दुःखाची कविता..

अनुराधा पाटील यांची कविता म्हणजे रंजक नकारात्मकता नाही, तर दुःखाचं संवेदन आणि सहवेदन समर्थपणे व्यक्त करणारी एक संवेदनशील नस आहे, जी गोठून बधीर झालेली सहवेदना मानवतेकडे घेऊन जाते.

युवा विवेक    30-Jan-2024   
Total Views |
 
दुःखाची कविता..
दुःखाची कविता..
घनदाट झालेले अटळ अंधारही कधीकधी घेऊन येतात आपल्यासोबत समृद्धीची अशी उत्कट ओल, की अंधारलेले आपले डोळेच चमकून जातात! आणि त्यांकडे पाहण्याची आपली दृष्टीच प्रकाशून जाते. दुःखाचं अस्तित्व तत्वज्ञानातील बहुतेक प्रवाहांनीही मान्य केलेलं आहे. आत्यंतिक दुःखनिवृत्तीचे कोणतेही मार्ग आपापल्या परिने जोखले, तरी दुःख मान्य करावंच लागतं हे विशेषत्वाने जाणायला हवं. ते अटळ असतं, पण कधीकधी तितकंच गरजेचंही असतं. अशाच दुःखाच्या काळोखाचे कितीतरी कंगोरे प्रतिभासामर्थ्याने मांडणा-या कवयित्री म्हणजे अनुराधा पाटील. 'दुःख मांडणारी कविता' म्हणून त्यांच्या कवितेकडे पाहणं एकाअर्थी योग्य नाही. कारण त्या कवितेत दुःख आहे, पण ते अवास्तव नाही. कल्पना किंवा स्वप्नातून डोकावणारं भय त्यात नाही. तर, सद्यस्थितीतील काळोखाचे कवडसे आहेत, त्यातून घेतलेला भविष्यातील अंधाराचा वेध आहे. डोळ्यांच्या कोपा-यात दाटलेल्या न दिसणा-या पाण्याचा वेधक आढावा आहे, आणि अप्रकट वेदनांचे प्रकटीकरण आहे. ते दुःखाचं उदात्तीकरण नाही. पण प्रखरपणे समोर ठेवलेला त्याचा सुकला चेहरा आहे, परखडपणे केलेली योग्य टिका आणि समाजातील घातक विसंगतीविरुद्ध उठवलेला आवाज आहे. त्यांची स्त्रीवादी कविता लोकपरंपरेतील स्त्रीजीवनापाशी फार रमणारी नव्हे, पण नागर संस्कृतीतले तिच्या मनावरचे वरवर लक्षात न येणारे आघात शब्दांतरीत करणारी आहे. केवळ स्त्रीच नाही तर एकूण मानवी आयुष्याच्या मुळाशी असलेल्या धगधगत्या जखमेचे मर्म उलगडणारी आहे. अनुराधा पाटील यांची कविता म्हणजे रंजक नकारात्मकता नाही, तर दुःखाचं संवेदन आणि सहवेदन समर्थपणे व्यक्त करणारी एक संवेदनशील नस आहे, जी गोठून बधीर झालेली सहवेदना मानवतेकडे घेऊन जाते. यातच या कवितेची प्रेरणा आणि यशही असावे, असे वाटते. आज, त्यांच्याच दोन कविता..
भरुन आलेल्या मनासारखे
हे ढग
काय मिळवतात बरसून..
केवढं रितेपण
जाणवत रहातं तुला भेटून..
सुरुवात होताच अगदी लगेच संपते ही कविता. पण खरं इतक्या लगेच संपते तरी कुठे? ती सुरु होते आपल्या मनात, आणि सुरुच राहते! खरं अवघ्या पाच ओळींत पूर्ण होणारी कविता आशयाचं नव आकाश दाखवत आपल्याला स्तिमित करते. 'रितेपण' आणि 'ओथंबलेपणा'च्या अस्फुट सीमारेषेवर रेंगाळणारी ही कविता. म्हणजे.. आयुष्याच्या आशयातच रमणारी, नाही का? कारण आपलं आयुष्यही रितेपण आणि ओथंबलेपणातलं असं संवेदनच तर असतं की! ही कविता कुणाला वाटेलही पावसातील प्रेमकविता.. कुणा प्रियाला भेटून वाटणा-या रितेपणाला दिलेला हा कवितेचा शब्दही वाटू शकेल. पण या कवितेचा अर्थ वा प्रयोजन यापुरतं मर्यादित नसावं असं वाटतं. कदाचित, कवितेतील 'तू' म्हणजे कविताच तर असावी!! मनात भरुन आलेले सजल मेघ शब्दाशब्दांतून बरसतात, कवितेचा आकार घेतात, पण मागे उरतं फार मोठं रितेपण.. तो मोकळं होण्याचा आनंद नसतो, पण मोकळं होऊनही काहीतरी राहून गेल्याची अव्यक्त खदखद असते. त्या रितेपणात बरंच काही सुटून गेल्याची जाणीव असते आणि पुन्हा एकदा ओथंबून जाण्याची अभिलाषाही! बरसण्याची ओढ किती अनिवार असते! आणि पुन्हा पडणा-या प्रश्नांतून भरुन येण्याची तहानही अपरिहार्यच असते! जन्माने दिलेलं श्वासाक्षणांचं ओथंबलेपण आपण जाणतेअजाणतेपणी शिंपत जातो यथामति. पण शेवटच्या एखाद्या क्षणी वाटत असावं का कुणाला हेच? बरसून मिळणारं रितेपण!?
