मावडी..! भाग- २

पोटुशी असलेल्या प्रवीणच्या मायचा चार वर्षांच्या प्रवीणला घेऊन खस्था खात जगण्यासाठीचा संघर्षमय जीवन प्रवास सुरू झाला.

युवा विवेक    12-Mar-2024   
Total Views |

मावडी..! 
मावडी..! भाग- २
प्रवीण म्हणजे त्याच्या घरातील कर्ताधरता तरुण होता. बाप ऐन प्रवीणच्या लहानपणीच प्रवीणच्या वयाच्या चौथ्या वर्षी व्यसनाच्या पायी वाट्याला आलेल्या आजारपणात वारला. मग पोटुशी असलेल्या प्रवीणच्या मायचा चार वर्षांच्या प्रवीणला घेऊन खस्था खात जगण्यासाठीचा संघर्षमय जीवन प्रवास सुरू झाला.
वडीलांचं सहामासं प्रवीणच्या आजी, आजोबा, चुलता चुलतीनी ओवाळून टाकलं. अन्; प्रवीणच्या मायला खुप लहान वयात आलेल्या रांडव जगण्याच्या परिस्थितीमुळे नवऱ्यावर ईनेच काही काळी जादू केली, त्याला जेवणात काही खाऊ घातलं असा खोटा आळ घेत तिला घराच्या वाटा कायमच्या बंद केल्या. तान्हुल्या प्रवीण अन् नवरा मरून गेल्यामुळे रांडव झालेल्या प्रवीणच्या आईला गावच्या बाहेर एका कोपीत राहण्यासाठी गावकऱ्यांनी मायेपोटी विसावा दिला.
चार वर्षांच्या प्रवीणला घेऊन त्याची भोळी माय लोकांच्या रानात रात्रंदिवस खपत होती. लोकांची कामं करत होती अधूनमधून भेटायला येणाऱ्या भावाचा तिला आधार होता. भाऊ आला की दोन पैकं तिच्या हातात टेकून प्रवीणचा मुका घेत आल्या वाटे सूर्य अस्ताला जाईपर्यंत त्याच्या गावी निघून जायचा. बऱ्या मोलाचा भाऊ आपल्या गरिबाच्या झोपडीत का रातभर राहील अन् का आपल्याला त्रास देईल म्हणून प्रवीणची भोळी मायसुद्धा त्याला कधी रोखवत नसायची.
असेच दिवसांच्या मागे दिवस गेले प्रवीणच्या मायला नववा महिना लागला. अन्; एक दिस कोपीला शेकारून घेतलेल्या दरवाज्याला खुंटी घालून त्याला उटाळ्याच्या आत करून तान्हा प्रवीण, त्याची माय मामांच्यासंगे प्रवीणच्या मामाच्या घरी आली. आठ दिवस सुखाचे गेले.
एक दिवस भर दुपारच्या पहारे प्रवीणच्या मायचं पोट एकाकी दुखू लागलं अन् ती घामाने दरदरून गेली. कधीही दिवस भरतील हे माहीत असल्यानं गावची मांगीन आईला आधीचा सांगावा धाडून ठेवला होता. तिला कळताच ती आली तिचा गावच्या लेकी बाळंत करण्याचा अनुभव दांडगा होता. आल्या हातासरशी तिनं बाळंतपण केलं अन् प्रवीणला खेळायला म्हणून आता एक बहीण भेटली होती.
हळूहळू पोरीच्या जन्माचे नव्याचे नऊ दिवस संपले अन् एक दिवस पुन्हा सासरच्या वाटा जवळ झाल्या.तीन-चार महिन्यांची बंद असलेली झोपडी पून्हा उघडली अन् काही दिवस जीवाला भेटलेला विसावा विसरून आता पुन्हा एका लेकीला घेऊन प्रवीणची माय लोकांच्या इथे रोजाने खपू लागली. हळू हळू सगळं सोयीस्कर होत असताना गावाला एकाकी आलेला दुष्काळ अन् गावकऱ्यांचे भाकरीसाठी हाल होऊ लागले. यात प्रवीणची आईसुद्धा भरडली जाऊ लागली रोजंदारीने कामे भेटत नसल्याने घरात पैका येत नव्हता अन् आता खायची आबाळ होऊ लागली होती.
या गावाला राहून उपाशीपोटी मरण्यापेक्षा दुसऱ्या गावाला जाऊन रोजीरोटी करून पोट भरू असं प्रवीणच्या आईला वाटलं. ती आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन मांगखेडा या गावच्या दिशेनं निघाली. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने ती असं चालत राहीली तर; सांजेला मांगखेडा या गावी पोहचणार होती.
रस्त्यानं सोबत घेतलेल्या भाकर कुटका अन् काही संसाराची चार दोन भांडीकुंडी घेऊन ती चालत होती. दुपारच्या वखताला एक ठिकाणी भाकर खाऊन तिघे पुन्हा वाटेला लागली होती.
दिवसभर पायपीट करून, उन्हात तापलेल्या रानात फुफाट्यातून वाटा काढीत तिघेही एकदाची मांगखेडा या गावच्या रानात पोहचली होती. गावाच्या चहूबाजूने थोडीफार हिरवळ अजूनही शिल्लक होती. उंचावरून दूरवर नजर टाकली की मोकाट पसरलेल्या रानात हिरव्या पिकाने लगडलेल्या रानांची टिपके टीपके डोळ्यांना दिसू लागली होती.
गावाच्या एका अंगाला असलेल्या लक्ष्मी आईच्या देवळाला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडाला नवसाच्या पांढऱ्या चिंध्यानी व्यापून घेतलं होतं. डोंगराच्या उंचवट्यावरून तो पिंपळ पांढराफट एखाद्या आजारी रक्त नसलेल्या माणसाप्रमाणे दिसू लागला होता. दूरवर दिसणारी गावाची कमान हळूहळू जसजसं पावलांना गावाची ओढ लागली तसं तसं जवळ येत होती. अन् कधी गावात येऊन एखादी झोपडी बांधून गावात काम धंद्यासाथठी कायमचा विसावा घेऊ असं प्रवीणच्या मायला झालं होतं.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!