अडथळ्यांची शर्यत..

युवा विवेक    28-Dec-2024
Total Views |


अडथळ्यांची शर्यत..

 
हल्ली तू खूप बिझी झाला आहेस हे वाक्य बरेचदा आपल्याला कुणीतरी ऐकून दाखवतंच. अगदी जवळचं माणूस असलं किंवा खास मैत्री असली म्हणजे, 'गरीबाकडे बघायला तुला वेळ नाही.. आता तू श्रीमंत झालास वगैरे प्रेमळ टोमणे देखील ऐकायला मिळतात. पण खरंच हल्ली प्रत्येकजण आपापल्या कामात अधिक व्यस्त आहे. पण साऱ्या गरजा, महागाई, भविष्यकालीन तरतूद वगैरेकरिता कामाशिवाय आणि कष्टाशिवाय आपल्याला इलाज नाही. प्रत्येकजण आपापले आवडीचे क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करीत असतो. पण प्रयत्न फोल ठरतात आणि नावडते क्षेत्रही स्वीकारावे लागते. आवडते क्षेत्र निवडले तरी त्या क्षेत्रातील प्रत्येक काम मनाजोगे मिळेल, असे काही सांगता येत नाही. सारी माणसं आपापल्या परीने राबत असतात, झटत असतात नि पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात.

अडथळ्यांची शर्यत हा शब्दप्रयोग आपण बरेचदा ऐकला असेल. ज्याने कुणी हा शब्द प्रथम उच्चारला त्याने तो अतिशय चपखल उच्चारला आहे. व्यवसाय आणि नोकरी सांभाळताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या अडचणी सोडवताना नाकी नऊ येतात. पण अडचणी आणि अडथळे यात फरक आहे.. अगदी दोन सख्ख्या भावांच्या स्वभावाइतका! अडचण म्हणजे सोडवता येण्यासारखे संकट असते. पण अडथळे सोडवायचे म्हणजे भारी कौशल्य आणि सहनशीलता हवी. अगदी छोटासाच अडथळा पहा ना.. आपण सकाळी गाडीला कीक मारतो. अगदी पायाला कंटाळा येईस्तोवर कीक मारतो पण गाडीला काही सुरु व्हावंसं वाटत नाही. हातातले घड्याळ स्पर्धेत उतरल्यासारखे पुढे पुढे धावत असते. कसाबसा दुसरा पर्याय शोधत आपण कचेरीत पोहोचतो. तेव्हा लेट मार्क नावाचा नियम आपलं हसून स्वागत करतो आणि सगळा दिवसच मग आपल्याशी अडथळ्यांची शर्यत लावतो. कधी कधी बसस्टॉपवर पोहोचेपर्यंत बस निघून जाते आणि आपण वेळेवर बसस्टॉपवर पोहोचलो की बसला आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचायला अडथळे निर्माण होतात. या सगळ्यात भर म्हणून कुणीतरी रस्त्यावर टाकलेल्या केळीच्या सालीशीच आपल्या बूटांना मैत्री करावीशी वाटते. ऑफिसमध्ये ऑडिट असतं त्याच दिवशी नगरपालिकेच्या मनात 'बरेच दिवसांत आपण रस्ता खोदला नाही ' असा विचार जागा होतो. या अशा अडथळ्यांची शर्यत पार करत आपण कसेबसे नोकरी -व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचतो. तेव्हा अडथळ्यांची शर्यत हा शब्दप्रयोग ज्यानी प्रथम केला असेल त्याला आलेल्या अडथळ्यांची कल्पना आपल्याला येते. अडथळे सर्वसामान्य माणसाला किंवा मध्यमवर्गीयांनाच असतात, असे काही नाही. श्रीमंत माणसाला देखील अडथळे असतातच. श्रीमंतीचा मान राखत अनेक जण त्यांना सलाम करत असतीलही. पण अडथळे कुणाला सलाम करत नाहीत. एखाद्या समूहासमवेत कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत असतो आणि अगदी निघणार इतक्यात पाय मुरगळतो. कधी कधी तर पैसे अधिक देऊनही कामाला माणसे मिळत नाहीत. डॉक्टरांची पूर्वनियोजित भेट आयत्या वेळी रद्द होते. एक ना दोन अडथळे समोर उभे ठाकतात. हळूहळू या अडथळ्यांची शर्यतच लागते.


टीव्हीवर एखादी मालिका वर्षानुवर्षे चालते. पण एका मर्यादेनंतर ती मालिका कंटाळवाणी वाटू लागते. अडथळ्यांची देखील अशीच कंटाळवाणी मालिका आपण दैनंदिन कामात बघत असतो. पण या मालिकेला किंवा शर्यतीला पर्याय नाही. मालिकेतलं एखादं पात्र आपल्याला आवडतं. त्या पात्राची गंमत पाहण्यासाठीच आपण 'अपात्र' मालिका बघतो आणि ते बघितल्याचे समाधान आपल्याला वाटते. रोजच्या जगण्यात अडथळ्यांची शर्यत टाळणे आपल्या हातात नाही. पण मालिकेप्रमाणेच त्या शर्यतीत एखादे तरी पात्र आवडीचे भेटते. या पात्राला भेटण्यासाठी आपल्याला शर्यतीत सहभागी व्हावे लागेल. शर्यतीत कुठे धडपडायचे नाही आणि ढोपरे फोडून घ्यायची नाहीत, हे भान राखून वागलं तर आपल्याला आयुष्याचे, जगण्याचे भान राहील. हळूहळू अडथळ्यांची देखील सवय आपल्याला होईल. किंबहुना ती करुन घ्यावी लागेल. अडथळ्यांनाच अंजारत नि गोंजारत बसलो तर आयुष्याचा आनंदच घेता येणार नाही. याउलट रोज नव्या जोमाने आणि नव्या तयारीनिशी या शर्यतीत उतरले पाहिजे. अडथळ्यांना आव्हान द्यायलाच हवे. तरच शर्यतीत भाग घेणाऱ्या काही अडथळ्यांना आळा बसेल.

अडथळ्यांची शर्यत पार करत असताना 'गरीबांकडे लक्ष द्या!' अशा गंमतीशीर मागणीची मजा घेता आली की शर्यतीतल्या अडथळ्यांना सामोरे जाता येईल.

 

- गौरव भिडे.