निसर्गाच्या कुशीत आणि खुशीत..

युवा विवेक    18-May-2024
Total Views |


निसर्गाच्या कुशीत आणि खुशीत..

निसर्गात असणारे निरनिराळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. या एकमेकांच्या गरजेपोटी म्हणा किंवा गरजेपोटी असलेल्या नात्यामुळे म्हणा पण निसर्ग अजून तसा ब-यापैकी टिकून आहे. मानव, झाडे-वेली, आकाश, डोंगर, जमीन, पाणी, पशु-पक्षी वगैरे सर्व घटक मिळून निसर्ग असतो. पण हे जरी असले तरी निसर्ग अधिक मोठा आहे, वेगळा आहे. निसर्ग हा विशिष्ट अशा मर्यादित घटकांत बांधून ठेवता येत नाही. म्हणूनच, त्याचं वेगळेपण आपल्याला जाणवतं. चिमणी नावाचा पक्षीच बघा ना, लहानपणी एक घास चिऊचा असतो. हा पक्षी इवलासा असल्यामुळे आपणही इवलेसे असताना त्याचं महत्व जाणवतं. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकणारी चिमणी संध्याकाळ झाली म्हणजे आपल्या घरट्यात परत जाते. चोचीत मावेल इतकं अन्न थोडं थोडं करत ती घरट्यात घेऊन जाते. तिला आपल्या पिल्लांना किती आकाराचा घास भरवावा हे शिकवावं लागत नाही. त्या पिलाच्या चोचीत आपल्या चोचीने हळूहळू ती ते दाणे भरवते. कावळा हा पक्षी देखील कुणाच्या खिडकीत पोळी ठेवलेली आहे, हे बरोबर शोधून ठेवतो आणि रोज तिथे जाऊन काव काव करतो. संत ज्ञानेश्वरांनी तर या कावळ्याला शकुन सांगणारा पक्षी म्हणून आपल्या अभंगात स्थान दिलेलं आहे. दारात किंवा दाराजवळच्या खिडकीतून काव काव असं त्याचं बोलणं ऐकलं की, आपल्याकडे पाहुणा येणार हे समजून जावं. कबूतर हा पक्षी काहीसा खट्याळ आहे. ह्या पक्ष्याला काहीशी लाडीगोडी लावावी लागते. पोपट हा पक्षी तिखट मिरची खाऊनही मात्र स्वभावाने गोड असतो. माणसासारखे बोलायला त्याला आवडते. घार आपल्या घरावरुन केवढाल्या घिरट्या घालते! त्यामुळे ती धीट असते, असेच म्हणावे लागेल. बगळा, बदक, सारस वगैरे पक्षी सौंदर्य जन्माला येतानाच घेऊन येतात. कोकिळ ही तर विश्वगायिका आहे. आपण बरेचदा म्हणतो, एक माणूस दुस-या माणसासारखा नाही. पण हे पक्षीच बघा ना, आहे का एक तरी दुस-यासारखा ?


पशु ह्या गटात बसणारे सगळे जीव जन्मत: सावधच असतात. माणसाची चाहूल लागताच अगदी लगेच धूम ठोकतात. अर्थात, यात जंगली आणि पाळीव प्राणी असे दोन प्रकार असल्यामुळे जंगली प्राणी तसे धीटच असतात. पण पाळीव प्राण्यात मांजर देखील धीट असते. खिडकीतून पटापट उड्या मारून कोणत्या स्वयंपाकघरात दूध असेल याचा अंदाज तिला येतो. सावधगिरीने आणि तेवढ्याच धीटाईने दूध पिऊन शेजारच्या घरी उंदीर शोधायला ती पसारसुद्धा होते! कुत्रा हा मालकाच्या आज्ञेशिवाय आणि त्यापेक्षाही अधिक त्याचे हात फिरवून लाड केल्याशिवाय जागचा हलतदेखील नाही. शिकारी मांजर आणि शिकारी कुत्र्याचा स्वभाव मात्र याउलट असतो. वाघ, सिंह, बिबट्या, तरस, हरिण, गवा, कोल्हा वगैरे जंगलात राहणारे प्राणी आपल्या जंगलाचं एक वेगळं विश्वच निर्माण करत असतात. गवळी लोक सकाळी लवकर उठून म्हशीचं दूध काढतात. पण म्हशीला दूध काढणा-याचा स्पर्श फार बारकाईने टिपता येतो. नवीन कुणी दूध काढायला आला की, सुरुवातीला ती शेपट्यानी एक फणकारा मारते. गाय ही तशी गरीब असते. पण तिलाही आपल्या मालकाकडून लाड करुन घ्यायला आवडतं. बैल हा शेतक-याचा मित्र म्हणजे खरंतर जिगरी दोस्तच! हे सारेच पशु-पक्षी आपले मित्र आहेत.


सहा ऋतूंशी घट्ट मैत्री असणारा घटक म्हणजे झाडे.. सहा ऋतूंत वेगवेगळं हवामान असतं. पण आपल्या विविध अवयवांच्या आधारे या प्रत्येक हवामानात झाडे आपल्या जगण्यात बदल करतात. नवीन पालवी फुटणे, पानापानाने एकेक फांदी वाढणे, त्याला फुले - फळे येणे, विशिष्ट काळानंतर कळ्या येणे थांबणे, हळूहळू पानगळ सुरू होणे. अशा विविध अवस्थेतून झाडे सहा ऋतूंतही आपलं अस्तित्व टिकवतात. एकेक फूल आणि त्या फूलातील एकेक भाग म्हणजे सौंदर्याने वेढलेली ठिकाणे असतात. रस, रुप, रंग आणि गंध हे झाडांचे स्वभावच म्हणता येतील. हजारो प्रकारची झाडे असली तरी नुसत्या पानाचा आकार देखील किती वेगवेगळा असतो, नाही का! अलीकडच्या काळात पर्यावरण वाचवा, पर्यावरण टिकवा वगैरे गोष्टींना महत्व आलेलं आहे. ते टिकवण्यासाठी प्रयत्न करणे किंबहुना, ते टिकवायचं आहे याची जाणीव होणं हे खरंच कौतुकास्पद आहे. पण मी आता ज्या वास्तूत बसून हा लेख लिहतो आहे नि तुम्ही ज्या वास्तूत बसून तो वाचत आहात, तिथे काही वर्षांपूर्वी असंख्य झाडे, पशुपक्ष्यांची घरे होतीच. पण दुर्दैवाने ती पाडून आपण म्हणजे मानवानी तिथे आपली घरे बांधली. आता तिथे झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश लोकसंख्यावाढीच्या अडचणीमुळे अपुरा पडत आहे. वास्तविक, प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. पण लोकांना पर्यावरण वाचवा हे उपदेश करून परत आपापल्या ऑफिसात जाऊन प्लॅस्टिकच्या कपात चहा पिणे, हे काही योग्य नव्हे. याऐवजी आपण आपल्या जगण्याचा झाडे, पशु-पक्षी, निसर्ग, पर्यावरण वगैरेबाबत विचार करुन सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करायला हवा. निसर्गाच्या कुशीत आहोत म्हणूनच आपण खुशीत आहोत, याची जाण प्रत्येकाने ठेवली तरी पुरेसं आहे..


- गौरव भिडे