जनाबईंचं अवघं आयुष्य विठ्ठलमय आहे. ते रुजतं तेही विठ्ठलात आणि झेपावतही विठ्ठलाकडेच. अशा झेपावतानाचा प्रवास, बहर हे सुद्धा त्याच्या कृपेनेच! हे झेपावण म्हणजेच त्यांचं आयुष्य. मग त्या एकटीच्या वाटेवर विठू आला नसता तरच नवल. भक्तांप्रित्यर्थ ब्रीद राखणारा देव ही तर पांडुरंगाची कीर्ती. त्यामुळे त्याचं जनाबाईंच्या आयुष्यात असणं आणि केवळ असणं नव्हे तर साक्षात सोबत होऊन राहणं हा श्रद्धेला चमत्कार वाटणार नाही. कारण त्याचं ब्रीद तो अठ्ठावीस युगे पाळतो आहे त्याचाच हा आविष्कार. पण विठ्ठलाने केलेली जनाबाईची सोबत लोकविलक्षण आहे. ते ऋणानुबंधच अनन्यसाधारण आहेत. किती म्हणून सोबत करावी देवाने जणाबईंचे कितीतरी अभंग विठ्ठलाने केलेल्या सोबतीचे अनुभव सांगतात. तो जनाईसाठी दळण दळतो, कांडण करतो, झाडलोट करतो, पाणी भरतो, आपली भक्त जे जे म्हणून करते त्यात तिची अविश्रांत सोबत करतो. काय असेल याचं कारण जनबईची अनन्य भक्ती हे याचं कारण आहेच, पण देवाला असलेला भक्ताच्या सोबतीचा लोभ हे देखील तितकंच ठोस कारण म्हणता येईल. तो भावाचा लंपट आहे, म्हणून तर वैकुंठाहून इथे आलाय! असं जनाबाईंनीच म्हटलं आहे. त्यामुळे त्याच्या मदत करण्यामागे लोभ आहेच, पण तो लोभ भक्ताच्या सोबतीचा आहे अभक्ताच्या नव्हे. म्हणून त्याचा लोभ आणि जनाबाईची भक्ती दोन्ही कारणं त्याच्या येण्यामागे स्पष्ट आहेत. असाच एक अभंग.. त्याच्या येण्याचा. आपलं चिरवैभव विसरून केवळ भक्तासाठी मृण्मय होऊन जाण्याचा. जनाबाई सांगतात -
साळी कांडायास काढी । चक्रपाणी उखळ झाडी ॥१॥
नामदेवांच्या घरी दासी असल्यामुळे जनाबाई दिवसभर अविश्रांत परिश्रम करतात. त्यांच्या एक एक अभंगांमधून कामांची नावं काढली तरी देखील त्या कोणकोणती कामं करत याची जाणीव होईल. इथे त्यांना साळी कांडायची आहे. त्या ती काढत आहेत तोवर विठ्ठलाने उखळ झडायला देखील घेतली! कुणी काम करतंय त्यात त्याला मदत करणं वेगळं आणि ती व्यक्ती काय काम करेल हे ओळखून आधीच आपण ते करणं वेगळं. इथे विठ्ठलाने हे ओळखलं आहे. यातच त्याच्या भक्तवत्सलतेची प्रचिती आहे! जनाबाई जी विशेषण वापरतात ती देखील कमालीची बोलकी आहेत. बघा ना, उखळ कुणी झाडलीय, तर चक्रपाणीने! ज्याच्या हाती चक्र शोभून दिसतं तो त्याच हस्ते उखळ झाडतो.. यातच तर खरी गंमत आहे भक्तीची!
कांडिता कांडिता । शिण आला पंढरीनाथा ॥२॥
म्हणे कांडता कांडता वीर्यवान विठ्ठल शिणून गेला! कदाचित त्याला थोडीच याची सवय असणार म्हणून हा शीण. इथे देव शिणतो पण भक्त मात्र शिणत नाही. ती करत राहते आपली अटळ कामं. ती शिणत नाही कारण विठ्ठल हेच तर तिचं बळ! हे विसरता येणार नाही. शिणल्यावर काय झालं तर
कांडीताना घाम आला । तेणे पितांबर भिजला ॥३॥
जो पितांबर भक्तांचे अश्रू पुसल्याने भिजतो तो आज घामाने भिजला आहे. किंबहुना आपल्या भक्तांनी अश्रू गाळू नयेत म्हणून त्यांचा देव घाम गाळतो! या भिजलेल्या पितंबराचा वास म्हणजे देवाकडून आलेला भक्तीचा सुगंध आहे.
तो कष्टाने शिणलाय, घामाने भिजलाय, पण म्हणून त्याने काम थांबवलं नाहीय. तो कोंडा पाखडतो आहे. कसा दिसतोय हे करताना
पायीं पैंजण हातीं कडी । कोंडा पाखडोनि काढी ॥४॥
इथे सुद्धा विस्मयकारी विरोधाभास चितारला आहे. त्याच्या पायी सोन्याचे पैंजण किणकिणत आहेत हाती चमकणारं कड लखलखतय. पण पाखडतो मात्र कोंडा!! पण आता मात्र काम करून करून त्याच्या हाताला चक्क फोड आला.
हाता आला असे फोड । जनी म्हणे मुसळ सोड ॥५॥
तो फोड पाहून जनाबाई विठ्ठलाला मुसळ सोड सांगतात नव्हे तशी आज्ञाच देतात. हा त्यांचा अधिकार, देवावरचा हक्क. वाटलं, दासी असल्याने त्या साळीवर वा मुसळावरही त्यांचा हक्क नसेल, पण विठ्ठलावर मात्र आहे! प्रेमाचा, भक्तीचा हक्क आहे. आपल्याला लाख कष्ट पडोत, पण देवाला दुःख नको म्हणून प्रसंगी देवाला आपल्याला मदत करणं थांबव असं सांगणं ही जनाबाईची भक्तप्रचिती.
देवाचे कष्ट पाहून आपल्याला मदत करणं सोड असं त्या म्हणू शकतात म्हणूनच तर देवाने त्यांना धरून ठेवलं आहे! जीवाजवाळ धरलं आहे. जनाबाईंचा अधिकार इतका मोठा कसा, याचं कारण इथेच दडलं असावं..
- पार्थ जोशी