सुगीचे दिस..! भाग - १०

मायने चुल्हीवर पिठलं आळायला टाकून दिलं होतं अन्; एका अंगाला माय भाकरी थापायचा बेत करीत होती.

युवा विवेक    20-Feb-2024   
Total Views |
 
सुगीचे दिस..! भाग - ९
सुगीचे दिस..! भाग - १०
मायने चुल्हीवर पिठलं आळायला टाकून दिलं होतं अन्; एका अंगाला माय भाकरी थापायचा बेत करीत होती. शेकारलेल्या झोपडीत चिमणी वाऱ्याच्या झोताने विझायला करत होती अन् माय तिला सावरून भाकरी करत बसली होती. रात्री बरसाद झाली तर उद्याचं काम भांडळले असं दिसून येत होतं. पण सध्याच्या पाटलाच्या जीवाची वरखाली होणारी अवस्था मला बसल्याजागी अनुभवायला येत होती.
कारण आज जर पाऊस झाला तर पाटलांच्या वावरात असलेल्या सर्व कांद्याचा चिखल होणार होता. त्यात आता सुरू असलेलं वावधन बघता भोळ्या राजूची कांदे झाकण्यासाठी होत असलेली फजिती माझ्या डोळ्यासमोर येऊन गेली.
भाकरी खाऊन मी अन् माय निपचित पडून राहिलो रात्रभर गोंघवणारा वारा रात्रभर वाहत होता. पाऊस काही आला नाही पण वाऱ्याचे वावधन काही केल्या कमी होत नव्हते. गावकरी मंडळी निपचित पडली होती. सारा गाव शांत झाला होता. सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात आज रातच्याला बारीवर कुणीही नव्हतं.
तेव्हढी विनेकारी, टाळकरी अन् आमचे माय माउली माळकरी लोकं तिथं मंडपाच्या एका अंगाला मोडकळीस आलेल्या खोलीत झोपी गेली होती. विनेकरी बाबा पारीच्या वेळा लाऊन घंटा-घंटा उभे राहून विना वाजवत बसले होते. पण; त्यांच्या सेवेत वावधनामुळे कुठलाही खंड पडला नव्हता. रात्र पहाटेच्या अंगाला सरू लागली तसं सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेलं वावधन एकाकी कमी होऊ लागलं अन् पहाटे कोंबड्याने बांग देऊस्तोवर सगळं कसं शांत शांत झालं.
रात्री पाऊस काही पडला नव्हता, त्यामुळे शेतात पिकांचा हातातोंडाशी असलेला घास काही देवाच्या कृपेने निसर्गाने हिरावून घेतला नव्हता. पण; गावातील टेकडीवरच्या परिसरात असलेल्या संतूक नानांचे पत्र्याचे छप्पर असलेले शेड मात्र या वावधनात मोडळीस आले, परंतु गुरढोरं यांना कुठली ईजा झाली नव्हती त्यामुळं संकट थोडक्यात निस्तरले होते.
पहाट झाली तशी सावता माळ्याच्या देवळात गावची मायमाउली काकड्यासाठी राजी झाली, काकडा सुरू झाला. गावातली तरणी पोरं दूध काढायला म्हणून वावरात आली होती. माय पहाटे कोंबड्याच्या बांगेसरशी उठली अन् अंगण झाडू लागली, चूल्हीवर पाणी इस्नाला ठेऊन सडा रांगोळी करत माय तिचं आवरत होती. मी उठलो अन् परसदारी असलेल्या आमच्या चूल्हीजवळ जाऊन बसलो, वारा जरी शांत झाला होता पण गारठा मात्र हवे अजूनही जाणवत होता. त्यामुळं गावातली म्हातारी माणसं ठिकठिकाणी शेकोट्या करून शखत बसली होती.
मी ही चुल्हीजवळ बसून शखत बसलो होतो अन् शखत शखत चूल्हीतील राखुंडा काढून त्याने दात घासत बसलो होतो. पहाटेचा काकडा कधीच संपून गेला होता, लोकं घराच्या वाटा जवळ करत होती. दूध काढायला म्हणून शेतात गेलेली माणसं घरच्या वाटेनं येत होती. सूर्योदय झाला होता अन् माय अंघोळपाणी करून लवकर कामाला जायचं म्हणून भाकरी थापत बसली होती.
माझं अंघोळ पाणी झालं अन् मी पण पहाटेची न्याहारी करून लिंभाऱ्याला लावलेल्या फुटक्या आरश्यात बघत भांग पाडत बसलो होतो. तितक्यात दुरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज आला अन् पाटलांच्या मागारी सीटवर बसलेल्या भोळ्या राजू पाटलांची गाडी जशी आमच्या घराजवळ येऊन थांबली तसं तो बोलू लागला.
आक्का आजच्याला लवकरच वावरात या तेव्हढी राहिलेली उक्त्याची कांदे काढून घ्या पटकन वाऱ्या वावधनाची म्हणजे आपली कांदे कोरडे ठाक मार्केटला जातीला अन् दोन पैका चांगला येतीला.बपाटलांचे हे पाटीलकी बोलणं भोळ्या राजू मस्त बोलत होता अन् पाटलांनी दिलेला सांगावा ऐकून मी आणि मायना पण मान हलवली अन् बिगीने आवरू लागलो.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!