अपयश आणि विचार

युवा विवेक    25-May-2024
Total Views |


अपयश आणि विचार

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. लवकरच दहावीचा देखील जाहीर होईल. बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं खूप अभिनंदन आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी खूप शुभेच्छा! आपल्यापैकी अनेकांच्या परिचयातील काही मुले चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असतील. काही मुलांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील किंवा एखाद - दुस-या विषयात काही जण अनुत्तीर्णही झाले असतील. उत्तीर्ण मुलांना यश मिळाले आणि अनुत्तीर्ण मुलांना अपयश मिळाले असंही आपल्याला म्हणता येतं. पण त्या यशापयाशाचा विचार करणं आणि न करणं यावर ब-याचशा गोष्टी अवलंबून असतात. विचार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण अगदी झोपेत असलो तरी विचार करण्याची प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे विचार टाळणं वास्तविक अशक्य आहे. यश मिळाले की, माणूस फारसा विचार करत नाही. कोणतंही यश माणूस हसत स्वीकारतो. अपयश मात्र अधिकाधिक विचार करायला भाग पाडतं. त्या विचारांचा एका विशिष्ट मर्यादेनंतर त्रास होतो. पण अपयशाकडे संधी म्हणून आपण पहायला हवे. आत्ता आलेलं अपयश ही पुन्हा नव्याने उभारी घेण्याची संधी असते. सकारात्मक विचार करावा, असं अपयश आल्यावर अनेकजण म्हणतात. पण मुळातच सकारात्मकता आत्मसात करण्याजोग्या एका स्थानावर विचार आणणं अवघड असतं. म्हणूनच, अपयश आल्यावर प्रथम सकारात्मक विचाराकडे वळण्याआधी विचारातील नकारात्मकता शोधायला हवी. ती दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे विचार आपोआपच सकारात्मकतेची कास धरतील.

एखाद्या व्यक्तीला अपयशापेक्षा त्या अपयशाच्या परिणामांचा विचार करुन नैराश्य आलेलं असतं. हा आयुष्याचा महत्वाचा टप्पा होता, तो आपल्या हातून हुकला किंवा समाजात एक माणूस म्हणून माझं आता काय स्थान राहील वगैरे विचारांचा कल्लोळ माजतो. हे परिणाम म्हणजे विचारातील नकारात्मकता! हीच नकारात्मकता विचारांपासून विलग करता आली म्हणजे विचारांना नवी दिशा मिळते. नवीन संधी शोधण्याचा माणूस प्रयत्न करु लागतो. नवी दिशा आणि नव्या संधीचा शोध ही विचारातील सकारात्मकता! नकारात्मक आणि सकारात्मक या दोन गोष्टींच्या मधोमध विचार येऊन थांबतात तेव्हा टोकाचं पाऊल उचलायचं धाडस माणूस करतो. अखंड तेवत राहणा-या दिव्याला नंदादीप म्हणतात. विचार नंदादीपाप्रमाणे असतात. म्हणूनच, अपयशाचा सतत केवळ निरर्थक विचार करत बसण्यापेक्षा ते येण्यामागची कारणे सातत्याने शोधत त्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातून जाणवणा-या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे यशाकडे आपण आपोआपच मार्गक्रमण करतो. एखाद्या दिवशी भूकेपेक्षा अधिक अन्न खाल्लं की अपचन होतं. अपचन झाल्यावर आपण लंघन करतो म्हणजेच लागलीच आपण अन्न खात नाही. पण अपचन झालं म्हणून कुणी अन्नाचा त्याग करत नाही. दुस-या दिवशी आपण पुन्हा नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतो. तसंच काहीसं विचारांचं आहे. अपयशानंतर लागलीच आलेल्या विचारांकडे फारसं लक्ष न देता एकूणच विचारांचं लंघन करता आलं की, कुठलंही टोकाचं पाऊल उचलायचं धाडस आपण करणार नाही. जीवनाचा त्याग करण्यापेक्षा जगावंसं वाटणा-या प्रत्येक गोष्टीशी मैत्री केली की, जगण्याची ओढ वाढते. दु:खामागून सुख आणि दु:खामागून सुख येणं हा अगदी सगळ्या सजीवसृष्टीसाठी निसर्गाने निर्माण केलेला अलिखित नियम आहे. अवघं ऋतूचक्र एकामागून एक येत असतं. त्या सहा ऋतूंचा त्रास करुन घेण्याऐवजी निसर्ग त्यांच्याशी मैत्री करतो.

पौर्णिमेनंतर अमावस्या, अमावस्येनंतर पुन्हा पौर्णिमा येते. ओहोटीनंतर भरती येते, भरतीनंतर ओहोटी येते. पण म्हणून समुद्र थांबत नाही. वेगवेगळे तरंग घेऊन तो पुन्हा पुन्हा किना-याकडे येतो. शिशिरातली पानगळ कित्येक वृक्षांना निष्पर्ण करते. पण वसंत ऋतू आला म्हणजे त्या वृक्षाला पुन्हा पालव्या फुटतात. हळूहळू नवी पाने तयार होतात. वसंतातच कोकिळेला सूर गवसतो. संध्याकाळी कोमेजणार हे फुलाला ठाऊक असतं. पण तरीही कळीचा एकेक पदर उलगडत पाकळ्या उमलतात. त्या फुलाला रस, रुप, गंध मिळतो. बागेत येणा-या वा-यासमवेत ते मजेत डोलतं. आपल्याला स्पर्श करणा-या प्रत्येक हातावर ते फूल सुगंध ठेवत असतं. हे सारं आल्हाददायक वातावरण असतानाच ऐन उन्हात पावसाची सर येते. पण म्हणून दुस-या दिवशी फूल उमलायचं थांबत नाही. सृष्टीतल्या या साध्या सोप्या गोष्टीत कित्येक प्रश्नांची उत्तरं दडलेली असतात. त्यासाठी सृष्टीचं अविरत निरीक्षण करावं लागतं. जीवनाचं असंच साधं, सोपं पण अविरत निरीक्षण करत राहिलं म्हणजे कित्येक प्रश्नांची उत्तरे सहज सापडतात.

अपयश आलेल्या व्यक्तीने खांडेकरांचं 'अमृतवेल' वाचावं, पाडगावकरांची 'बोलगाणी' गुणगुणावीत, बालकवींच्या कविता म्हणाव्यात .. पण खचून जाऊ नये. या वाचनामुळे, गाणी म्हणण्यामुळे अपयश अगदी पूर्ण विसरता येईल, असं नाही. पण विचारातल्या नकारात्मक आणि सकारात्मक या दोन गोष्टीतलं अंतर शोधण्याचं यश आपल्याला निश्चितच मिळेल. हे अंतर ओळखता आलं म्हणजे यशाकडे जाणारी एखादी वाट आपल्याला निश्चितच सापडेल..

-
गौरव भिडे