आनंद आणि समाधान..

युवा विवेक    30-Nov-2024
Total Views |

आनंद आणि समाधान..
माणसाच्या जीवनात आनंदाचं स्थान मोठं आहे. आनंद मिळण्याच्या वाटा अनेक आहेत. कुणाला कशात आनंद मिळेल, सुख वाटेल हे सांगणं अवघड आहे. पण मिळालेला हा आनंद माणूस अगदी बेभान होऊन जगतो. आनंदाच्या एखादा क्षणही दिवस चांगला जायला पुरतो. पण त्या एका क्षणासाठी काहीवेळा कुणाकुणाला असंख्य क्षण देखील मोजावे लागलेले असतात. या सगळ्या पलीकडे विचार केला म्हणजे आहे त्या क्षणातच आनंद शोधणारी माणसं अधिक सुखी असतात. आकाशातून विमानाचा आवाज आला की आपण खिडकीकडे धावतो आणि ते विमान दिसलं की आपल्याला फार आनंद होतो. खिडकीकडे धावायला वयाचं बंधन नसतंच मुळी! लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही त्या उडणाऱ्या विमानाकडे बघतात. निरर्थक बंधने झुगारली की आनंदाशी आपली भेट निश्चितच होते. आनंद न मिळण्यास आपण स्वतःच जबाबदार असतो. आपण विमान बघत असताना आपल्याकडे कुणी पाहत तर नाही ना, आपलं वय काय आणि आपण करतोय काय असा मनात येणारा विचारच आनंद संपवीत असतो. म्हणूनच, बेभान क्षणीच आनंद अधिक होतो. आनंदाची पुढची व्याख्या म्हणजे सुख.. या सुख आणि आनंदाच्या मधे समाधान दडलेलं असतं. ते लपलेलं असतं म्हणूनच आपल्याला आनंद आणि सुख इतकंच दिसतं. हे समाधानच सुख आणि आनंदाची गट्टी जमवतं. आनंद सुखात आहे नि सुख समाधानात आहे..
आनंद मिळत नाही, जगण्याचं समाधानच मिळत नाही अशी आपली भाबडी तक्रार नेहमीच असते. आपण पैसा, बंगला, दागदागिने, गाडी, कपडे, वस्तूंची आवड मनात निर्माण करतो. ते मिळवण्यासाठी झटतो. पण सारं काही मिळेपर्यंत आयुष्याची संध्याकाळ होत आलेली असते. त्यामुळे मिळालेले आनंदाचे क्षण आपल्याला नीटसे जगताच येत नाहीत. हल्ली पैशाशिवाय सगळंच अडतं हे अगदी कबूल आहे. पण त्याची आवड असण्यापेक्षा गरज असणं अधिक महत्त्वाचं आहे. गरजेच्या वस्तूंचा गरज म्हणून विचार न करता आवड म्हणून विचार केला की आपल्याला आपलेच क्षण जगता येत नाहीत. काहीवेळा मोठ्या आनंदापेक्षा लहानशा आनंदाचे क्षणच आयुष्यावर सुख शिंपून आयुष्य टवटवीत करीत असतात. सोनचाफा पिवळाधम्मक असतो. तो रंग पाहून आपल्याला आनंद होतो. पण ते नाकाशी धरुन श्वासात मुक्तपणे त्याचा गंध घेतला की आपल्याला समाधान मिळतं. कदाचित उदास झालेलं एखादं मन त्या एवढ्याशा फुलाच्या स्पर्शाने आणि गंधाने पुन्हा प्रसन्न होतं. रस्त्यावर कुत्र्याचं पिल्लू आपल्या आईच्या भोवताली खेळत असतं. त्याच्या त्या कोवळ्या हलचाली पाहून आपल्याला आनंद वाटतो. पण त्याला उचलून घेत त्याच्या पाठीवरुन नाजूकपणे हात फिरल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही. त्या स्पर्शातून आपल्याला कदाचित कोवळेपणाचं, खेळकरपणाचं दानही मिळतं. हॉटेलातले पदार्थ खाताना पोट आनंदाने टम्म फुगतं. पण आईच्या हातचा साधा वरणभात पोटाला आनंद आणि मनाला समाधान देतो. या रोजच्या जगण्यातील अगदी छोट्या गोष्टी आहेत. पण त्या कोमजेलेले मन काही क्षणातच ताजेतवाने करतात. म्हणूनच, आनंद आणि क्रमाने येणारं समाधान या छोट्या गोष्टीतच अधिक असतं.
काही भावना आपण बोलून व्यक्त करीत असतो. वेगवेगळ्या शब्दांच्या आधारे आपण ते सांगू पाहतो. पण जोडीदाराने मात्र आपल्या मनातलं ओळखावं असं आपल्याला वाटत असतं. अबोल शब्दांनी आपण जोडीदाराला काहीतरी सांगतो. तो ते अगदी बरोबर ओळखतो आणि तेव्हा आपल्याला भारी आनंद होतो. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जोडीदाराच्या चेहऱ्यावर आपसूकच समाधान दिसतं. आनंद आणि समाधानाचं नातं असं एकमेकांवरच आधारलेलं असतं. जीवशास्त्राच्या किंवा एकूणच विज्ञानाच्या अभ्यासात निसर्गचक्राविषयी माहिती दिलेली असते. आनंद आणि समाधानाचं असंच एक प्रकारचं चक्र आहे. ते फिरतं राहिलं म्हणजे माणूस सुखी होऊ लागतो. गाणी म्हणायला आपल्या सगळ्यांनाच आवडतात. ऐकायला तर त्याहूनही आवडतात. आता टीव्ही, संगणक, मोबाईल हे आपले छान मित्र आहेत. पण रेडिओ हा आपला बालमित्र आहे. पूर्वी किंवा अजूनही रेडिओवर गाण्यांच्या फर्माईशीचा दिवसाला एखादा तरी कार्यक्रम आवर्जून असतो. त्यात आपली फर्माईश निवडली गेली की किती आनंद होतो आपल्याला! मग ते आपण निवडलेलं गाणं ऐकताना काही वेगळंच समाधान आपल्याला जाणवतं. खरंतर जगण्याचे असेच छोटे छोटे क्षण असतात. मोठ्या उत्साहाने आपण ते क्षण जगत रहिलो की सारा क्षीण दूर होतो. आनंद आणि समाधानाचे चक्र असे फिरते राहून आयुष्य सुखाच्या वाटेने धावत सुटतं..
- गौरव भिडे