणं म्हणजेच विठ्ठल उघडा डोळा पहाणं. अशाप्रकारे आपण जेव्हा पाहू आणि त्याचं लक्ष आपल्याकडे अव्याहतपणे आहेच असा विश्वास ठेवू तेव्हाच तर त्याच्याविषयी प्रेम वाटू लागेल. तेव्हाच तो प्रेमाचा पुतळा वाटेल!! असं जेव्हा होईल, तेव्हाच -
जन्ममरणाची येरझारी ।
तुटे भवभय निर्धारी ॥२॥
हे साक्षात होईल. त्याच्या भक्तीची वाट भक्कम झाली, त्यावरून मार्गक्रमणा सुरू झाली, की जन्ममरणाच्या येरझाऱ्या आपोआप संपुष्टात येतील. कटिवर हात ठेवून भवसागर एवढाच आहे, काळजी नको असं भक्तांना अभय देणारा प्रेमाचा पुतळा असला म्हणजे भवभय तुटून जाणार हे निश्चित.
ऐसा प्रताप आगळा
गाये नाचे चोखामेळा
असं जेव्हा चोखोबा म्हणतात, तेव्हा एखादा विशिष्ट प्रताप अभिप्रेत असेल का त्यांना? पुन्हा वाटतं, की डोळे मिटलेले दाखवून ते भक्तांसाठी अखंड जागे आणि कासावीस ठेवणं हाच तर पांडुरंगाचा आगळावेगळा प्रताप आहे! कुठल्याही देवाठायी हा असा प्रताप खचितच नाही. हा प्रताप कळल्यावर चोखोबा सद्गदित झाले असातील. हातापायांतील वेदना विसरून सावळ्या स्मरणाने उल्हसित होऊन गाऊ नाचू लागले असतील.
विठ्ठल नावाच्या प्रेमाच्या पुतळ्याकडे पाहताना चोखोबा आपले डोळे असे सहज हतोटिने उघडतात! तो प्रेमाचा सजीव पुतळा आपल्यासाठी किती झिजतो, भिजतो, विरघळतो, हे पाहून उघडल्या डोळ्यांतून प्रेमाचं पाणी सहज वाहू लागतं..
- पार्थ जोशी