सुगीचे दिस..! भाग - ४

सुगीचे दिस..! भाग - ४

युवा विवेक    03-Jan-2024   
Total Views |
 
सुगीचे दिस..! भाग - ४
सुगीचे दिस..! भाग - ४
शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय फार पुढं गेली की आम्ही ती बुडूखं खांद्यावर घ्यायचो अन् पळत सुटायचो. पाटलांचे वावर मोघम दूर असल्यानं लच्ची आईच्या वावराजवळ आम्ही आलो की, तिच्या केळीत तिनं भरून ठेवलेलं पाणी आम्ही पोटभर पिऊन घ्यायचो.
पुन्हा पाटलाच्या वावराच्या वाटा जवळ करायचो. इतक्या लवकर पाटील कसला येतोय शेतात म्हणून माय लच्ची आईच्या केळीतून शिशी भर पाणी भरून घ्यायची. कारण इस्माईल अन् मला का तरळ भरली तर आम्ही काम न करता जीवावर येतं म्हणून भटकत बसायचो. हे शांता मामी, इस्माईलची माय अन् माझी माय जाणून असल्यानं ती असं उक्त्याच्या कामाला आम्ही सोबत येणार असलो की शीशी भरून घ्यायची.
मजल दर मजल करत रानाच्या रानवाटा भटकत, अख्ख्या पायवाटेच्या धुळीशी खेळून झालं की आम्ही एकदाचं पाटलाच्या वावरात पोहचायचो. वावरात गेलं दहा - पाच मिनिटं आम्ही पाटलाच्या वावरात असलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाच्या पडसावलीत बसून आराम करायचो. मग पाटलाच्या तिथं सालाने असलेला भोळ्या राजू आम्हाला चरवीत पाणी आणायचा अन् मग पाणी पिऊन आम्ही कामाला लागायचो.
मग कांदे काढायला म्हणून आम्ही सऱ्या वाटून घ्यायचो. मी मायच्याजवळ सरी घ्यायचो अन् इस्माईल त्याच्या मायच्या जवळची सरी घ्यायचा शांता अक्का आमच्या दोघांच्या मधात असायची म्हणजे आम्ही एकमेकांशी भांडणार नाही दंगामस्ती करणार नाही. कांदे काढायला मला चांगले जमायचं मग या कामात मायला माझी चांगली मदत व्हायची.
मी पटापट कांदे काढून माय मागे राहिली की, तिची सरी घ्यायचो अन् पटपट दोघांच्या सऱ्या लाऊन आराम करत बसायचो. मग एकदाच सगळ्यांच्या सऱ्या लागल्या की बांधाच्या अंगाला असलेल्या झाडांच्या सावलीत आम्ही बसून रहायचो अन् मग सालाने असलेला भोळ्या राजू चरवी भरून डोक्यावर घेऊन यायचा.
भोळ्या राजूची एक आगळीवेगळी कथा होती. ती कधीतरी नंतर सांगेन पण थोडक्यात सांगायचं तर तो अगदी पाच - सहा वर्षांचा असेल तेव्हा पाटलांनी त्याला किसनवाडीच्या बसस्टँडवरून आणला होता.
तो तिथं हरवून गेला होता, दोन दिवस वडापाव खाऊन जगत होता. पाटलांनी हे त्याचं एकटं असणं हेरले अन् मग त्याला त्यांच्या घरी घेऊन आले, त्याला शाळेत टाकलं पण भोळ्या राजू शाळेत न बसता दुपारच्या सुट्टीत मंगळी आईच्या डोहाला असलेल्या लिंभाऱ्याला आपली दप्तर वजा पिशवी टांगून द्यायचा अन् तिथेच मंगळी आईच्या डोहाला असलेल्या पाण्यात पोहत बसायचा.
तासंतास पोहत बसायचा, पाण्यात समाधी लाऊन कुणी पाण्यात बुडून मेल्यावर जसं पाण्यात तरंगत असते तसं निवांत पाण्यात पडून राहायचा. भोळ्या राजू राजू दिसायला भोळसट होता. डांगरासारखा ढोला अन् उंचीने ठेंगणा. बोटके नाक अन् त्याचा त्या फुगलेल्या गालात हरवलेला नाकाचा शेंडा. टपोरे ओठ अन् त्यात पुढे आलेले दात त्याचं हे रूप त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवायचं.
पुढे भोळ्या राजूची शाळा सुटली अन् पाटलाच्या इथेच तो रोजीरोटी मिळवण्यासाठी सालाने राहिला. अन् मग सालाने म्हंटले की शेतीत हाताला येईल ती कामे तो करू लागला. पाटील त्याला सकाळपासून कामाला जुंपीत दिवसभर काबाडकष्ट केले की, त्याला सकाळी रात्रीच्या भाकरीचा भुगा अन् गिल्लास भर दूध द्यायचे. दुपारच्याला कळण्याची भाकरी अन् जे असेल ते कोड्यास, सांजेलाही दूध काढून जातांना पाटील बाई जो स्वयंपाक केला असेल त्यातून त्याला एका उपरण्यात भाकर बांधून द्यायची.
मग तो ती भाकर घेऊन गावाच्या जवळ असलेल्या राणी आईच्या वावराजवळ पाटलांच्या वावरात पाटलांनी त्याला बांधून दिलेल्या दगडाच्या घरात रहायचा. पाटलाच्या शेतात वीज आली होती पण अजून भोळ्या राजूच्या दगडाच्या घरात काही वीज आली नव्हती. मग तो एका शिशीत केलेल्या चिमनीच्या उजेडात भाकर गिळून घ्यायचा अन् खाटेवर पडून राहायचा. डोळे लागत नाही तोवर उद्याच्या त्याच्या भविष्याबद्दल विचार करत रहायचा.
दिवसभर काम करून आंबून गेल्याने मग त्याचे डोळे लागायचे अन् तो झोपी जायचा.
पुन्हा सकाळी चारला उठलं की आक्खर झाडझुड करून पंधरा म्हशींचे दूध काढून, त्यांना चारापाणी करून तो दूध डेअरीला घालायला घेऊन यायचा. दोन्ही हातात दुधाच्या दोन कॅना पाहून लोकं त्याला हसायचे अन् म्हणायचे पाटलाचे जावई आले बाबा एकदा त्यांचं दूध मापून घ्या अन् पाटलांना आयते पैसे पाठवून द्या. पाटलाचे जावई आहे दूध घालायला डेअरीला असं म्हणत मोठ्यानं हसायचे.
क्रमशः
- भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!