का रे अहंकार गेला नाही?

संत मुक्ताबाई म्हणजे संत प्रभावळीतील साक्षात ब्रह्मचित्कला! चारही भावंडांमधील सर्वात लहान मुक्ताई सर्व भावंडांना सावरणारी होती हे वेगळं सांगायला नको.

युवा विवेक    10-Mar-2024   
Total Views |
 
का रे अहंकार गेला नाही?
का रे अहंकार गेला नाही?
संत मुक्ताबाई म्हणजे संत प्रभावळीतील साक्षात ब्रह्मचित्कला! चारही भावंडांमधील सर्वात लहान मुक्ताई सर्व भावंडांना सावरणारी होती हे वेगळं सांगायला नको. स्वतः ज्ञानादादाला वैषम्य भावनेतून दूर करून ताटी उघडायला लावणारी मुक्ताई म्हणजे 'ऐसी कळवळ्याची जाती' या भावार्थाचं परमोच्च उदाहरण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोळाव्या वर्षी भावार्थदीपिका लिहिणाऱ्या माउलींचं आपल्याला आश्चर्य वाटतं, तेव्हा मुक्ताईबद्दल काय वाटावं? अवघ्या दहाव्या वर्षी अभंग रचना करणारी मुक्ताई, चांगदेवांना शिष्य म्हणून स्विकारणारी, नामदेवांना जाणीव करून देणारी, आणि आपल्या योगात अखंड अभिरत असणारी मुक्ताई हा खरं किती कुतूहलाचा विषय!
एकदा, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताई, नामदेव, गोरोबा काका, सारे जण भेटले. इतक्या संतांनी एकत्र भेटणं हा त्या वास्तूसाठी किती भाग्याचा क्षण असावा! मुक्ताईच्या सर्व भावंडांनी नामदेवांना नमस्कार केला. पण मुक्ताई काही नमस्कार करेना. खरं म्हणजे नामदेव वयानेही मोठे आणि भक्तशिरोमणी! बालपणीच देवाला जेवू घालणारे, देवालाच आपले पिसे लावणारे नामदेव महाराज! त्यांना का नमस्कार करत नसेल मुक्ताबाई?
तेव्हा मुक्ताईचं उत्तर होतं -
अखंड जयाला देवाचा शेजार ।
कारे अहंकार नाही गेला ।।
या पहिल्याच चरणात मुक्ताईच्या कृतीमागील कारण लक्षात येतं. प्रथम जाणवतो तो या शब्दांमधला प्रवाहीपणा. आणि वाचक अगदी सहजच गुंतून जातो या शब्दांत.. नामदेवांचा श्रेष्ठ विठ्ठलभक्त असण्याचा अहंकार मुक्ताई जाणून आहे. नामदेव पंढरपुरी राहणारे. मग देवाचा शेजार अखंड असूनही अजून अहंकार गेलेला नाही? मुक्ताई पहिल्याच चरणात प्रश्न करते आहे.
मान अपमान वाढविसी हेवा ।
दिवस असता दिवा हाती घेसी ।
अहंकार अजूनही सांडून गेला नाही. नमस्कारतून मान अपमान तो कसला? यातून वाढत जातो तो फक्त हेवाच. 'दिवस असूनही दिवा हाती घेसी' ही किती सुंदर प्रतिमा वापरते मुक्ताई! 'त्या'च्या कृपेचा दिवस निरंतर असताना, आपण आपापल्या अहंकाराचा सानुला मृण्मय दिवा हाती घेणं किती हास्यास्पद आहे! अशीच अवस्था नामदेवांची झाली आहे. अशी अवस्था म्हणजे एका प्रकारे आंधळेपणाचंच लक्षण आहे ना!!
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ ।
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले ।
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी ।
अद्यापि नरोटी राहिली का ।
