पहाडी भुटवा आणि मटण झोल
भुटवा/भुन्नी बनवण्याची सुरुवात बऱ्याचदा लाकडे जमवण्यापासून होते. सगळे मिळून हा पदार्थ बनवतात.
Total Views |
पहाडी भुटवा आणि मटण झोल
आतापर्यंत आपण शाकाहारी पदार्थच पाहिले, आज मात्र मांसाहारी पदार्थांबद्दल जाणून घेऊया. मटण आणि चिकन पहाडी लोकांना आवडते.भुटवा / भुन्नी बनवण्याची सुरुवात बऱ्याचदा लाकडे जमवण्यापासून होते. सगळे मिळून हा पदार्थ बनवतात. मराठवाड्यातील हुरडा पार्टी, खान्देशातली भरीत पार्टीसारखी यांची भुटवा पार्टी होत असते! मटणाचे तुकडे करून, थोडे शिजवले जातात. पारंपरिक पद्धतीत कांदा, टोमॅटो न टाकता बकऱ्याच्या रक्तात मटण शिजवले जाते. सगळे मसाले पाण्यात टाकून त्यात तुकडे टाकून कोरडे शिजवतात. कांदा घालून भुटवा बनवला, तर तो तेलात परतून घेतात. आलं-लसूण, कोथिंबीर, मिरची याचे वाटण आणि टोमॅटो टाकून मसाल्यांसोबत परततात. यात काही पहाडी मसालेही असतात. या ग्रेवीत नंतर मटण शिजवले जाते. आवडीनुसार रेसिपी बदलते. मुख्य चव मसाल्यांच्या प्रमाणाचीच असते. यात कोरडा किंवा ग्रेवी असे दोन्ही प्रकार बनतात. पाटा वरवंट्यावर वाटण बनवणे अजूनही तिकडे पहायला मिळते. अजून एक रेसिपी आहे, त्यात लसूण, खडे मसाले, कोथिंबीर भांगेच्या बिया वाटून टाकतात. तेलात कांदा आणि वाटण तेल सुटेपर्यंत वाटल्यावर मॅरिनेट केलेले मटण आणि टोमॅटो प्युरी टाकून शिजवतात. कुकरमध्येही शिजवता येते, पण भांड्यातही स्लो कुकींग करता येते. भुटवासोबत कछमोली खातात. यात थोडे कमी शिजलेले मांस कोथिंबीर, कांदा वगैरे टाकून खातात. मटण झोल - हळद, दही, मीठ लावून मटण मॅरिनेट केले जाते. खडे मसाले, कांदा, लसूण सगळं वाटले जाते. मोहरीच्या तेलात हे वाटण परततात. यासोबत फरन म्हणून एक पहाडी वनस्पतीही टाकतात. तेल सुटले की त्यात मटण टाकून शिजवतात. भरपूर कोथिंबीर चिरून घातली जाते. हे दोन्ही पदार्थ पोळी किंवा भातासोबत खातात. तिकडे जाऊनच हे पदार्थ खाण्यात मजा आहे. तांबडा पांढरा रस्स्याला टफ देतील, असे पदार्थ उत्तराखंडला गेलात तर नक्की खा! - सानिका भोकरीकर