हळूहळू कित्येक शेकडो हात प्रवीणच्या आजारपणात त्याच्या उपचारासाठी आता सढळ हाताने मदत करत होती. एरवी प्रवीणचे पोलीस भरती करणारे मित्रही आता मैदानी चाचणीसाठी कसून तयारीला लागले होते. काही दिवसांनी मैदानी चाचणीसाठी त्यांना उपस्थित रहायचं असल्याने तेही आता प्रवीणच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी मदत करू शकत नव्हते.
विशालने मदतीसाठी एक चांगला मार्ग शोधला होता अन् तो त्यापद्धतीने पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न करत होता. कित्येक योजनांच्या माध्यमातून तो पैसे गोळा करत होता, सोबतच शहरातील कित्येक धनी मंडळी तसेच समाजकार्यात वाहून घेतलेल्या व्यक्तींना प्रवींनच्या उपचारासाठी पैसे देण्याचं आव्हान करत होता. हे सगळे पैसे मिळविण्यासाठी असलेले अनेक मार्ग अवलंबून विशालचे मित्र हळुहळु पैसा जमवत होते.
प्रवीणचा उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये काही योजना आहेत का यासाठी विशाल दिवसरात्र प्रयत्न करत होता. हळूहळू प्रवीणवर उपचार सुरू झाले होते अन् प्रवीण उपचाराला छान असा प्रतिसादसुद्धा देत होता. ज्या कुठल्या मार्गाने प्रवीणच्या उपचारासाठी पैसे उभे करता येईल त्या मार्गाने विशाल ते उभे करत होता.
या त्याच्या कार्यात त्याने रात्रंदिवस मेहनत घेत अनेकांच्या भेटी घेऊन पैसे उभे केले होते. अगदी शहराच्या आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक अन् समाजातील समाजसेवक अश्या सगळ्यांच्या माध्यमातून विशाल प्रवीणच्या उपचारासाठी पैसे उभा करत होता. हे सर्व पैसे उभे करण्यासाठी विशालला प्रवीणची आई अन् मावडीची पण मदत होऊ लागली होती.
कुठेही मदत मागण्यासाठी जायचं असेल तेव्हा मावडी विशाल सोबत प्रवीणचे कागदपत्रं घेऊन सोबत जात होती. कारण ती ही दोन वर्ग शिकलेली होती अन् आपल्या भावाच्या उपचारासाठी कोणी तरुण मुलगा अहोरात्र मेहनत करून पैसे उभा करत आहे तर त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आपल काम आहे असं मावडीला वाटू लागले होते.
या कारणास्तव मावडी विशालसोबत बऱ्याच ठिकाणी त्याच्यासोबत जात होती. हळुहळु का होईना मावडी अन् विशाल प्रवीणच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाला उभे करत होते. आता वेळीच दिलेल्या उपचारामुळे झोपून असलेला प्रवीण आता हळूहळू जागीच उभे राहून बसू शकत होता.
आता मात्र गावात मावडी अन् विशालच्या या अनोख्या संगतीची गावात चर्चा सुरू झाली होती. वास्तविक पाहता तसं काहीही नव्हते पण; गावातल्या काही तरुण पोरांनी या विषयाला फाटे फोडले अन् एकाचे दोन करत विशाल अन् मावडी यांचे वेगळेच उद्योग सुरू आहे असे गावातल्या लोकांना सांगून टाकले. मावडी अन् विशाल यांना याचे काहीही वाटत नव्हते, दोघे अहोरात्र मेहनत करून प्रवीणच्या उपचारासाठी पैसे उभे करत होते.
या काळात माझेही विशालसोबत प्रवीणच्या घरी जाणे झाले. प्रवीणचा उपचारासाठी असलेला प्रतिसाद बघता आता छान बदल जाणवत होता अन् हळूहळू प्रवीण पूर्ववत होईल असेही वाटू लागले होते. या सगळ्यात हळूहळू तीन महिने कसे निघून गेले कळलं नाही.
एक दिवस मी ही प्रवीणच्या उपचारासाठी काही निधी गोळा करायचा म्हणून विशालसोबत एका मान्यवर व्यक्तीला भेटायला म्हणून गेलो असता विशालने मावडीच्या प्रेमात असल्याची कबुली दिली. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते अन् यात मला काही वावगे असे वाटलेही नाही.
दोघे काही चुकीचं करत नव्हते, त्यांनी ठरवले होते की प्रवीण जोवर पुन्हा पूर्ववत चालत नाही तोवर त्याच्या उपचारासाठी पैसे उभे करायचे अन् तो जेव्हा उपचारांनी व्यवस्थित होईल तेव्हाच आपल्या जीवनाची घडी बसवायची. अन् ते या विचारांना जागत होते अन् प्रवीणच्या उपचारासाठी पैसे जमवत होते.
भारत लक्ष्मण सोनवणे.