पहाडगंज

दिल्लीचे नसलात तरी पहाडगंज हे नाव तुमच्या कानावर पडले असेलच. नावात पहाड असले तरी इथे लोकांची गर्दी मात्र बाजारासारखी असते.

युवा विवेक    05-Jan-2024   
Total Views |
 
पहाडगंज
पहाडगंज

दिल्लीचे नसलात तरी पहाडगंज हे नाव तुमच्या कानावर पडले असेलच. नावात पहाड असले तरी इथे लोकांची गर्दी मात्र बाजारासारखी असते. इथे काही पदार्थ असे आहेत कि जे इथेच मिळतील. जसं कि मुलतानी दांडा. पाकिस्तानातील मुलतान या भागातून आलेल्या लोकांची वस्ती इथे आहे आणि सोबत त्यांनी तिथले पदार्थही आणले. चावला दे मशहूर या रेस्टारंटच्या मालकांचा दावा आहे कि चूर चूर नान पहिल्यांदा त्यांनी दिल्लीत आणले. यांचे दोन आऊटलेट आहेत. नवीन जागेत बसायला छान जागा आहे. चूर चूर नान बद्दल मी याआधी लिहिले आहेच. आज हा सगळा कारभार अजय चावला सांभाळतात पण हे दुकान त्यांच्या आजोबानी सुरु केले. आलू प्याज, गोभी, पनीर असे वेगवेगळ्या प्रकारचे चूर चूर मिळतात. नान सोबत रायता, मिरचीचे लोणचे, हिरवी चटणी, शाही पनीर, दाल माखन, कढी पकोडे, चना मसाला आणि राजमा असतो. यापैकी जसे कॉम्बिनेशन हवे तसे थाळीत मिळते. कुरकुरीत नान बटरमध्ये घोळून आपल्या समोर येते तेव्हा मनासोबत पोटही तृप्त होते. नानमध्ये सारण असेल तर सोबत भाजी नसली तरी चालते पण इथे तर खूप प्रकार सोबत मिळतात.

मुलतानी धांडामध्येच मिळते मोठ कचोरी! मुलतानसे आये स्वादके सुलतात अशी त्यांची टॅगलाईन आहे. आपल्या मिसळीतली प्रसिद्ध मटकी डाळ होऊन कचोरीमध्ये समोर येते. मटकीची डाळ शिजून तयार असते, त्यांचा मसाला, चिंचेची चटणी, मसाल्याचे कांदा आणि मिरची! सकाळी मुंग धुली डाळ मिळते. ती म्हणजे मोड आलेल्या मुगाची उसळ. १९५० मध्ये सुरु झालेले हे दुकान आज चौथी पिढी सांभाळते आहे. मोठ कचोरीसोबत इथे राजमा चावल, कढी चावल वगैरे पदार्थही मिळतात. कचोरी एका पानावर आणि डाळ एका पानाच्या द्रोणात मसाला, कांदा वगैरे भुरभुरून आपल्या समोर येते. आलू कचोडी च्या ऐवजी मोठ कचोडी त्यातल्या त्यात हेल्दी आहे. कचोडी या डाळीत बुडवून खातात.

जनता स्वीट्समध्ये अनेक पदार्थ मिळतात पण इथे मुगाच्या डाळीचे सामोसे मिळतात, ते प्रसिद्ध आहेत. इथेही सामोसे एकटे मिळत नाहीत तर बटाटा, चणेच्या भाजीसोबत मिळतात. सारणातील मुगाची डाळ मात्र मसालेदार नसते. यानंतर मालपुवा आणि हलवा खातात. आपण श्रीखंड पुरी खातो तसं इथे मालपुवा हलाव्यासोबत खातात.

मुलतानी छोले कुलाचेवाले यांच्याकडे भिगे कुलचे मिळतात. केरळमध्ये कुटू परोठा किंवा चिली परोठा मिळतो. यात पराठ्याचे तुकडे करून त्याला फोडणी देतात तसाच प्रकार. छोल्यात कुलचे कुस्करून देतात. त्यावर टमाट्याची चटणी, कांदा असते.

