नाम संजीवनी..

युवा विवेक    13-Jun-2024
Total Views |


नाम संजीवनी..

 

संत नामदेव आणि त्यांचे नाम महात्म्यावरचे अभंग हा किती विलक्षण योग आहे... जणू नामानेच नामाचे गोडवे गावे... मुळात संत नामदेवांच्या अभंगांची विलक्षण गोडी आणि त्यात जेव्हा नामाचा गोडवा मिसळतो तेव्हा जणू अभंगरूपाने भक्तांच्या हातात येतो तो निखळ माधुऱ्याचा रस ज्याची अवीट गोडी भारून टाकते तशी भरूनही टाकते सर्वस्वाला ती निखळ सावळ्या रंगाने. एका अभंगांत संत नामदेव महाराज म्हणतात -



नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥

नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥



रोजच्या जगण्यात माणूस अव्याहत कर्म करत राहतो. अर्थात कर्म करण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नसतोच. पर्याय असतो तो कोणतं कर्म करायचं हे ठरवायचा. मात्र ते कर्म नेहेमी आपल्यासाठीच असतं असं नाही, कर्म जरी आपलं असलं तरी ते करण्याची प्रेरणा नेहेमी आपल्याला स्वयंस्फुर्तीतून मिळते असं नाही, ती कधी मिळते ती इतरांकडून, त्यांच्या भल्यासाठी, कधी नकळत सगळे तीच गोष्ट करत राहतात म्हणून तर कधी कोणी म्हणतं म्हणून किंवा आणखी काही मात्र ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी आंतरिक शुद्धी कमी होत जाते, बाह्य गोष्टींतल्या असक्तीचे थर आंतरिक शुद्धतेवर चढत जातात. बाह्य शुद्धता राखणं एकवेळ सहजसाध्य म्हणता येईल मात्र आंतरिक शुद्धता साधणं, राखणं तसं कठीण. मात्र या अभंगातून संत नामदेव महाराज आंतरिक शुद्धतेचा साबणच आपल्या हातात ठेवतात. हा साबण आहे तो नामाचा, परमेश्वराच्या नामाचा. ते नाम आहे ते त्याच्या कोणत्याही रूपाचं, रघावाचं, माधवाचं किंवा भक्ताला भावणाऱ्या, 'त्या'च्या कोणत्याही रूपाचं. संत नामदेव महाराज जणू आश्वासन देतात की ह्या नामाच्या भक्तियुक्त गायनाने, स्मरणाने, उच्चाराने मनुष्य नित्य शुद्धच होत राहतो, या नमापाशीच भुक्ती-मुक्ती वास करतात, नामायोगेच त्या प्राप्त होतात. जणू ह्या नामाइतकं सोपं आणि तरीही श्रेष्ठ असं साधन केवळ वसुंधरा नाही तर त्रिभुवनातही नाही हे ऐकून ते आपल्याला माहीत असल्याचा कोण अभिमान वाटत असेल प्रत्येक भक्ताला, कृतार्थ भावाचं केवढं शिखर म्हणावं हे... जगण्यातली अवघी मरगळ दूर करून जणू नवं बळ देणारं, चैतन्याने न्हाऊन टाकणारं, परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव करणारं नाम ही साधकांसाठी जणू संजीवनीच आहे...



नामें भक्ति जोडे नामें कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥३॥

यज्ञ दान तप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥



ह्याच संजीवनी रूप असलेल्या नामाचं माहात्म्य संत नामदेव महाराज पुढे सांगतात. ह्या नामाने परमेश्वरावरचं निखळ प्रेम वाढत जातं, भक्ती वाढत जाते, ह्या नामाचं माहात्म्य असं की ते घेणाऱ्याची कीर्ती वाढवतं. कदाचित अभंगामधे आधीच्या ओळींत म्हंटल्याप्रमाणे नामाने माणूस सबाह्य शुद्ध होत जातो, त्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होत राहते आणि अशा शुद्ध असलेल्या, परमेश्वराची कृपा ज्याच्यावर आहे अशा माणसाने केलेल्या कामाला कीर्तीचा काठ हा जोडला जाणारच... ह्या नामाने मानव जन्माचं ध्येय मानलेला मोक्षही हाती येतो. जणू लौकिक-अलौकिक अशा दोन्ही गोष्टी साध्य करून देतं, देत राहातं ते केवळ नाम... भारतीय संस्कृतीमधे यज्ञ, दान आणि तप यांचं फार महत्त्व आहे. कदाचित ह्या महत्त्वाच्या अशा यज्ञ, दान आणि तपाचं फळ हे नामाने मिळतं असा अर्थ इथे घेता येऊ शकतो. ह्या नामाने जणू भक्त परमेश्वराशी एकरूप होतो, अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता ज्याच्या हाती आहे त्याच्याशी नामायोगे एकरूप होऊन जणू सर्व सत्ता प्राप्त होते...



नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाहीं याच्या तुकीं दुजा कोणी ॥५॥



अशा ह्या अतुल्य नामाचं माहात्म्य सांगून संत नामदेव महाराज जणू भक्तांच्या उद्धारासाठी कळकळीने सांगतात की ज्याच्या मुखी सतत नाम असतं त्याच्यासारखा भाग्यवान तोच असतो, दुजा कोणी नाही. आपण जे बोलतो ते सहज आपल्या डोळ्यापुढे उभं राहातं, आपल्याकडून स्मरलं जातं. नाम घेतल्यावरही कदाचित 'त्या'चं रूप आपल्या डोळ्यांपुढे उभं राहतं, त्याचं स्मरण घडत राहातं, हे नेहेमीच होतं असं नाही मात्र नाम घेत रहाणं महत्त्वाचं. नाम घेण्याची बुद्धी होणं, ते घेतलं जाणं, ते सतत घेत रहाणं ही भाग्याची खुणच म्हणता येईल. म्हणून असं हे नाम घेणाऱ्या माणसासारखा भाग्यवान तोच...



- अनीश जोशी