ईश्वरनिष्ठांची मांदियाळी

भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक राज्यात आपल्याला संतांची मोठी मांदियाळी दिसते.

युवा विवेक    23-Mar-2024   
Total Views |
 
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
                                                                                                  ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
   'हे राष्ट्र देवतांचे' ही भारतभूमीची ओळख खरोखरंच सार्थ आहे, विशेष आणि एकमेवाद्वितीयही आहे. या भूमीला अक्षय्याचं स्वयंभू अधिष्ठान आहे, सर्वमंगलाच्या सौम्यसुखद किणकिणीचे अखंड निनाद आहेत, जाणिवेचा सार्वकालीन सुगंध आहे, आणि जन्मानेच लाभणारी स्वसाक्षात्काराची तहान आहे. ही भूमी केवळ भूमी नाही, हा मूलचैतन्याचा अविष्कार आहे, शक्तीस्वरुपाचं प्रकटीकरण आहे आणि त्यायोगे अखिल विश्वासाठीचा आधार आहे. 'भा' म्हणजे प्रकाश आणि त्यातच म्हणजे प्रकाशात किंवा प्रकाशण्यात 'रत' असलेली ही भूमी आपला अभिमान ठरु नये तरच नवल!
   हे राष्ट्र देवतांचं असलं, तरी रोज कुठे दिसतो आपल्याला देव, आपल्यासारखा? सतेजकांतीने, पितांबरातील नानाविध सुवर्णालंकारांनी आभूषित त्याची मूर्ती कुठे वावरते आपल्यासोबत स्थूल रुपात? पण तरीही.. तरीही आपण त्याच्या मार्गावर चालतो, प्रसंगी फलाशेने आसुसलेल्या अवस्थेत वा कधी निष्काम वृत्तीने त्याला आठवू, आळवू बघतो ते कुणामुळे? ही संतकृपा! सामान्य प्रापंचिकांना परमार्थाचा मार्ग दाखवणारे, आपल्या सामान्य व्यथांवर प्रेमाची पांघरुण घालणारे संत म्हणजे आपल्याला जगवणाऱ्या आणि जागवणाऱ्या संजीवक चैतन्याचं मूर्त रुप वाटतात. तुकारामांनी म्हटले आहेच ना,
'काय या संतांचे मानू उपकार । मज निरंतर जगविती
काय द्यावे यांसी व्हावे उतराई । ठेवता हा पायी जीव थोडा'
   संतांचे अनंत उपकार हे शब्दांत सांगता येण्याजोगे नाहीतच. त्यांच्या कार्याच्या व्यापकतेसमोर आपली सामान्य शूद्रता नित्यमेव जाणवत राहते आणि उतराई होण्यासाठी आपला जीव ओवाळला तरी तो उणाच भासत राहतो. इतकं त्यांचं असाधारण महात्म्य, म्हणूनच हे स्मरण अगत्याचं वाटतं. भारतातील संतांचा विचार केला तरी भक्तिभावाने ऊर भरुन येतो आणि आपले हात आपोआप जोडले जातात. इथे होऊन गेलेल्या संतांची मोजणी तर आपल्या अल्पमतीला अशक्य ठरते. अगदी महाराष्ट्राचा विचार केला, तरी इथली फार मोठी संतपरंपरा पाहून आपण सकृतज्ञ स्तब्ध होतो. अगदी 'संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि समर्थ रामदास स्वामी' या पंचायतनाचा विचार करताही आपण भारावून जातो. महाराष्ट्रातील इतर संतांचा आणि पुढे जाऊन भारतातील संतांचा विचार हा निश्चितच प्रचंड अफाट आहे. संत म्हटल्यावर अध्यात्मिक मार्गदर्शन वा पारमार्थिक प्रवृत्ती यामधे त्यांचं अनन्यसाधारण योगदान आहे हे आपण जाणतोच. पण त्यांच्या कार्याची सीमा निश्चितच इथपोत मर्यादित नाही. समाजाची अत्यंत सशक्त अशी सामाजिक आणि सांस्कृतिक बांधणी, ही त्यांच्याच तर कार्यातून झाली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या, तुकाराम महाराजांच्या वाड्मयातून प्रपंच नेटका करण्याचा सुबोधही मिळतो. प्रवृत्ती