सरोजिनी नायडू - एक अपूर्व राजकीय प्रतिभा!

युवा विवेक    07-Apr-2024
Total Views |

 
सरोजिनी नायडू - एक अपूर्व राजकीय प्रतिभा!

सरोजिनी नायडू हे नाव भारतीय मनाला अपरिचित नाही. पण पूर्ण परिचितही नाही. स्वातंत्रलढ्याशी असलेला त्यांचा मोलाचा व निकटचा संबंध आपण जाणून आहोत. कदाचित त्या एक उत्तम कवयित्री होत्या हेही आपल्याला अस्फुट ठाऊक आहे. पण याचसोबत त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक कसदार पैलू होते.

Women's day म्हटलं, की आपल्याला आठवतो तो ८ मार्च दिवस. संयुक्त राष्ट्राने जाहिर केलेला हा दिवस महत्वाचा आहेच, पण याचसोबत लक्षात ठेवायला हवा तो भारताचा राष्ट्रीय स्त्री दिवस किंवा National women's day.

भारतासाठीचा हा दिवस असतो १३ फेब्रुवारी. त्याचं कारण असं, की हा दिवस सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस. खरंतर यातूनच त्यांच्या महतीची व्याप्ती लक्षात येते.

भारतात स्त्री किती मागासली आहे असा विचार करणाऱ्या पाश्चिमात्यांना आणि देहाने एतददेशी असलेल्या पाश्चिमात्यांनाही भारतीय स्त्रीचे प्रबळ प्रखर रुप दाखवणाऱ्या नायडू भारतेतिहासात महत्वाच्या आहेत. अर्थात् एवढं मोठं कार्य करणाऱ्या त्या पहिली स्त्री नाहीत. त्याहीपूर्वी अशा अनेक स्वयंसिद्धा निःसंशय होऊन गेल्या आहेत. पण टोपिकरांच्या राजवटीत त्यांचं व्यक्तीमत्व हे त्यांच्यासाठी आणि भारतीय स्त्रियांसाठीही महत्वाचं होतं.

सरोजिनी नायडू (पूर्वाश्रमीच्या चट्टोपाध्याय) यांचा जन्म झाला तो हैद्राबादमधे, एका बंगाली कुटुंबामधे. १३ फेब्रुवारी १८७९ रोजी. अघोरेनाथ चाटोपाध्याय आणि वरदा सुंदरी देवी हे त्यांचे आईवडिल. त्यांना कवितेचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला असावा. त्यांनी शिक्षण मद्रास आणि पुढे केंब्रीजमधे जाऊन पूर्ण केले. १८९८ मधे त्यांचा विवाह गोविंदराजुलू नायडू यांच्याशी झाला तर जयसूर्य, पद्मजा, रणधीर व लीलामणी ही त्यांची अपत्ये. सरोजिनी नायडू या अतिशय प्रख्यात वक्त्या झाल्या होत्या. १९०६ मध्ये कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय सामाजिक परिषदेला त्यांनी संबोधित केले. १९१४मध्ये त्या महात्मा गांधींना भेटल्या. तेव्हाच आपल्याला आपल्या राजकिय वाटेवरची प्रेरणा मिळाली, असं त्या म्हणत असत. हळूहळू त्यांची राजकिय कारकीर्द बहरू लागली आणि त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्षा आणि INC परिषदेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून गणल्या गेल्या. नायडू यांचे अनेक मोठ्या लोकांशी निकटचे संबंध होते. महात्मा गांधी, गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर आणि सरला देवी चौधरी अशी काही नावे यात प्रामुख्याने घेता येतील. दांडी यात्रेमधे सामील व्हायची परवानगी महिलांना नव्हती. पण इतर काही महिलांसोबत नायडूंनी गांधीजींना विनवणी करुन अखेरीस बापूजींनी अनुमती दिली. तेव्हा गांधीजींना अटक झाल्यावर मोहिमेच्या नेतेपदाची पताका त्यांनी नायडूंकडे सोपवली. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना २१ महिने तुरुंगवास भोगावा लागला. याआधीही त्यांनी तुरुंगवास भोगला होता.

काही काळानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. तेव्हा त्या महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. पुढे १९२५मधे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजकिय क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. तोही कवितेच्या आशयघन रम्य प्रांतात. राजकारण सांभाळत इतकं संवेदनशील अर्थवाही लिहिता येणं हे आश्चर्यच आहे. त्यांच्या कविता मुळात इंग्रजीत लिहिलेल्या आहेत. नंतर भारतीय भाषांमधे त्याचे अनेक अनुवादही साकारले गेले. इतकंच नाही, तर त्यांच्या कविता या पाश्चिमात्य जगातही दखलपात्र ठरल्या. म्हणून काही त्या श्रेष्ठ ठरतात असं नाही. त्या मुळात वाड्मयीन गुणांनी संपन्न आहेतच, त्यात भारतीय इंग्रजी लेखन पाश्चिमात्य जगात वाचलं जाणं हा योग जुळून आल्याने त्यांचे साहित्यातले स्थान अढळ ठरले. त्यांच्या कविता या विशेष महत्वाच्या आहेत. कारण असं, की त्यात भारतीय संस्कृतीचा स्पर्श आहे. भारतीय प्रतिकं आहेत. इथल्या परंपरांचा जिव्हाळ वास त्यांना आहे. त्यामुळे इंग्रजीत लिहूनही त्यात भारतीय संवेदना जोपासलेल्या पाहून त्या काळात अशा कवितांचं असलेलं महत्व विशेषत्वाने जाणवतं. 'द गोल्डन थ्रेशहोल्ड' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. ‘द बर्ड ऑफ टाईम’ (१९१२) व ‘द ब्रोकन विंग’ (१९१७) हे काव्यसंग्रहही त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांच्या एवढ्या मोठ्या लोकोत्तर कामगिरीबद्दल त्यांना 'भारत कोकिला' हे बिरुद स्वतः महात्मा गांधींनी दिले. त्यामागे त्यांची दर्जेदार कविता, तिची गेयता आणि आशयघनताही होती.

अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याची सुवर्णमोहोर समर्थपणे उमटवणाऱ्या या शक्तीला वंदन करणं म्हणजे दुर्गा आणि सरस्वतीची अर्चना एकाच स्मरणात साधल्यासारखं वाटतं.