भू-अवतार हा तुझाच रे जगदिशा !

युवा विवेक    07-May-2024
Total Views |


भू- अवतार हा तुझाच रे जगदिशा !

 

हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो..

या रॉय किणीकरांच्या ओळी पाहून वाटतं की हे स्थित्यंतर स्वाभाविक असलं तरी देहाच्या जन्मण्याला, वाढण्याला आणि तितकाच सरण्यालाही एक अर्थपूर्ण आकार लाभतो तो भारतमातेच्या कुशीत असल्याने! तिच्या पोटी जन्म लाभण्याचं भाग्य हे अभिनवतेनं गावसं वाटतंच, पण त्याचसोबत तिच्या ऋणांची जाणीव मनात जोपासत ते फेडण्याचे खुळे सप्रेम अट्टाहास पुनःपुन्हा करावेसे वाटतात. भारताच्या स्वातंत्र्याचं हे अमृतमहोत्सवी वर्ष असलं, तरी तिच्या कुशीत जन्म लाभणं हाच तर जीवाला लाभलेला अमृतस्पर्श आहे!

वैश्विक जाणिवांचं बीज इथे स्वयंभू तर आहेच, शिवाय अखिल विश्वातील ज्ञानगंगेची गंगोत्री इथे शतकांपासून नांदत आली आहे. तिचे प्रवाह उपप्रवाह हे ज्ञानतेजाने भरलेले भारलेले असले, तरी ते कोरडे नक्कीच नाहीत. निरसतेला वा शुष्कतेला न इथल्या ज्ञानात स्थान आहे, न संस्कृती वा जीवनात. हिंदूस्थानात नांदणार्या प्रत्येक संस्कृती परंपरेत रसपूर्णतेचा सुंदर ओलावा आहे, लालित्याची जागती जाणीव तर इथे कलेपासून खाद्यापर्यंत, साहित्यसंगीतापासून तत्वज्ञानापर्यंत, जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंतही दिसून येते. रसिकतेचा आणि सहज प्रवाहाचा प्रत्यय आपल्याला इथे ठायी ठायी आल्यावाचून रहात नाही. जगातील कुठल्याही संस्कृतीत ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, संगीत, स्थापत्य-मानस-ज्योतिष-दैवतादी शास्त्र, अध्यात्म, आणि अशी अनेक शास्त्रकलांची घडण इतक्या प्रभावीपणे आणि सुंदरतेने विकसित झालेली दिसत नाही, हे निर्भीडपणे म्हणायला काहीच हरकत नाही.

केवळ भारतात आहोत, जिथे आहोत, त्या भूमीचे गोडवे गाणं म्हणून हा स्तुतीप्रपंच नसतो. कारण त्यामागे तेजाळत असतं या अलौकिक मातीच्या थोर संचिताचं भाग्य! अद्वितीय! जिथे जन्मून गेल्यात युगप्रवर्तकांच्या राशी, सत्पुरुषांच्या पदस्पर्शांने केवळ पुनित झालेली ही भूमी नव्हे, तर त्यांच्या प्रत्ययाचा सुगंधही इथे अविरत गंधाळतो आहे.

जगातील अनेकानेक देशांतील लोक आपल्या देशाला फादरलँड म्हणत असले, तरी आपल्यासाठी मात्र भारत ही भारतमाता आहे! माता! भारतीय संस्कृतीतील मातेचं स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे भारताला आई म्हणून तिच्यावर केलेलं प्रेम, तिच्याशी जन्मतःच जोडला गेलेला मातृभावाचा लळा हा किती लोभस वाटतो जगामधे! तिच्याशी असलेलं प्रत्येकाचं नातं हे खचितच आई मुलाचं आहे. त्यामुळे तिची आपल्यावरची निस्सीम माया ही आपल्याला जाणवतेच, आणि आपल्या पुत्रकर्तव्याचं भानही जागृत रहातं. तिच्या ऋणाची जाणीव रोज स्मरुन कृतार्थतेचा सुखदानुभव हा नेहमी कृतार्थ करणारा असतो.

भू अवतार हा तुझाच

तुझाच रे जगदिशा

जय जय हे भारत देशा..

या ओळींतून तर वाटतं, की भारत ही आपली माता तर आहेच, पण भारत हा त्या जगदिश्वराचा जणू भू अवतारच आहे! तो ईश्वर जरी सृष्टीतील कणाकणात भरुन असला, तरी त्याचा अवतार हा विशेषच असतो. त्याचप्रमाणे, अखिल विश्व हा त्याचाच आविष्कार अस्ला, तो अखंड विश्वाला व्यापून उरला असला, तरी त्याचा अवतार म्हणजे भारत! साक्षात् तो म्हणजे भारत! त्याच्या पाऊलखुणा इथे धुळीच्याही कणाकणात दर्शन देतात. दैदिप्यमान इतिहासासोबत तो घडवणार्या राष्ट्रपुरुषांचा समृद्ध वारसा आजही इथे तितकीच तेजस्वी प्रेरणा देतो. अज्ञाताची गूढरम्य चाहूल आजही तितक्याच नेमकेपणे उलगडली जाते.

'हे राष्ट्र देवतांचे...' कारण हा त्याचाच तर अवतार आहे. त्याच्याच पोटी जन्म लाभून त्याच्याच अंगाखांद्यांवर आपण बागडतो आहोत. त्याच्याच एकमेवाद्वीतीयतेचे रंगसुगंध अनुभवतो आहोत.

कारण आपली क्षितिजं कितीही विस्तारली, वैश्विक नागरिक म्हणून आपण कितीही डंका वाजवला, तरी आपल्या आईचा लळा हा नक्कीच न सुटणारा असतो, आहे. तिच्या ऋणांची अपारता व्यापक आहे. अगदी वैदिक काळापासून निर्माण झालेली शास्त्र, विद्या-अविद्या, त्यांचा अतिशय सखोल परिपक्व अभ्यास, आणि सार्या माध्यमांतून, ज्ञानशाखांतून, संकुचिताच्या सार्या सीमा ओलांडून इथे केलेला वैश्विकतेचा विचार... काय म्हणावं याला? शब्दही रिकामे वाटावेत.. अर्थांचे उंबरठे विरुन जातात.. पण भारतमातेचं अलौकिकपण, तिची अनादी समृद्धता, तिने पेरलेलं कालातीत विचारधन, एवढंच नाही तर तिच्या असण्यालाही सर्वांगसमावेशक शब्द नाही, नाहीत.

या दिव्यत्वाच्या प्रचितीसमोर आपण थक्क होऊन अर्थातच तिच्यासमोर आपले हात जोडले जातात. आपोआपच आपण नतमस्तक होतो, होत रहातो. पण हे दास्यत्व नाही, हे भाग्य आहे लाभलेलं! भाग्यानं! तिच्या कृपेनं!

आपल्या आईच्या अद्वितीयत्वाचा अभिमान बाळगून, तिच्या अपार ऋणांचं स्मरण ठेवून असं काहीतरी करुयात, की एक दिवस तिलाही नक्कीच आपला अभिमान वाटेल! तिच्या कृपेने तिच्याच पोटी फुललेलं हे फुल, तिच्या चरणांशी तेव्हा आनंदाने पडेल. आणि तिला दिलेल्या सुगंधाने त्याचं सार्थक होईल.

- पार्थ जोशी