या कवितेला विशिष्ट साचेबद्ध अर्थ नाही. प्रश्नांची अनेकानेक आवर्तनं जागी होतात, पण त्यांनाही उत्तरांची मर्यादा नाही. हेच या कवितेचं वैशिष्ट्य वाटतं. आणखीही कित्येक अर्थ खुणावत राहतात, आणि ही कविता केवळ रितेपणातील वेदना व्यक्त करण्यापुरती न राहता त्यामधल्या मर्माचं दर्शन घडवून समृद्धीचं एक नवं दान आपल्या ओंजळीत देऊ करते.
...
मी एक झाड होऊन वाढतेय
ऋतू येतात ऋतू जातात
गळून पडलेली पानं वा-यावर
दूर कुठं उडून जातात.
गळणा-या पानांचा आवाज
आतून कापणारी एक मंद सुरावट
जीव हलून जातो.
तू सांग कुठे गेले ते दिवस
जेव्हा आपण आपणच होतो…!
आपण झाड होऊन वाढणं हे रुपक फार विचारणीय वाटतं. आपण तसेच तर वाढत असतो! वरुन आणि आतूनही. लौकिकाच्या समृद्धीची दिसणारी भरभराट किंवा पानगळ, खोडावर काळाने कोरलेली सुरकुत्यांची अनुभवी नक्षी, वयानुसार शिणत किंवा वाढतही जाणारं तेजस्वीपण.. त्याचं उन्हपावसांना सामोरं जात लढत राहणं, पाय घट्ट रोवून स्वतःलाच टिकवून तगवून ठेवणं, आणि मातीखालून मुळं लांबवत जाणं, आतल्या कक्षा विस्तारात जाणं, हे सगळंच त्या झाडासोबत आणि तसं आपल्याहीसोबत येतं. आपल्या नेणीवेतल्या मुळांचा थांग आपल्याला नाही. पण वरच्या बहरात आणि पानगळीत अस्थिर होत राहणारे आपण.. येणा-या जाणा-या ऋतुंनाही पाहायचं अनुभवायचं विसरुन गेलेलो आपण.. पाहात राहतो ते केवळ गळून पडलेल्या पानांची आपल्या हाती नसलेली गती. त्या आवाजाला 'आतून कापणारी सुरावट' म्हटलं आहे. ज्याने हलून जातो जीव! मंद होऊन वा अचानक विझून जाण्यापेक्षा भणभणत्या वा-यात अस्थिर राहून अस्तित्व टिकवणा-या ज्योतीसारखंच हे जीवाचं हलून जाणं आहे. आपलीच पानगळ आपण स्वतःच हतबलतेने पाहणं आहे, कदाचित ती थांबवण्याचे अशक्यप्राय मुग्ध प्रयत्नही करणं आहे. पण शेवटच्या ओळी मात्र स्व-संवेदनेला अशाच आतून कापत जातात. ते दिवस जेव्हा आपण आपणच होते, ते कुठे गेले हे माहित नाही. पण, आता ते नाहीत, म्हणजे आत्ता आपण आपण नाही आहोत याची सखोल जाणीव जागी आहे! हे विलक्षण. दुःखातून एखादा साक्षात्कार व्हावा तशीच ही जाणीवही झाली असावी का त्याच सुरावटीतून? माहित नाही. पण अगदी साध्या फुंकरीपासून प्रत्येक वादळवा-याला, फुलासुगंधांना सामोरं जाताना कळत नकळतपणे लावून घेतलेल्या आपल्या नसलेल्या हिरव्या छटा जाणवताहेत. त्या मुळ रंगात इतक्या समरसून गेल्यात की आता असलेलं आणि आणलेलं वेगळं करताच येऊ नये!? कवितेनंतरच्या अवकाशात या उत्तराचीच तर अनिवार धडपड सुरु आहे. सगळे मुखवटे उतरवून आपण पुन्हा एकदा आपण होण्याची तहान आहे. ऋतूचक्राच्या स्नेहाळ जाणिवेत त्यात एक होऊन झुलण्याची अभिलाषा आहे, आणि मुळाच्या टोकापासून पानाच्या कडेपर्यंय आकाशाच्या मोहक निळाईखाली स्वतःमधून उगवण्याची धडपडणारी तळमळ आहे. पण.. या आकृत्रिम आनंदाच्या आर्ततेला दिसू लागतात पुन्हा, गळून पडलेल्या पानांच्या प्रवासाचे न सोसणारे निनाद.. आणि पुन्हा हलून जातो जीव.. प्रश्नांची आवर्तनं चक्राकर घोंगावत रहातात. निःशब्द..
~ पार्थ जोशी