नसें राम ते धाम सोडूनि द्यावे..

युवा विवेक    23-May-2024
Total Views |


नसें राम ते धाम सोडूनि द्यावे...

 
भारतीय संस्कार संस्कृती आणि एकूण जीवनशैली ही नेहेमीच विलासाची नसून विकासाची आहे, उपभोगाची नसून त्यागाची आहे, हा त्याग दु:खकारक नसून संयम शिकवणारा आहे. हा त्याग कर्माचा नसून कर्म-फळाचा आहे, केवळ लौकिक कर्म-फळाचा नसून कर्म-फळाच्या आंतरिक इच्छेचा आहे.. तसा तो असाराचा आहे, अविवेकाचा आहे, आळसाचा आहे, दंभाचा आहे, आसक्तीचा आहे... जेव्हा जेव्हा म्हणून पृथ्वीतलावर धर्माला ग्लानी येते, अधर्म तोंड वर काढू पाहतो तेव्हा तेव्हा धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुरितांच्या संहारासाठी परमात्मा जन्म घेतो असं वचन श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिलेलं आहे व त्याच्या आधीच्या रामावतारासाठीही हे किती सहजी लागू होतं व याही अर्थाने 'त्या' च्या वचनाला काळाची सीमा नसते असं मनोमन वाटतं. जणू रावणादि राक्षसांचा थयथयाट चालू असताना रामाने जन्म घेतला तो भर दुपारी मात्र लहानपणीच इच्छा केली ती चंद्राची, त्रस्त झालेल्या मानवांच्या जीवनाला शीतलता देण्याची, आस धरली ती जणू पुढील अनंत काळात जन्म घेणार्;या मानवांच्या सूर्यासारख्या प्रखर प्रारब्धाला चंद्राइतकं सौम्य करण्याची. जणू म्हणूनच तो महाविष्णुचा रामावतार आपल्या भक्तांसाठी 'रामचन्द्र' झाला..

संस्कृत साहित्यात एक सुंदर सुभाषित आहे ते म्हणजे -

 

यावत् स्थास्यान्ति गिरयः सरितश्च महीतले।

तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ॥ 35 ॥

 

जोपर्यंत पर्वत, नद्या आहेत तोपर्यंत रामायण कथा लोकांमधे प्रसिद्ध राहील. अर्थात, जोपर्यंत माणसाचं अस्तित्व आहे तोपर्यंत रामकथा ही केवळ राहणार नाही तर लोकांमधे प्रसिद्ध राहील. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती तुमची-आमची किंवा सामन्यांची कथा नसून आदर्शाच्या आदर्शाची अर्थात रामाची कथा आहे. ती कथा रामाची असल्याने तिचं केवळ स्मरण पुण्यदायक आहे. ती मुळी नित्य वाचनाची, प्रात:स्मरणाची वाल्मिकी ऋषींची प्रत्येक मानवाला लाभलेली नितांत सुंदर शब्दभेट, भावभेट आणि श्रद्धाभेट आहे... ही श्रद्धा आहे ती परमेश्वरावरची, राघवावरची तशी मानवी वर्तणूकीला सोनेरी बांध घालून सजवणार्‍या नीतीमूल्यांवरचीही...



रामायण म्हणजेच रामाचं आयन किंवा प्रवास. ह्या रामकथेचं वाचन, चिंतन, स्मरण मानवांना सर्वार्थाने कृतार्थ करणारं आहे. ही रामकथा तटस्थ राहून वाचणं भारतीय मनाला मुळी शक्यच नाही. रामकथा वाचताना आपण त्यात केवळ गुंतत जात नाही तर खर्या अर्थाने रमत जातो कारण रघुकुळ तिलक असलेला तो राम प्रत्येकाला 'आपला' वाटत राहतो. कदाचित म्हणूनच भारताच्या कित्येक भागांतल्या कित्येक संतांनीही आपल्या भाषेत, आपल्या बोलीत ही रामकथा कौतुकाने गायली. जसा श्रीराम अभिजात संस्कृत साहित्यात दिसतो तसा तो बोली भाषेतल्या लोकसाहित्यातही दिसतो. लोकसाहित्यात काही ठिकाणी तर मूळ रामकथा बदलून लोकांनी आपलंच दु:ख त्यातून मांडलं आहे, जणू अभिव्यक्तीसाठीही त्यांना आधार वाटला तो 'त्या'चाच, खऱ्या अर्थाने ही कथा स्विकारु इच्छीणार्या प्रत्येकाचा तो होऊन जातो अगदी संपूर्णपणे, इतका की त्याची कथाही भक्तांना आपलीच वाटू लागते... जणू शोधू लागतो प्रत्येक भक्त आपल्या आत, खोलवर रामनामात तल्लीन असलेल्या नित्य तृप्त व सेवाव्रती वानर सैनिकाला आणि धन्यता मानतो 'त्या'च्या स्मरणात... जणू तेच हिताचं असल्याने समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

 

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।

कथा आदरे राघवाची करावी॥

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।

सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

 

बुद्धीवर लौकिकाच्या क्षणिक सुखांच्या प्रभावाखाली चाल करू पहाणार्‍या मनालाच इथे सांगितलं आहे की जनी मौनमुद्रा धारण करुन रहावं अर्थात नको त्या गप्पांमधे काहीच साध्य होत नसल्याने किंबहुना ऊर्जा नष्ट होत असल्याने अडकू नये. मग काय करावं तर समर्थ म्हणतात की मांगल्याचा गाभा असलेल्या श्रीरामाची कथा भक्तीयुक्त, आदरयुक्त अंत:करणाने आपण इतरांकडून ऐकावी, आपण इतरांना सांगावी किंवा आपणच आपल्याला सांगत राहावी. ह्या रामाच्या, रामभक्तीच्या प्रेमवर्तुळात नित्य राहायचच मात्र जिथे राम नाही ते धामही सोडून प्रसंगी भक्तीसुखासाठी अरण्यातही जायची तयारी ठेवायला हवी. ही खर्या अर्थाने रामभक्तीत अखंड लीन असलेल्या लक्ष्मणाची भूमिका वाटते...



जीवनाला व्यापून राहिलेल्या परमार्थाचं दर्शन घडवणारी आणि परमार्थासाठी आदर्श ठरलेल्या जीवनाचं दर्शन घडवणारी ही रामकथा खर्या अर्थाने श्रुतींना तृप्त, वाचेला सौम्य, मनाला शांत, बुद्धिला विवेकी आणि जन्माला सार्थ करणारी ठरते हेच खरं...

 
- अनीश जोशी