गुणनिधी श्रीराम...

युवा विवेक    18-Apr-2024
Total Views |


गुणनिधी श्रीराम...

संत नेहेमीच माणसाला परमेश्वराचा व त्या योगे उत्तम जगण्याचा मार्ग दाखवतात. हा मार्ग आपल्याला दिसत राहतो तो बुद्धी प्रकाशित करणार्‍या शब्दांतून, त्यांमधे पेरलेल्या अर्थातून आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून उसळणाऱ्या भावलहरींमधून. तेव्हा भाषेचीही मर्यादा राहत नाही. कदाचित बुद्धिला अर्थ आणि मनाला अनुभव पटला की तो विचार 'आपला' होऊन जातो... संत तुलसीदासजी एका दोह्यात म्हणतात -



तुलसी साथी विपति के, विद्या, विनय, विवेक।

साहस, सुकृत, सुसत्य-व्रत, राम-भरोसो एक॥



जीवनाचा विचार हा नेहेमीच आपल्यासारख्या सामान्यांच्या दृष्टीने सुख-दु:ख, स्तुती-निंदा, शीत-उष्ण असा द्वंद्वात्मक करता येतो. अशा या जीवनात जसे सुखाचे सोहळे येतात तशी संकटंही येतात. या संकटांना माणसाला तोंड द्यावं लागतं; मात्र हे करत असताना तुलसीदासजी म्हणतात की संकटाच्या वेळी माणसाला विद्या ,विनय ,विवेक साहस, चांगलं कर्म, सुसत्य-व्रत आणि रामावरचा विश्वास हे गुण सहाय्य करतात. अशा प्रकारे जरी या दोह्याचा अर्थ होत असला तरी काही ठिकाणी या दोह्याचा अर्थ हा - संकटांना योग्यरित्या तोंड देण्यासाठी लागणारे विद्या, विनय ,विवेक, साहस, चांगलं कर्म, सुसत्य-व्रत हे गुण केवळ एका श्रीरामावरच्या विश्वासाने प्राप्त होतात... असा घेतल्याचं दिसून येतं. याचबरोबर आपल्याही नकळत आपल्याला ( गुणांच्या रूपाने ) संकटात सहाय्य करणारा रामावरचा अतिदृढ विश्वास असतो किंबहुना स्वत: श्रीरामच असतो असा देखील एक अर्थ घेता येऊ शकतो. 'राम भरोसे' या वाक्प्रचाराचा वापर इथे दिसून येतो किंबहुना या वाक्प्रचाराचा उगम या दोह्यातून झाला असल्याची अस्पष्ट शक्‍यता जाणवते. याचबरोबर इतक्या कमी शब्दांत विश्वास व्यक्त करणार्‍या या वाक्प्रचाराचा अर्थ किती चुकीच्या दिशेने बदलत गेला हे प्रकर्षाने जाणवतं...

दुसर्‍या प्रकारे अर्थ लक्षात घेता असं दिसून येतं की हे सगळे गुण देणारा केवळ राम आहे. अगदी साधी गोष्ट आहे की मानावी पातळीवरदेखील आपल्याकडे जे आहे तेच आपण इतरांना देऊ शकतो, जे नाही त्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र गुणांच्या बाबतीत ते देण्यासाठी त्यांच्या केवळ असण्यापेक्षा त्यांचं दृढत्व गरजेचं असतं. गरजेची असते ती त्यांच्याप्रति असलेली असीम निष्ठा आणि तयारी लागते ती त्यांच्यासाठी वेळप्रसंगी मोजायला लागणार्या किमतीची. या गुणांची वाट असते फार चमकदार, सावरणारी मात्र पेलली नाही तर तितकीच कठीण, पाऊल ढळण्याच्या अगणित शक्‍यता खुल्या करणारी. म्हणून हे गुण न्याहाळायचे ते श्रीरामाचेच ,स्विकारायचे ते श्रीरामाकडूनच आणि अंगीकारायचे ते त्याच्याच कृपेने...



श्रीराम आणि गुण हे खरंतर अद्वैतच म्हणता येईल. असा एकही गुण नाही जो श्रीरामाकडे नाही. श्रीरामाच्या उदात्त, प्रसन्न, तेजस्वी चरित्रात अवगुणांना ( श्रीरामाच्याबाबतीत ) यत्किंचितही स्थान नाही किंबहुना श्रीरामाने ज्या-ज्या विचारांचा, आचारांचा, मार्गांचा लौकिक आश्रय घेतला ते जणू सहजी गुणच झाले, हे तर श्रीराममहात्म्य... म्हणून श्रीराम हा सर्वार्थाने आदर्श आहे. 'गुणनिधी' हा समर्पक शब्द देखील श्रीरामासाठी वापरला जातो तो कित्ती यथार्थ आहे हे वेगळं सांगायला नको. अशा या प्रभू श्रीरामाचं वाल्मीकि रामायणात जे सुरुवातीला दर्शन होतं ते रूपदर्शन नसून गुणदर्शन आहे. तो आजही आपल्यासारख्या सामान्यांना त्याच्या गुणांनी, भक्तांना सुखी ठेवण्याच्या, लाभेवीण प्रीती करण्याच्या गुणांनी सतत भेटत असतोच की, मात्र त्याचं भान आपल्याला असतंच असं नाही...



दोह्यात म्हणाल्याप्रमाणे श्रीरामाच्या निर्मळ चरित्रात हे सगळे गुण कितीतरी ठिकाणी दिसतात. विद्या, ज्याने विद्या खर्या अर्थाने शोभून दिसते असा विनय, विवेकाची सुदृष्टी, परहितार्थ केलेलं साहस, कर्मातली विशुद्धता, अखंड शिरोधार्य असलेलं सत्याचं सुव्रत आणि परमेश्वरावरची नितांत श्रद्धा. जरा वेगळ्या दृष्टीने बघताना जन्माचं बंधन हीच दोह्यात सांगितल्याप्रमाणे विपत्ती होते आणि श्रीरामावरचा दृढ विश्वास व त्यायोगे येणारे विवेक, सत्यादि गुण हा त्यावरचा रामबाण उपाय ठरतो... प्रत्येक भारतीयासाठी श्रीराम हा परमेश्वर आहेच मात्र त्याचबरोबर नित्य आदर्शही आहे, प्रपंच परमार्थातला तो सुसंवादी मेळ आहे व त्याचं गुणगान, गुणस्मरण, गुणसंकीर्तन हीच कदाचित जन्माची सार्थकता आहे...

 

- अनीश जोशी.