मावडी..! भाग- ८

युवा विवेक    02-May-2024
Total Views |


कागद

 

प्रवीणचा असा अपघात होणं त्याच्यासोबत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी, मित्रांच्यासाठीसुद्धा खूप वाईट होतं. त्यांचं पोलीस भरतीची तयारी करण्यातही मन लागत नव्हते पण इतक्या दिवसांनी आलेली पोलीस भरतीची जाहिरात अन् या जाहिरातीमध्ये जर आपण भरती नाही झालो तर पुन्हा वाईट दिवस वाट्याला येतील या कारणाने मुलं मन मारून तयारी करत होते. परिस्थितीशी दोन हात करत काळजी करत लढत होते. यावर्षी गावातील पाच सहा मुलं सैन्यात, पोलीस दलात भरती होईल असं गावकऱ्यांना वाटत होतं अन् मुलंही त्याच तयारीने जोशात पण प्रवीणचे असे झाले म्हणून काळजी घेतच तयारी करत होती.

एक दिवस सांज सरली मैदानी सराव करून मुलं आपआपल्या घरी जाऊन जेवणं करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असलेल्या नेहमीच्या खोलीत अभ्यासाला आली. अभ्यास करायला लागली पण; अभ्यासात काही केल्या त्यांचं मन रमत नव्हते. अश्यावेळी त्यांना प्रवीणची आठवण येऊ लागली होती, आपल्या मित्रावर सध्या असलेली वाईट परिस्थिती त्यामुळे आपण त्याच्या वाईट काळात त्याला काहीतरी आर्थिक मदत करावी. जेणेकरून त्याच्या उपचारांवर होणारा त्याचा आर्थिक खरचं काही थोडाफार कमी होईल असं प्रवीणच्या सगळ्या मित्रांना वाटले.

त्यामुळे सर्व मित्रांनी पोलीस भरतीची तयारी करत असताना जेव्हा जेव्हा ती मुलं कामाला जात होती तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रवीणला दवाखान्याला थोडेफार पैसे दिले पण इतक्या पैश्यात काही भागणार नव्हते म्हणून काहीतरी करायला हवं जेणेकरून प्रवीणचे पुढील उपचार सहज होईल असे मुलांना वाटत होतं.

मग मुलांनी हफ्त्यातून दोन दिवस प्रवीणसाठी द्यायचे ठरवले मुलं प्रवीणच्या उपचारासाठी गावोगावी वर्गणी गोळा करत फिरू लागले. कुणी दहा-पाच कुणी पाच-पन्नास रुपये देऊ लागले. एखाद्या देवाच्या कार्याला म्हंटले की सहज शे-पाचशे काढून देणारे लोकं इथे एका गरीब तरुणाच्या उपचारासाठी मात्र दहा-पाच रुपयापेक्षा जास्त पैसे कुणी देत नव्हते. पण; प्रवीणचे हे मित्र हिम्मत हरणाऱ्यामधील नव्हते, ते पैसे गोळा करून प्रवीणच्या उपचाराला मदतच करत होते.

इकडे अर्धी अधुरी आजारी असलेली आई अन् मावडीसुद्धा लोकांच्या इथे जे काम भेटल ते करायला जात होत्या कित्येकदा तर कामाच्या मोलापेक्षा त्यांना कमीच पैसा देऊन गावातील लोकं त्यांच्याकडून जास्तीचे काम करून घेत होती.

कित्येकदा तर नाल्या खोल्याच्या रानात मावडी अन् तिची माय लोकांच्या इथे अंधार पडेस्तोवर कामाला जात होती. कारण इतकंच होतं मावडीचा भाऊ अन् एक आईचा लेक बरा व्हावा अन् यासाठी त्या दोघी जीवापाड झटत होत्या. या सगळ्यात मावडीच्या लग्नाचा विचार मागे पडला होता अन् कदाचित तिलाही सध्या हे सगळं नको होतं एकदा भावाला बरं लागले की करेल लग्न या विचाराने ती आजचा दिवस उद्यावर ढकलत होती. प्रवीणच्या मित्रांची प्रवीणसाठी असलेली भटकंती चालूच होती पण इतकं भटकूनही फार पैसे हाताला नव्हते.

प्रवीणचा अपघात होऊन पंधरा दिवस सरले होते. घरातल्या किराणा पाण्याचा खर्च अन् प्रवीणचे उपचार हे सगळं करण्यात मावडी अन् तिच्या आईचा हिशोबी कुठलाही ताळमेळ लागत नव्हता. पैसा कमी अन् आदीक कमीच पडत होता. नेहमीप्रमाणे दिवस सरला अन् प्रवीणचे मित्र भर दिवसभर लाही लाही करणाऱ्या उन्हातून गारवा अनुभवत रहावं म्हणून सांजेला पारावर बसली होती.

गप्पांना अन् विषयांना खूप उत होता पण प्रवीणच्या उपचाराचा विषय काही केल्या त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. काहीतरी ठोस पावले उचलायला हवी असं प्रवीणच्या मित्रांना वाटलं अन् ती सगळी तयारीला लागली. काय करायला हवं..? या प्रश्नाला उत्तर म्हणून एक एक जण व्यक्त होऊ लागला अन् ठरलं गावच्या सरपंच अन् मोठ्या लोकांना प्रवीणबद्दल सांगून त्यांच्या माध्यमातून अन् त्यांच्या ओळखीतून मदत निधी गोळा करायचा.

ठरल्याप्रमाणे मुलांनी सरपंच अन् गावातील आर्थिक बाबतीत थोडफार चांगले असलेल्या लोकांशी प्रवीणबद्दल बोलून घेतलं. फुल न फुलाची पाकळी अशी मदत गावातील मान्यवर मंडळींनी प्रवीणच्या उपचारासाठी केली.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.