आयुष्य बहरते फुलांनी..

युवा विवेक    15-Jun-2024
Total Views |


आयुष्य बहरते फुलांनी..

मध्यंतरी एका नर्सरीत जाणे झाले. नर्सरी म्हटलं की, तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोपटी, झाडांचे निरनिराळे प्रकार आणि जवळपास सगळ्याच झाडांची नावे पाठ असणारी दोन माणसे आणि भरपूर ऑक्सिजन असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण ही नर्सरी फक्त फुलझाडांची होती. तुळशीचा एखाद-दुसरा प्रकार नाही म्हणायला तिथे होता. तिथली सगळी फुले डोळ्यांना सुखद अनुभव देत होती. कुठल्याही वयाचा माणूस असला तरी अशी बहरलेली फुलं पाहिली की, तो क्षणभर थांबतोच.. खरंतर आपलं जन्मोजन्मीचं नातं या फुलांशी आहे. कितीतरी प्रकारची फुले असतात.. पण स्वभावधर्म प्रत्येकाचा सारखाच.. तो म्हणजे आपल्याजवळ जाणा-येणा-या माणसाला आपल्या अस्तित्वानी सुख बहाल करणे आणि आपल्या गंधाने क्षणभर का होईना पण थेट त्याच्या श्वासांशी संवाद साधणे ! कितीतरी यंत्रे आली, जगण्याविषयीच्या अधुनिक संकल्पना आल्या, अगदी क्षणोक्षणी बदलणारे तंत्रज्ञान अस्तित्वात आले आहे. तरीदेखील आपला धर्म या फुलांनी सोडलेला नाही.. यंत्राशी त्यांना काही देणं नाही नि घेणंही नाही.. आपल्या जगात ती आनंदाने जगतात, कोमेजतात आणि नव्या दिवसागणिक पुन्हा नव्याने जन्मही घेतात.


हल्ली प्लॅस्टिकची निरनिराळी खेळणी किंवा पाने-फुले बाजारात मिळतात. कुणी नवीन मूल जन्माला आलं की, त्या खेळण्यांनी आणि कृत्रिम पाना-फुलांनी पाळणा सजवतात. पण अजूनही काही ठिकाणी फुलांची सुंदर सजावट पाळण्याला करतात. आपल्या जन्मानंतर अगदी बाराव्याच दिवशी या फुलांची नि आपली भेट होते. पुढे मग सोळा संस्कारात आपली या फुलांशी भेट होतच राहते. इतकंच कशाला, आपला मृत्यूदेखील फुलांविना अपूर्ण आहे. मृत्यूनंतरच्या सगळ्या विधींनाही फुलांचं महत्व आहेच.. अशी जन्मापासून भेटणारी ही फुले मृत्यूनंतरही आपल्याशी नातं जपतात.. रोजच्या पूजेसाठी आपण वेगवेगळी फुले आणतो. झेंडू, चाफा, शेवंती, मोगरा, गुलाब, गुलछडी, तगर अशी निरनिराळ्या प्रकारची फुले देवांच्या चरणी वाहिली की आपली सकाळ कशी प्रसन्न होतो.


ज्यांच्या घराभोवती अशी फुलझाडे आहेत त्यांची पहाट धुक्याबरोबरच या फुलांच्या गंधानी होते. झोपेतून उठल्या-उठल्या या गंधानी आपल्या श्वासांना अलगद मिठीत घेतलं म्हणजे तुमची पावले अंगणात वळलीच म्हणून समजा ! बरीच जण अंगणात मधुमालती नक्की लावतात. बहरलेली मधुमालती तुम्ही पाहिलीत की उगीचच मन शहारुन येतं. नाजूक फुलांनी बहरलेला पारिजात, उमलेला गडद लाल गुलाब, त्याच्या शेजारी अर्धी झाडावर आणि अर्धी अंगणात पडलेली तगरीची फुले, पिवळाधम्मक चाफा, काहीशी कमी आलेली मोग-याची फुले आणखी थोडीफार पुढे फुललेली सदाफुली, बिट्टी सारखी चार-दोन फुले आणि या सगळ्यांच्या जोडीला अविरत या फुलावरुन त्या फुलावर फिरणारे भ्रमर ..अशा बहरलेल्या अंगणात पहाट संपून सकाळ कधी झाली हे कळतसुद्धा नाही.. जाई-जुई वगैरे फुले कधी कधी भेटतात. अनंताचं फूल तर न संपणारा सुगंध आपल्याला बहाल करतं. बकुळीची तर कथाच न्यारी असते. या फुलांकडून नि झाडांकडून माणसानं जगणं खरंच शिकावं. "काय रे तुला बसायला माझीच सावली सापडली होय?" , " मला कधी पाणी घालायला येत नाहीस आणि माझी फुलं खुशाल खुडतोस का? " वगैरे प्रश्न आपल्याला कधी झाडानी विचारलेलं पाहिलंत का तुम्ही ? अहो, म्हणून तर या फुलांच्या सहवासात माणूस क्षणभर स्वतःलाही विसरतो. वा-याच्या एखादी झुळूक आली की, तिच्याबरोबर ही फुले खेळतात तेव्हा आपलं अंगण किती छान सजतं. अंगणात पडलेला हा सडा, एकमेकांत गुंफणारे हे सा-या फुलांचे गंध यानी वातावरणाला संजीवनी मिळते. शंभर-दोनशे रुपयात मिळणारं एवढंसं फुलाचं रोपटं आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग भरतं.. आपले आयुष्य एखादी व्यथा अनावर झाली म्हणून ते संपवायचे असा विचार करणा-या माणसांनी या फुलांशी मैत्री करुन पहावी.. आयुष्य पुन्हा पुन्हा जगावंसं वाटेल!


ऋतूमानानुसार उमलणा-या या फुलांनी आपलं आयुष्य अगदी व्यापलेलं आहे. कितीतरी साहित्यिकांना या फुलांकडे पाहून कथा, कविता, स्फुरतात. इंग्रजी आणि इतर भाषेतल्या साहित्यातही काही ठिकाणी फुलांचे वर्णन आहे, फुलांच्या उपमा वेगवेगळ्या प्रसंगी दिलेल्या आहेत. आपल्या प्रियकराला प्रेयसीने दिलेलं गुलाबाचं फूल किंवा नव्या सुवासिनीने माळलेला गजरा आणि तिला पाहून तिच्या नव-याची तिला स्पर्श करण्याची ओढ पाहिली म्हणजे फुलांचा आपल्या आयुष्यातला वावर किती हवाहवासा वाटतो.. प्रत्येक वळणावर भेटणा-या फुलांनी आपले आयुष्य बहरते. याच फुलांची जन्मावस्था म्हणजे कळी.. 'कळ्या' या शब्दाची उपमा गीतरामायणात आपण ऐकलेली आहेच. प्रभू श्रीरामांच्या जन्माचं वर्णन करताना गदिमा म्हणतात, " पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, 'काय काय' करीत पुन्हा उमलल्या खुळ्या ! उच्चरवे वायू त्यास हसून बोलला, राम जन्मला गं सखी राम जन्मला ! "


- गौरव भिडे