वाराणसी/बनारस/काशी - १

युवा विवेक    10-May-2024
Total Views |


वाराणसी/बनारस/काशी - १

जगातल्या सर्वांत जुन्या शहरांपैकी एक शहर! परंपरा, इतिहास आणि संस्कृतीने व्यापून टाकलेले हे शहर. रांझनामध्ये एक गाणं आहे, "बनरासिया" त्यात हा एकच शब्द वेगवेगळ्या तालात, आलापात आणि अर्थांनी वापरला आहे. हा लेख लिहायला घेतला तेव्हा डोक्यात तेच गाणं वाजत होतं. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने या गावाला 'वाराणसी' हे नाव मिळाले. शहर, महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास 'काशी'/'काशिका' हे नाव पडले. काशीमध्ये गंगाकिनारी बांधलेले तब्बल एकूण ८८ घाट आहेत.

स्कंद पुराण या इस पूर्व ५०० ते ९०० वर्षे जुन्या पुराणात काशीचे वर्णन आढळते. त्या काशीखंडात वाराणसीतील शैव मंदिरांचे वर्णन आहे. येथे काशी विश्वनाथ मंदिर होते. हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर क्रूर कुतुबुद्दीन ऐबक याने पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली. अकबराच्या काळात तोरडमल या अभिमानी राजाने इथे मंदिर पन्हा बांधले. परंतु क्रूर आणि धर्मांध औरंगजेब याने हे मंदिर परत पाडून टाकले. अनेक शतके तशीच गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. राजा रणजितसिंग या हिंदू देशाभिमानी राजाने त्याच्या मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा चढविला होता. परंतु तो मुघलांनी लूटमार करून नेला. सवाई जयसिंग या विज्ञानप्रिय राजाने इ.स. १७३७ मध्ये बनारसमधील मानमंदिर येथे वेधशाळा उभारली होती. इ.स. १७८३च्या आधीपासून काशीवर इंग्रजांचे राज्य होते. १६ व्या शतकात येथेच संत एकनाथानी "एकनाथी भागवत" हा वारकरी संप्रदायाचा महान ग्रंथ लिहिला.

काशी येथील विद्वान आणि अभ्यासू लोकांच्या वास्तव्यामुळे भारतातले पहिले गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज इ.स. १७९१ साली स्थापन झाले. येथे पारंपरिक व आधुनिक खगोलशास्त्रांतील अभ्यास होत असे. आज येथे बनारस हिंदू विद्यापीठ आहे. काशी शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. प्रख्यात भारतीय संतकवी कबीर, रविदास आणि राम चरित मानस लिहिणारे तुलसीदास हे शहराचे रहिवासी होते. इतका मोठा इतिहास हा शहराला आहे आणि बराच इतिहास आपल्याला माहीतही नाही.

हजारो वर्षांपासून मानवाचे अस्तित्व आणि प्रगत संस्कृती यामुळे इथली खाद्यसंस्कृतीही तशीच समृद्ध आहे. इतक्या वर्षांत झालेल्या आक्रमणांमुळे बराच बदल झाला असला तरी काही पदार्थ आपली गादी सांभाळून आहेत. वाराणसी नाव घेतले कि डोळ्यासमोर साधू, संत, विद्यार्थी यांचे शहर उभे राहते. हे लोक पूर्वीच्या काळी तरी "साधी राहणी, उच्च विचारसरणी" या तत्वाला धरून राहत, त्यामुळे त्या काळी त्यांचे जेवणही सात्विक असावे. शिवाय इथे बरेच लोक अंतिमसंस्कार किंवा बाकी धार्मिक विधी करण्यातही येतात त्यामुळे त्याला सुसंगत असे मिळत जेवण मुख्यत्वे मिळत असणार. असा माझा अंदाज होता पण थोडे संशोधन केल्यावर समजले कि इथे खवैय्ये लोक आहेत. आसपासच्या बिहार आणि बंगालच्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव इथे जाणवतो. अगदी प्रसिद्ध पदार्थ सांगायचे झाले तर कचोरी-सब्जी, बाटी चोखा/लिट्टी चोखा, वेगवेगळे चाट, छोरा मटर, मलाईयो नावाचा गोड पदार्थ, मलाईयो लौंगलता, थंडाई, टमाटर चाट, छेना दही वडा इतके आहेत आणि शेवटी बनारसी पान!

इथे येणाऱ्या लोकांसाठी अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः शाकाहारी पदार्थ जास्त मिळतील. जैन लोकांचे वास्तव्य जास्त असल्याने कांदालसूण नसलेले सात्विक भोजनही सहज मिळते. माझा अंदाज बरोबर होता पण तरीही आता इथे अनेक परदेशी लोकही येतात त्यांच्यासाठी असे बरेच नवीन प्रकार सुरु झाले आहेत. दिल्लीसारखीच इथे नुसती कचोरी खात नाहीत तर सब्जीसोबत खातात. दही चटणी वाले गोलगप्पे मिळतात. हे दहीपुरीचे भावंडं असावे. हे सगळे एका लेखात सांगणे अशक्य आहे त्यामुळे आपण २-३ भागात जाणून घेऊ. तोपर्यंत बनारसशी संलग्न असलेले सिनिमे, गाणी आठवा.