साई
साई हो, हे एका पदार्थाचे नाव आहे. साई म्हटलं की, आपल्याला शिर्डी आठवते पण उत्तराखंडातील लोकांचा हा नाश्ता आहे. “आज नाश्त्याला आमच्याकडे साई आहे” हे मी पोह्यांच्या चालीवर म्हणून पाहिले आणि ऐकतांना वेगळेच वाटले.
साई गोडही असतो आणि तिखटमिठाचाही असतो. यासाठी तांदूळ धूवून पाण्यात ५-६ तास भिजवावा. बासमती तांदूळ घेऊ नये. तांदूळ भिजवल्यावर, लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरे, धणे यासोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. खूप बारीक वाटू नये. मिश्रणात मीठ, तिखट, हळद टाकून मिसळून घ्यावे. डोश्याच्या पिठापेक्षा किंचित जास्त पाणी टाकून पातळ करावे. मोहरीच्या तेलात मग हे मिश्रण हळूहळू टाकत मिसळत रहावे. थोडे पाणी शिंपडून, वाफवून परतावे. २-३ वेळा वाफवल्यावर तांदूळ छान शिजतात. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
पाककृतीसाठी साहित्य कमी लागत असले तरी वेळ लागतो. पदार्थ फसण्याची संधी तर खूपच आहे. थोडक्यात हा तांदळाचा सांजा आहे. माझ्या एक आजी (आजीची बहिण) उपजे नावाचा पदार्थ बनवायच्या. तो पण असंच तांदूळ भिजवून, वाफवून बनवायच्या. त्यात मुगाची डाळही असायची. साईची रेसिपी पाहून मला उपजे आठवले. तांदूळ-पाणी यांचे प्रमाण, परतण्याचा स्पीड, वाफवण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी साई बनवतांना महत्त्वाच्या आहेत. साधा नाश्ता बनवण्यासाठी इतकी मेहनत घेण्याची तयारी, वेळ आणि कौशल्य सर्वांकडे नसते. हे अनुभवी लोकांचे काम आहे. उकडपेंडी किंवा फोडणीची कणिक जमत असेल तर त्या आत्मविश्वासावर हा पदार्थ बनवावा.
गोड प्रकारात तांदूळाचे पीठ घेऊन थोड्या पाण्यात भिजवावा पण कणकेसारखे मळायचे नाही. कढईत जितके कोरडे पीठ त्याच्या अर्धे माप तूप टाकावे. तांदूळाचे भिजवलेले पीठ गरम तूपात टाकून सतत परतावा. हळूहळू पीठ मोकळे होते. रंग थोडा ब्राऊन झाला की पीठीसाखर मिसळून परतावे. परत झाकण ठेऊन वाफवावे. सोनेरी रंग आला की साई तयार झाला! साई बनवायला वेळ लागतो पण चव अप्रतिम असते.
गोड साई म्हणजे तांदूळाचा शिरा किंवा गोड सांजा! अर्थात ही सुद्धा सोपी पाककृती नाहीच, संयम हवा. अजून वेगळ्या पद्धतीही आहेतच. रोज बनवण्यासारखी ही पाककृती नसल्याने कधीतरी किचनमध्ये प्रयोग करायची इच्छा झाली तर लहान माप घेऊन साई बनवून पहा.
Regards,
Sanika Bhokarikar