.. तरी अखंड जात रहावे क्लासेसला!!

युवा विवेक    19-May-2024
Total Views |


.. तरी अखंड जात रहावे क्लासेसला!!

आज, ३० एप्रिल. शाळेचा रिझल्ट! पाचवीतले अक्षय आणि सर्वेश हे अगदी घट्ट मित्र. यामुळे त्यांच्या आयाही छान मैत्रिणी झाल्या होत्या. रिझल्ट घेतल्यानंतर अक्षय आणि सर्वेश दोघेजण आपल्या मित्रमैत्रीणींसोबत शाळेच्या ग्राउंडवर खेळायला गेले. पुढे दिड महिना तिथे खेळता येणार नव्हतं. अक्षयची आई मानसी आणि सर्वेशची आई सुजाता दोघी जणी रिकाम्या वर्गात मस्त गप्पा मारत बसल्या. शाळेत बसल्यावर आयांच्या गप्पांचा विषय म्हणजे अर्थातच मुलं! सुरुवातीला रिझल्टबद्दल बोलणं झालं, टिचर्सबद्दलही (कडू गोड!) बोलणं झालं, मग मानसी सुजाताला म्हणाली -
"सर्वेशला कुठल्या क्लासेसला घतलंस गं? आणि काही चांगले क्लास माहितीयेत का? सांग ना.."
"क्लास ना, विचारच नाही केला अजून क्लासचा. बघू आता ड्रॉइंगचा लावेन तो म्हटला तर." सुजाता उत्तरली.
"म्हणजे अजून एकही क्लासला घातलं नाहिस मुलाला?" आश्चर्यचकीत होऊन मानसीने विचारलं.
"नाही.." सुजाताने अगदी सहज सांगितलं.
"काय? अजून नाही? अगं आता महिना होईल मुलांना सुट्टी लागून.." हे बोलताना मानसीच्या डोळ्यांमधले भाव बघण्यासारखे होते. सुजाताने काहितरी फार मोठा अक्षम्य अपराध केल्यासारखी ती तिच्याकडे बघून बोलत होती.
"अगं अक्षयला तर तीन क्लास लावलेत मी. अजून एकाची चौकशी करुन आलीये." सुजाता सांगत होती.
"तीsन? बापरे! आणि तरीही अजून क्लास माहितीयेत का विचारतीयेस?" मानसी जरा आश्चर्याने आणि हसून विचारत होती. एवढे कोणते क्लास लावलेत?"
"अगं तीन तर लावलेत. मगाशी बघ आपल्याशी बोलून गेल्या त्या मिसेस जोशींच्या मुलीचे तर तीन क्लास झालेसुद्धा महिन्याभरात. आता आणखी तीन लावतायत त्या. अक्षयला बघ, एक पेंटींगचा लावलाय, एक संस्कार वर्ग आणि एक रीडिंग वर्कशॉप कोर्स आहे. एक स्विमिंगचा लावायचाय आणि अजून एखादा स्पोर्ट क्लास लावायचा म्हणतेय आता."
सुजाता हे कुतूहलाने ऐकत होती.
"मला बोललीस म्हणून ठीके. इथे कुणाला सांगू नकोस हां क्लास लावला नाही म्हणून. हसतील तुला." मानसी काळजीने सांगत होती.
वेदांनी सांगितलेल्या पंच महापापांपैकी एखादं आपण केलं की काय असं उगाच सुजाताला वाटू लागलं! ती हसलीच.
"अगं काय गरज एवढ्या क्लासेसची? तुच सांग. रिडिंग वर्कशॉपमधे जे वाचून घेतात आणि कम्पल्सरी वाचायला लावतात ते आपण घरी करुच शकतो की. उलट घरी केलं तर मुलांना आवडत्या विषयाची पुस्तकं आणून देऊ शकतो. ते कायम रहातं सुद्धा सोबत. खरं हे मी खूप वर्षांपासूनच करते. रोज आमचे वीस मिनीटं वाचनाचे असतात. सुट्टीत सर्वेशला मी अर्धा-पाऊण तास वाचायलाच लावते दुपारचं. आणि सुधा मूर्तींची पुस्तकं हाती पडल्यापासून तो तर स्वतःहूनच वाचतो आता. संस्कार वर्ग चांगलेच