आणि निवृत्तीची सुगम सांगड भारतभरातील संतांनी नेमकेपणाने घातलेली आणि पोहोचवलेली दिसते. समाजाची घडी व्यवस्थितपणे बसवण्याचं काम हे त्या त्या काळातील संतांनीच तर केलं! विशेष म्हणजे लोकभाषेतून केलं. त्यासाठी प्रसंगी लोककलेचाही हात त्यांनी पकडला. आत्मभानाच्या सखोल शाश्वत जाणिवेसोबत नीतिमूल्यांचं यथोचित भान, सदाचाराची अंमलबजावणी आणि स्वकर्मपालनाचा मार्ग यांचा आर्तउत्कट पुकार संतांइतक्या नितळपणे आणि मोठ्या प्रमाणावर बाकी कुणी केलेला दिसत नाही. व्यावहारिक सत्तेमधे जगताना समाजाचं यथायोग्य भान ठेवणं, सामाजिक जाण असणं, सहवेदना जोपासणं, भूतदया कायम ठेवणं या गोष्टींची पेरणी संतांनी केलेली आहे. आपल्या वाणीतून, साहित्य आणि उपदेशामधून समाजमनाची मशागत त्यांनी केली. एखादं बीज हे जसं सूर्याच्या दिशेने वर आणि मातीमधे खाली, असं दोन्ही बाजूंनी वाढत जातं, तसाच माणसाचा विकासही प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही बाजूंनी व्हावा किंबहुना तो एकाच वेळीस साधणं शक्य आहे असं समर्थांनी नेहमीच उपदेशिलं आहे.
   आज आपला समाज सुसंस्कृत आहे याच्या मुळाशी संतांचे अनुपम योगदान आहे. कारण वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोहो पातळींवर संस्कार करुन संतांनी समाजाला व्यवहारासोबतच आतल्या वाटेवर चालायला शिकवलं. त्यांनी ज्ञानसाधनेसह बलोपासनेला दिलेलं महत्व समाजाला सर्वांगाने सशक्त आणि ऊर्जासंपन्न करणारं आहे. हे सर्व महाराष्ट्रातील संतांबाबतच सिमीत नाही. भारतभरातील संतांनी आपल्या जीवनातून या मूल्यशिकवणींचा सर्वदूर प्रसार केला. गुजरातचे नरसिंह मेहता असतील किंवा महाराष्ट्र आणि गुजरातला जीवनोन्नतीच्या आर्त हाळीने जोडणारे चक्रधर स्वामी असतील, कर्नाटकचे बसवेश्वर, आंध्रप्रदेशाचे वेमन्न हे सारेच संत लोकोत्तर पुरुष आहेत. भक्तीआंदोलनाचे तमिळनाडूतील प्राचीन प्रवर्तक नम्माळवार, बंगालचे चैतन्य महाप्रभू आणि सिंधचे अनेकानेक सुफी संत या साऱ्यांनीच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न पाहिले, त्यासाठी ते अतोनात झटले आणि केवळ भोगविलासांत न रमता त्यांनी समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. पंजाबातील गुरु नानकांनीही आत्मोन्नतीची ध्वजा मनामनांत फडकवली. राजस्थानातील मीराबाईंनी तर भक्तीचा नवा उत्कर्षबिंदूच आपल्या जगण्यातून दाखवला. उत्तर प्रदेशातील संत कबीर, संत सूरदास आणि संत तुलसीदास यांविषयी तर काय बोलावं? त्यांचे दोहे अनेकदा वरवर पाहता सामाजिक भान देतातच पण त्यामधे स्वजाणिवेचा उजेड खोलवर भरलेला पाहून आपण भारावून जातो. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात , प्रत्येक राज्यात आपल्याला संतांची मोठी मांदियाळी दिसते. या देशाच्या प्रत्येक भागातील माती ही त्यांच्या पदांबूजाच्या स्पर्शाने पुनीत झाली आहे. तीर्थक्षेत्रांचा इतिहास पाहता असे लक्षात येते, की जिथे संत जन्मून वा राहून गेले त्या त्या क्षेत्राला तिर्थाचा मान लाभला आहे. वास्तविक पाहता, भारतातील प्रत्येक जिल्हा हा ज्ञात अज्ञात संतांच्या, श्रेष्ठ साधकांच्या सान्निध्याने पावन झालेला आहे. त्यामुळे ही अवघी भुमीच तीर्थक्षेत्र वाटू लागते. अशा दिव्यभूमीत जन्म झाल्याचं समाधान वाटू लागतं. 