चुनामंडीमध्ये सीताराम दिवानचंद यांचे छोले भटुरे फेमस आहेत. सकाळपासून इथे लोकांची गर्दी असते. त्यांच्या नावाच्या बोर्डवर "ये दिल्ली है मेरे यार और छोले भटुरेही है प्यार" असं अगदी शेकडो लोकांच्या मनातील ओळी लिहिल्या आहेत. एका काउंटरवर छोले सतत एका पातेल्यात छोले उकळत असतात. तिथेच एका भांड्यात बटाट्याची भाजी आणि आवळाच्या लोणच्याच्या बरण्या असतात. दुसऱ्या काउंटरवर भटुरे आणि तिसऱ्या काउंटरवर लस्सी! मुंबईत जशी पावभाजी तसे दिल्लीत छोले भटुरे सगळीकडे मिळतात. पुनीत कोहली या रेस्टारंटचे काम सांभाळतात. प्लेटमध्ये भटुरे, बटाट्याची भाजी आणि छोले देतात. कमी तेलात बनवलेले भटुरे आणि कमी मसालेदार छोले खायचे असतील तर इथे नक्की जा.

चुनामंडीतच श्री बांके बिहारी सामोसेवाले यांचे दुकान आहे. या नावाची ३ दुकाने आहेत. १९६० मध्ये सुरु झालेले रेस्टारंट आज तिसरी पिढी सांभाळते आहे. या दुकानाचे नाव आधी निहाल सामोसे नावाने ओळखले यायचे पण जवळच असलेल्या बांके बिहारी मंदिरावरून हे नाव सुरु झाले. आजही इथे १९६० मध्ये जसे मसाले बनावत होते तसेच मसाले बनवतात. खडे मसाले घालून सारण बनवले जाते. सामोसा कुस्करून त्यावर, छोले आणि चिंचेची चटणी टाकून दिले जाते. छोले किंवा सामोसा कमी मसालेदार असतात. चिंचेची चटणी मात्र गोड असते. आजही इथले सगळे मसाले १९६० पासून एकाच दुकानातून आणले जातात आणि सगळे उच्च प्रतीचे मसाले! मेन बाजारमध्ये लाला रामचंदर यांची जिलेबी न खाता तुमची ट्रिप पूर्ण होऊच शकत नाही. जाडसर जिलेबी मिळणारे हे दुकान लहानसे आहे पण खूप जुने आहे. १९४० पासून याच ठिकाणी जिलेबी बनवली जातेय आणि लोक रोज त्याचा आस्वाद घेत आहेत.

सारण असलेली कचोरी, सारण असलेले पराठे, सारण असलेले नान नॉर्मल लोक नुसते खातात किंवा सोबत फारतर चटणी, लोणचे. इथे मात्र साग्रसंगीत लाटणेरंगीत थाळी मिळते. आपण वरण पोळी फारतर दालबाटी कुस्करून खातो, दिल्लीकर छोले कुलचे कुस्करून खातात. एक गोड पदार्थ कमी म्हणून कि काय तर दोन गोड पदार्थ सोबत खातात. आपण थोडे आळशी आहोत कि दिल्लीकर उच्च प्रतीचे कामसू खवैय्ये आहेत? कामसू खवैये म्हणजे खूप काम करतात खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी! मुंबईकर मिसळ, भुर्जी किंवा भाजीत मेहनत घेतात आणि सोबत पाव देऊन मोकळे होतात. वडा बनवतात आणि पावात खुपसतात. सोबत फारतर चिरलेला कांदा, मिरची, शेव फरसाण वगैरे पदार्थानुरूप भुरभुरतात. खाऊन पटापट ट्रेन पकडायला जाणारी सगळी पब्लिक. दोन दोन द्रोण हातात घेऊन कशी खाणार? दिल्लीकरांना जे जमते किंवा ते जमवतात!