असतात, पण संस्कार हे घरीच तर करायचे असतात! रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगणं, काही स्तोत्र म्हणून घेणं हे आपणच तर करायचं असतं. मी हे सर्वेशसाठी करतेच, पण त्याच्या मित्रांना पण सांगते. आणि स्विमिंगचं म्हणशील तर आमच्या सोसायटीच्या स्विमिंग टँकला जातो तो रोज, म्हणजे ट्रेनर पण असतात तिथे. त्यामुळे अजून क्लासच नाही लावला कोणता." सुजाता सांगत होती.
"मग दिवसभर काय करतो तो?" मानसीला भारी उत्सुकता होती.
"काही नाही. सकाळी नाश्टा झाल्यावर मस्त खेळायला जातो खाली मित्रांसोबत. मग डायरेक्ट जेवायलाच घरी येतो. दुपारी मग आमचं वाचणं होतं मग जरावेळ झोप. उठल्यावर मग चार पाच दिवस स्विमिंगला जातो. मग पुन्हा खाली खेळतात सगळी मुलं. संध्याकाळी घरी आला की मी देवासमोर दिवा लावून तुझ्या भाषेत ‘संस्कार वर्ग' घेते. त्याचे मित्रमैत्रिणीही आवडीने येतात. सध्या गीतेतला बारावा अध्याय पाठ करुन घेतीये मुलांचा. मग रात्री आम्ही घरी कॅरम खेळतो, पत्ते खेळतो, पत्त्यांचा बंगला करतो, मज्जा येते खूप!" सुजाताचं असं सांगणं मानसीला फार नवलाईचं वाटत होतं.
"ए किती छान! मी पहिल्यांदाच ऐकतीये असं. उगंच क्लासला घातलं असं वाटतंय आता मला." मानसी मनापासून म्हणाली.
"असं नाही गं, आता चित्रकला वगैरे आपण थोडीच शिकवू शकणार आहोत? आपली चित्र नसून विचित्रच असतात! पण बाकी गोष्टी आपल्याला शक्य आहेतच की! म्हणजे मुलांना तितक्या लांब जाणं येणं यातही किती दमून जातात मुलं. सुट्ट्यांमधेच तर भरपूर मोकळा वेळ मिळतो मुलांना, त्यातही कुठे गुंतवून ठेवायचं?" सुजाता म्हणाली.
"खरंय गं तुझं. मी असा विचारच केला नव्हता. आता वाटतंय की अक्षयलाच विचारावं की कोणता क्लास करायचाय? तो म्हणेल तिथेच जाऊदे त्याला उगाच कम्पल्शन नकोच." मानसी जराशी पश्चातापानेच म्हणाली.
"आणि मी हे पण ठरवलंय, की सर्वेशला दर आठवड्यातून दोन दिवस तरी कुठे कुठे बाहेर घेऊन जायचं. म्हणजे अगदी भाजी मार्केटपासून, टेकडीपासून ते अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमापर्यंत. वेगवेगळे अनुभव त्याला त्याच्या परिने घेऊ द्यायचे. आपण फक्त catalyst व्हायचं बघ." सुजाताने सांगितलं.
"वॉव. किती छान आयडिया आहे! अक्षयला पण आवडेल. आपण एकत्रच जायचं का? मुलांना पण आवडेल."
मानसीने आनंदाने विचारलं.
"त्यात काय विचारायचं? चालेलच की! मग तिकडून आल्यावर मुलांना छोट्या छोट्या रेसिपीज पण शिकवते मी!" सुजाताचे प्लॅन्स रेडी होते.
"वाह! एक काम करते, मी अक्षयला सुजाता मावशीच्या क्लासलाच पाठवते आता." मानसी हसत हसत म्हणाली.
"पाठव की, पण क्लास नाही, स्वैर, सहज आणि आनंद घेत शिकण्यासाठी. खरं शिकण्यासाठी पण नाही, आनंद करण्यासाठी! मज्जा करण्यासाठी.. आणि तू पण ये की. धमाल करु आपण!"

- पार्थ जोशी