'दुर्लभं भारते जन्मः' या शब्दांची यथार्थता पटू लागते. पण तेव्हा वाटतं, की यामागे भारतभूमीच्या इतक्या विशेष असण्यामागे हे नानाविध संतच तर आहेत! रविंद्रनाथांच्या व्याख्येप्रमाणे 'भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा' असणारं हे संतमंडल म्हणजे अनंत पिढ्यांसाठी लाभलेलं दैवदत्त वरदान आहे. बहुतांशी सगळ्याच संतांनी आपापल्या भाषेमधे साहित्यनिर्मितीही केली. त्यांचे अभंग, ओव्या, पदं, दोहे, सारं काही भारतीय माणसाच्या मनीमुखी दरवळत आहे. त्यातूनच तर शाश्वताचा प्रकाश त्याला आतून खुणावत राहतो आणि अंतःप्रेरणेची कमी कधीच पडत नाही. महत्वाचं, म्हणजे या संतांनी माणसाला परावलंबी कधीच केलं नाही. आपल्याच पाया पडावं अशी त्यांची अपेक्षा नव्हती की भौतिकाची तहान भक्तांकडून शमवण्याची अभिलाषा नव्हती. त्यांना कोणताही भेद न मानता मुक्तीचा मार्ग दाखवला, स्विकाराचा मंत्र दिला आणि सदाचाराची पेरणी केली. गूढ वाटणार्या तत्वज्ञानाची उकल त्यांनी सोपेपणी आणि तीही लोकभाषेतून केली आणि अध्यात्माचा मार्ग सार्या भेदांना छेद देऊन सर्वांसाठी खुला केला. वैश्विक करुणेने ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या स्नेहाळ हृदयाला समाजाने केलेल्या उपेक्षेचे चटकेही काही काळ बसले, पण म्हणून त्यांनी आपला परार्थ सोडला नाही, की सर्वकल्याणाची प्रार्थना थांबवली नाही. संतांच्या अलौकिक कार्याने घडलेल्या संचिताचा आज समाजाला आणि वैयक्तिकरित्याही प्रत्येकाला आधार आहे. क्षणभर विचार केला, की 'हे सगळे संत नसतेच तर?' या उत्तारातून निर्माण होणारा अंधार आतून अस्वस्थ करुन सोडतो. पण आपल्या सुदैवाने हा अंधार आपल्या नशिबी नाही. कारण संत नसतेच, तर निश्चितच आज आपण इतके सुसंस्कृत नसतो. जडवादात गुंतून आणि गुरफटून गेलो असतो आपण आणि किती परींनी दिशाहीन होऊन अर्थहीन आयुष्य जगत असतो. ते नसते तर झालीही असती आत्ता आहे तेवढी वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानाचा विकासही भरपूर झालाच असता. पण, शास्त्र आणि शस्त्र वापरण्याचा सदासद विवेक मात्र आपल्यापाशी नसता. संतांनी समाजओंजळीत फार मोठं दान दिलं आहे. त्यातलं अगदी प्राथमिक पाहिलं, तर त्यांनी आपल्यातला विवेक जागा केला. म्हणूनच तर आपण प्रगती करत जगतो आहोत. ते नसते तर अर्थातच आपल्यात हा विवेक नसता. आणि ज्याक्षणी माणसातील विवेक नाहिसा होतो त्या क्षणापासून त्याची अवनती शतमार्गांनी सुरू होते. तेव्हा वाटतं, की या संतांचे उपकार फेडायला शतजन्मही उणे पडतील. आपापल्या क्षेत्रांत मोठं कार्य करुन भारताला एक नवी उंची देण्याचं मौलिक काम त्यांनी केलं आहे. भारताच्या अमृतत्वामागे संतांचं फार मोठं संचित आहे. त्यांच्यामुळेच तर अवघ्या जगतात भारत हे अध्यात्माचे आणि संस्कृतीचे विशेष केंद्र म्हणून उभे आहे. भारताच्या नकाशावर प्रत्येक ठिकाणच्या संतांचा विचार करता अवघा नकाशा तेजबिंदूंनी भरुन जातो आणि अलौकिकाच्या प्रकाशाने क्षणात तेजाळूनही जातो. आपले हात आपोआप जोडले जातात आणि त्यांच्या रुपकार्य स्मरणातूनही त्या तेजात आपण तल्लीन होऊन जातो..
~ पार्थ जोशी