तारा अथवा मारा!!
संत चोखामेळांची लहान बहीण म्हणजे संत निर्मळा. मेहुणगावी, म्हणजे त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या नदीचं नाव निर्मळा त्यावरून त्यांचंही नाव निर्मळा ठेवलं गेलं. पण त्यांची भक्ती पाहता तीही खरोखर किती निर्मळ होती हे पाहून आपल्याला नवल वाटल्यावाचून राहात नाही. भक्ती किती नितळ निर्मळ असू शकते याचं सुंदर उदाहरण म्हणजे संत निर्मळा. जाती व्यवस्थेची आघाती झळ कितीही सोसावी लागत असली तरीही त्यांची विठ्ठलवरची श्रद्धा मात्र तितकीच दृढ होती. त्यांच्या मनाचा हा निर्मळपणा प्रसंगी तितकाच कणखर होऊन जातीबद्दल, भेदांबद्दल परखडपणे बोलतो हे विशेष आहे. असं विलक्षण कठोर-कोवळेपण त्यांच्या अभंगांतून प्रत्ययास येतं. त्यांचे पती बंका महाराज हे सुद्धा संतच. संत संगती अशी घरातूनच मिळालेली असली, तरी बाहेर मात्र हीनत्वाला सातत्याने सामोरं जाणं त्यांच्यासाठी अटळ होतं. पण अशावेळी सुद्धा 'कां हो पांडुरंगा मज मोकलिलें' असं त्या त्यांच्या विठुरायालाच विचारतात. त्या सावळ्या परब्रह्मावर त्यांची श्रद्धा आहे. केवळ भक्तिमार्गासाठीच नव्हे, तर जगण्याच्या प्रत्येक श्वासासाठी तो आहे हा त्यांचा अढळ विश्वास आहे त्याच्यावर. हा विश्वास किती असावा? किती कोटीचा असावा? हेच सूचित करणारा त्यांचा अभंग -
तुमचा भरंवसा धरोनी मानसीं ।
दृढ पायांसी शरण आलें ॥१॥
निर्मळाबाई विठूच्या पायांशी शरण आलेल्या आहेत. पण हे शरण येणं म्हणजे अगतिकता नाही किंवा साशंकतेने उचललेलं पाऊलही नाही. या शरण येण्यामागे भक्तीचा अतूट भरवसा आहे. 'तो आहे' आणि 'तो माझ्यासाठी आहे' हा दृढ भाव मनात आटीव होऊन आहे. ज्या समाजव्यवस्थेत निर्मळाबाई राहात होत्या, तिथे त्याच्या एकट्याचाच तर भरवसा होता! अन्य कुणाचाही नाही. त्या भरवशाला विठू खरा ठरला असणार यात शंका नाही. म्हणूनच तर ही भरवशाची परंपरा झाली. केवळ झालीच नाही तर सर्वांगी पुलारून टिकून राहिली. हा अभंग म्हणजे संवाद आहे. निर्मळाबाईनी पांडुरंगाशी केलेला संवाद. त्या सांगतात, की मी तुला अशी भरवशाने शरण आले आहे. त्यांचा हे भरवसा तर दृढ आहेच, पण 'त्या'चे अठ्ठावीस युगांपासून भक्तोद्धारासाठी मातीवर ठाम असलेले पाय तेही दृढ आहेत. किंबहुना म्हणूनच भरवसा दृढ झाला असेल. आता मात्र निर्मळाबाई काही विशेष सांगत आहेत -
आतां कळेल तो करावा विचार ।
मी आपुला भार उतरिला ॥२॥
त्या म्हणतात की मी माझा भार उतरवून टाकला आहे. आता मी जे सांगेन त्याचा विचार करावा.. वारकरी परंपरेत देवाला विचार करायला लावणारे भक्त आहेत! म्हणूनच इथे भोळेपण आहे पण अविचारीपण नाही हे महत्त्वाचं! देवालाच विचारलेले प्रश्न, त्याच्याशीच केलेलं भांडण, त्याच्याकडेच विश्वासाने सुपूर्द केलेला निवाडा यावरून तो त्यांच्या आयुष्यात किती अविभाज्यपणे समरसून गेला आहे हे ध्यानी येतं. त्याच्या चरणांशी येऊन निर्मळाबाईंनी स्वतः चाच भार त्याच्या पायांवर उतरवून टाकला आहे. त्या हे सांगूनही न थांबता म्हणतात, की आता माझ्या बोलण्यातून तुला जे कळेल त्याचा विचार करावा.