मुक्ताई पुढे म्हणते की तुझा नेहमीचा खेळ, जीवन व्यवहार, हा साक्षात परब्रह्म सोबत आहे. मग तरीही असे डोहाळे तेही आंधळ्याचे.. का? कशासाठी? कल्पतरूच्या खाली बसून विविध गोष्टी इच्छाव्यात, मग अजूनही नरोटी राहीली आहेच? नरोटी म्हणजे नारळाची करवंटी. कल्पतरूखाली बसून नारळातील मधुर अंतरंगाची इच्छा करावी, मग बाहेरच्या आवरणाची जाणीव अजूनही गळून गेली नसावी?? किती किती उपमा वापरतेय मुक्ताई, किती चित्रदर्शी प्रतिमांतून समजावते आहे! अर्थात, माऊलींची भगिनी म्हणून ते अगदी वारशाने आल्यासारखं आणि म्हणून स्वाभाविक वाटतं. पण इथेही न विरामता पुढे म्हटलं आहे -
घरी कामधेनु ताक मागू जाय ।
ऐसा द्वाड आहे जगा माजी
घरी कामधेनु असून आपण तिच्यापाशी ताक मागू जावं असंच जगामधे झालेलं आहे! या ठिकाणी हा अभंग केवळ नामदेवांपुरता मर्यादित राहात नाही. तो जगामधील अहंकार पाशाने मोहवलेल्या अशा प्रत्येक माणसासाठी होतो. पण अशांनाही मुक्ताई 'द्वाड' म्हणते. फार बोचरा शब्द वापरत नाही. 'द्वाड' असं खोडकर मुलांना कितीवेळा अगदी कौतुकाने म्हटलं जातं. कारण मुलांना उचित-अनुचिताचा विवेक नसतो. तो आला की आपोआप होतील शहाणी हाच त्यामागचा भाव. इथे मुक्तालाही हेच तर अभिप्रेत नसेल ना? तिच्यातील मातृहृदयातून आलेला हा शब्द.. हा क्षणिक रागही तिथूनच आलेला.
नमस्कार न करण्यामागील हे सर्व कारण सांगून, आपली भूमिका अगदी स्पष्ट ठेवत पुढे म्हटलंय
म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना ।
आधी अभिमाना दूर करा।।
मुक्ताचे अभंग कधी कधी खूप गूढ वाटतात. उकलायला अवघड आणि लगेच समजायला कठीण. हा तसा सोपा अभंग.. पण खरंच असेल सोपा? यातून कळतो तो मुक्ताईचा अधिकार, तिची श्रेष्ठ योग्यता आणि परखडपणा सुद्धा! त्याहीपेक्षा लक्षात येत ते संत परंपरेतील विलक्षण उदारपण. विचार करा, अगदी आजही एखादी दहा वर्षांची मुलगी एखाद्या मोठ्या माणसाला नमस्कार न करता त्याच्या अहंकाराबद्दल बोलली तर? मुळात एकवेळ नमस्कार करणार नाही पण कुणी लहान मुलगी असं आजही बोलू धजणार नाही. आणि बोललीच, तर काय होईल? याचा फक्त विचारच करणं बरं. एकविसाव्या शतकात जे आपल्याला अशक्य वाटतं, ते तेराव्या शतकात करणारी मुक्ताई. नामदेवही हे शांतपणे ऐकून घेतात, त्यातून त्यांना उपरती होते हेही विशेष! 'तू लहान आहेस, तू मुलगी आहेस, तुला काय कळतं' असं तिला ना नामदेव म्हणतात ना तिची भावंड. यातून समानतेचा किती मोठा आदर्श दिसून येतो हे लक्षात घ्यायला हवं. केवळ स्त्री-पुरुष समानता नव्हे, तर सर्वजीव समानता या मातीत किती समृद्धपणे नांदत होती याची ही साक्ष. मुक्ताई आदिशक्ती आहेच, पण तिच्या मानवी रूपातून इतक्या सहजपणे व्यक्त होणं, परखडपणे आणि तरीही कळवळ्याने, मोकळेपणाने बोलणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. प्रत्येक स्त्रीचं 'मुक्ता' असणं हा आदर्श इथे मूर्त झालेला आहे. महिला दिन साजरा करताना, ही तेराव्या शतकातील स्त्री शक्तीची खुण स्मरणात रहायला हवी. इतकंच नव्हे, तर ही परंपरा नि त्यातील प्रेरणा प्रवाही ठेवायला हवी.
~ पार्थ जोशी