कधी एखाद्या पुस्तकाच्या किंवा मालिकेच्या मॅडसारखं प्रेमात पडलाय तुम्ही? मॅडसारखं म्हणजे एकोणीस हजार वेळा तुम्ही ते पुस्तक वाचू शकाल किंवा मालिका पाहू शकाल असं! तुमचं उत्तर 'हो' असेल तर मॅडसारखं कौतुक आणि 'नाही' असेल तर तुमच्यासारखे मॅड तुम्हीच!
गेल्या दोन वाक्यात इतके वेळा मॅडसारखं मॅड वापरलं आहे की आतापर्यंत मलाच मॅड ठरवून तुम्ही मोकळे झाला असाल. पण म्हणतात ना त्यातली गत! आधी प्रकाश संत यांच्या पुस्तकातल्या सगळ्या कथा एका बैठकीत वाचून काढल्या होत्या आणि आता त्याच पुस्तकांवर आलेली निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेली लंपन ही SONY LIV या OTT प्लॅटफॉर्म वर आलेली मालिका सुद्धा एकाच बैठकीत पाहून संपवली त्याचा हा परिणाम, मॅडसारखा!
आपण आपल्या 'सिमेंट'च्या घरात मे महिन्यात कामाच्या व्यापाला कंटाळून टी. व्ही पाहत बसावं आणि समोर निरनिराळी, आपल्याला आपल्या लहानपणात घेऊन जाणारी दृश्य दिसत रहावीत, आईच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, पितळी डब्बे, पडवी मधला झोपाळा, आंब्याच्या झाडाला बांधलेला झोपाळा
दिसत रहावा, समोर दिसणाऱ्या पात्रांमध्ये आपल्या एखाद्या मित्राची झलक दिसून जावी, तेच जुने आठवणीतील शब्द कानी पडावेत आणि आपण अलगद त्या चार बंद भिंतींमधून खेडेगावातल्या कौलारू घरात पोहचावं; याहून सुंदर नेमकं काय असू शकतं?
बऱ्याचदा एखाद्या पुस्तकावर आधारित मालिका किंवा चित्रपट आला की अनेक मतमतांतरे होतात. अनेकवेळा कथानकातील गाभा, भाव हरवले आहेत असे कारण दिले जाते. मात्र प्रकाश संत यांच्या कथांमधील लंपन या एका शाळकरी मुलाचे भावविश्व मालिकेमध्ये कुठेच हरवलेले नाही याऊलट संगीत, उत्कृष्ट अभिनय अशा साऱ्या गोष्टींमुळे आणखी फुलून गेले आहे. लंपनच्या भावविश्वाचा, त्या गावाचा, शाळेचा एक भाग म्हणून आपण अगदी नकळत जगू लागतो. छोट्या छोट्या प्रसंगी मॅडसारखे डोळे पाणावतात, मन भरून येतं पण मग लगेचच पुढच्या प्रसंगातून एक उबदार हात आपल्या सुद्धा डोक्यावरून फिरतो. थोडक्यात सांगायचं मोठं होता होता आपलंच हरवलेलं अल्लड विश्व पुन्हा सापडून जातं.
लंपनला पडणाऱ्या अनेक प्रश्न आणि होणाऱ्या अनेक जाणीवांमधील एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच लहानपणी एक ना एक दिवस नक्की पडलेला असतो. तो म्हणजे काहीतरी मोठं करण्यासाठी मोठं व्हावंच लागतं का? यात पुढे लंपन म्हणतो की की मोठं काहीतरी केलं की आपण आपोआप मोठे होतो? मोठं होण्याची भीती प्रत्येकालाच असते नाही? लहान मुलांना मोठं होण्याची भीती आणि मोठ्या माणसांना म्हातारं होण्याची भीती. या भीती मागच्या कारणांचा विचार केला तेव्हा वाटलं की लहानपणी जे मॅड सारखा विचार करता येतो, मॅड सारखं वागता येतं ते मोठं झालं की वागता येत नाही म्हणून आपण मोठं होण्यास भितो आणि म्हातारं झालं की हवं तसं वागण्याची इच्छा असते पण शरीर साथ देणार नाही म्हणून भितो. पण मोठं झालं की मॅड असल्यासारखं वागायचं नाही हे बंधन आपल्यावर कोण आणि का म्हणून टाकतं? इतर लोकांच्या आणि स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करताना, जगासोबत पळताना कधीतरी रस्त्यावरून पळण्याची साधीसुधी शर्यत लावून धावत सुटावं असं वाटलं तर आपण का नाही धावत? आपल्याला हवं तसं जगणाऱ्या माणसाला, स्वप्नात रमणाऱ्या माणसाला, भावनांनी सजलेल्या माणसाला जर चार भिंतीत राहणारी माणसं मॅड असं विशेषण वापरत असतील तर मला हे विशेषण आनंदाने स्वीकारून विशेष आयुष्य जगायला आवडेल.
कुठेतरी हरवलेल्या बालपणासोबत हरवलेली स्वप्न, भावना, खोड्या, आठवणी असं सगळं लंपनने माझ्या मनाच्या अंगणात पुन्हा आणून टाकलं. तसंच ते प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगणात सुद्धा आहे. आता या साऱ्या गोष्टी रद्दीवाल्याला विकून टाकून पुन्हा सिमेंटमध्ये जगायचं की त्या गोष्टी मनात मुरवून आपल्यातला लंपन जागा करून कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखरासारखं रंगीबेरंगी आयुष्य जगायचं हे आपल्या हातात आहे.
बाकी लंपन ही मालिका पाहिली नसेल तर एकोणीस गुणिले एकोणीस गुणिले एकोणीस टक्के सुंदर अनुभव अनुभवायला विसरू नका! छोटया छोटया गंमती तुमचं भावविश्व सुद्धा नक्की समृध्द करतील!
- मैत्रेयी मकरंद सुंकले