मावडी..! भाग - ११

युवा विवेक    24-May-2024
Total Views |


मावडी..! भाग - ११

प्रवीणचा उपचार आता खूप छान सुरू झाला होता. तो उपचाराला छान प्रतिसाद पण देत होता. प्रवीणचे गावातील मित्र आता मैदानी चाचणी देऊन आले होते अन् सगळेच चांगल्या गुणांनी लेखी परीक्षेच्या पात्रता यादीत बसले होते.

त्यामुळे आता तेही पूर्णवेळ अभ्यास अन् फक्त अभ्यास करत होते. यावेळी गावात चार-पाच मुलं महाराष्ट्र पोलीस दलात भरती होणार हे नक्की होतं. हे सगळं प्रवीण बघत होता अन् आपल्या मित्रांसाठी अन् त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी तो त्यांच्यावर खूप खुश होता.

इकडे विशाल अन् विशालचे फाऊंडेशन चालवणारे मित्रही प्रवीणच्या उपचारासाठी मेहनत करत होते. रोज नवीन नवीन पद्धती शोधून प्रवीणसाठी निधी कसा उपलब्ध होईल याची सर्व तयारी करत होते. विशाल अन् मावडी एकमेकांना जीवापाड प्रेम करत होतेच, सोबतच भावाच्या उपचारासाठी दोघेही पैसे उभे करत होते. विशालच्या रूपाने देवच मावडी अन् तिच्या आईच्य मदतीला आला होता.

विशालचा मोकळा स्वभाव अन् समाजाचे आपण काही देणं लागतो ही प्रामाणिक भावना अन् त्यासाठी तो करत असलेले प्रयत्न यामुळे विशालवर सगळेच खुश होते. प्रवीणलाही विशाल अन् मावडीबद्दल कळून येत होतं पण; त्यांचं प्रेम खूप प्रामाणिक असल्याचेही दिसून येत होतं म्हणून तो ही खुश होता.

हळूहळू सर्व पूर्वपदावर येत होते. विशाल समाजातील बऱ्याच धनवान लोकांना भेटून प्रवीण अन् त्याच्या परिस्थीतीबद्दल सांगत होता. एकूण वास्तव दुर्दशा पाहून अनेकदा धनवान लोकं प्रवीणच्या उपचारासाठी मदत करत होते. या काळात प्रवीणची दोन्ही ऑपरेशन झाले होते.

तो ही आता थोडाफार फिरू लागला होता अन् हळूहळू सर्व पूर्ववत झालं होतं. विशाल अजूनही प्रवीणचे घर चालवण्यासाठी त्यांना पैसे देत होता. सुख-दुखात त्याच्यासोबत होता. मावडीच्या आईला पण आता बरं वाटू लागले होते अन् ती ही वेळ भेटल तसं लोकांच्या शेतात जाऊ लागली होती.

मावडीच्या लग्नाच्या गोष्टी आता पुन्हा सुरू झाल्या होत्या, लग्नसराईचे दिवस सुरू झाले होते. गावात चर्चा झाली होती की विशाल अन् मावडी यांचं लग्न होणार आहे पण; याबद्दल अजूनही दोघांकडून इतरांना काही सांगितल्या गेलं नव्हते. सध्या फक्त त्यांनी प्रवीण कसा बरा होईल याबद्दल विचार करणे योग्य समजले होते.

एक दिवस मावडीच्या आईने विशालला घरी बोलावून घेतले अन् चार पाहुण्यात मावडीशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. विशालने त्याचे मावडीवर असलेलं प्रेम अन् तिने हलाखीच्या परिस्थितीत आपल्या आई अन् भावाला दिलेली साथ. वेळप्रसंगी केलेलं लोकांच्या शेतातील मजुरी काम अन् तिचा एकूण सगळा भूतकाळ जाणून घेत तिच्याशी लग्न करण्याचे ठरवलं. असंही तो मावडीशीच लग्न करणार होता.

यापूर्वी त्यांना प्रवीणचे तिसरे अन् शेवटचे ऑपरेशन करायचे होते अन् त्यासाठी ते पैसा कसा उभा राहील याचा पुन्हा विचार करू लागले होते. हळूहळू पैसा उभा राहत गेला अन् काही सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रवीणचे तिसरे ऑपरेशन झाले अन् प्रवीण हळूहळू चालू लागला.

विशाल अन् मावडी यांनी एकमेकांना दिलेलं वचन पूर्ण झालं होतं अन् आता दोघांच्या घरात त्यांच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू झाली होती. इकडे पोलीस भरतीची लेखी परीक्षा होऊन निकाल लागले होते अन् प्रविणचे चार मित्र एकाच भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली होते. लग्नाची तयारी सुरू झाली अन् साधारण महिनाभराने दोघांचे लग्न झाले. अन् एक दुःखी संसार लग्ना आदी वाचवत त्यांनी त्यांचा सुखी प्रेमाचा संसार नव्याने सुरू केला.

 

भारत लक्ष्मण सोनवणे.