मांडीवरी मान ठेविली संपूर्ण ।
पुढील कारण जाणोनियां ॥३॥
विठ्ठलाच्या मांडीवर निर्मळाबाईंनी मान ठेवून दिली आहे. 'संपूर्ण' हा शब्द किती महत्त्वाचा आहे! मान ठेवली आहे ती पूर्णपणे. यामुळे, ठेवलीही आणि माझ्याकडेही थोडी आहे अशी शक्यता संभवत नाही. असाही विठ्ठल हा सर्व संतांनी मायबाप मानला आहे. त्यामुळे त्याच मायेच्या नात्याने त्याच्या मांडीवर मान ठेवली आहे. पण कारण केवळ इतकंच नाही. यामागे काही वेगळं प्रयोजन देखील आहे. काय? ते पुढच्या चरणात! असं त्या म्हणतात. जे वाचून आपण स्वाभाविकपणे थक्क होऊन जातो!
निर्मळा म्हणे तारा अथवा मारा ।
तुमचें तुम्ही सारा वोझें आतां ॥४॥
त्या म्हणतात, की मी माझी मान तुमच्या चरणांवर संपूर्णपणे ठेवली आहे. आता मला तारायचं की मारायचं हे तुम्हीच ठरवा. हे ओझं तारून सारायचं की मारुन हे तुम्हीच ठरवा! हा उद्गार किती धिटाईचा आहे! दिखाऊ भोळेपणाचा नाही. 'भक्ती तो कठीण सुळावरील पोळी' या तुकोबांच्या सांगण्यानुसार ती कठीण भक्ती साध्य केल्यामुळेच आलेला हा उद्गार आहे. विठ्ठलापुढे हात जोडून मागण्यांची न संपणारी आवर्तनं करणं किती सोपं आहे. पण त्याच्या चरणी स्वतःला अर्पण करून तार किंवा मार म्हणणारी निर्मळाबाईंची भक्ती. कारण to जे काही करेल त्या आपल्या हिताचंच असणार हा किती मोठा विश्वास यामागे आहे. त्यांनी स्वतःला ओझं म्हटलं असलं, तरी ते 'तुमचे ओझे' आहे हा निर्मळाबाईंचा भरवसा खूप महत्त्वाचा आहे. 'तुमचें तुम्ही सारा वोझें आतां' असं म्हणून त्या थांबल्या असल्या तरी 'आतां कळेल तो करावा विचार' या त्यांच्याच सांगण्यानुसार पांडुरंग मात्र नक्कीच विचारात पडला असणार. 'तारा की मारा' या नव्हे, तर निर्मळाबाईंच्या भक्तीची निर्मळता पाहून, स्तिमित होऊन तो विचारत पडला असणार हे नक्कीच!
या अभंगांचं वैशिष्ट्य म्हणजे तो शेवटपर्यंत वाचकाची उत्सुकता ताणून धरतो. 'आतां कळेल तो' किंवा 'पुढील कारण' असे शब्द पुढच्या चरणाशी औत्सुक्याने घेऊन जातात, आणि शेवटी स्तिमित करतात. या अभंगातून एक प्रसंगच जिवंत होऊन उभा राहतो आपल्यापुढे! त्यात निर्मळाबाईंचं स्वगत असलं तरी त्या स्वागतात 'तो' ऐकत असल्याचा विश्वास जाणवत राहतो आणि यातून आलेलं नाट्य भक्तीच्या तरल उत्कटतेपाशी घेऊन जातं आपल्याला.
सहज प्रश्न पडतो, की या क्षणाला आपलं 'ओझं' इतक्या धिटाईने असं अर्पण करू शकतो आपण?
आणि मुळात, ओझं आपण अजूनही आपलंच समजतो ना??
~ पार्थ जोशी