अनाम ओढ...

खांद्यावर ओझं, डोळ्यात स्वप्न, मनात आशा, डोक्यात जिद्द घेऊन जगणारे आपण

युवा विवेक    02-Jan-2024   
Total Views |
 
अनाम ओढ...
अनाम ओढ...
तुमचं बालपण जिथे जातं, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष जिथे जातात, अशी ठिकाणं आणि त्या ठराविक ठिकाणी तुम्ही अनुभवलेल्या गोष्टी, तुम्ही जोपासलेली माणसं,  यांच्याशी आपलं एक वेगळंच नातं जोडलं गेलंय आणि आपलं मन कायम इथेच येऊन थांबतं आणि रमतं असं कधी जाणवलंय का तुम्हाला? बाहेर शिकायला असणारी मी मला शक्य असेल तेव्हा माझ्या घरी परत जाते, मग काहीवेळा अगदी दोन आठवड्यांच्या आत, दोन दिवसांसाठी किंवा जत्रेसारख्या प्रसंगासाठी सुद्धा. तेव्हा माझ्या स्वतःच्या आणि इतरांच्या मनात या माझ्या वेडेपणाच्या बाबतीत अनेक प्रश्न येतात. त्याचच उत्तर कदाचित असं व्यक्त करते आहे.
निरोपाची चार पाऊलं टाकत
मी कधीचीच बाहेर पडले होते इथून खरंतर!
डोळे अगदी दिपून जातील
एवढ्या दिव्यांनी भरलेल्या शहराची
मी केव्हाचीच झाली आहे अशी समजूत होती
माझी आणि माझ्या आसपास असणाऱ्या प्रत्येकाचीच.
माझे विचार, भावना कोंडायला
आता घराच्या चार भिंती नाहीत
तर स्वैर सुटेन वाऱ्यावर अशीही खात्री होती काहींची.
घर आता घर राहणार नाही आणि
मी सुद्धा मी म्हणून परत येणार नाही
असं सगळ्यांनीच ठरवून टाकलं होतं बहुदा.
पण सुटेल, सोडू असं म्हणून या जगात काहीच सुटून जात नसतं.
सवयच म्हणा ती...
खांद्यावर ओझं, डोळ्यात स्वप्न, मनात आशा, डोक्यात जिद्द घेऊन जगणारे आपण
सहज विसरून जातो
हृदयाला लागणाऱ्या ओढीला.
आणि हीच ओढ पुन्हा आणून पोहचवत असते कायम
मला माझ्या घरापाशी.
का, कसली असे प्रश्न पडत राहतात पण
उत्तर देणं, शोधणं, सापडणं काहीच महत्त्वाचं राहत नाही अशावेळी.
अनाम असलेल्या त्या ओढीला पूर्णत्व प्राप्त झालं
की कालांतराने प्रेम आणि समाधान
असं सुंदर उत्तर मिळतं शेवटी.
आता निरोपाची नाही तर विश्वासाची पाऊलं टाकत
अलगद बाहेर पडते,
ओढ असली की मार्ग सापडतो किंवा
आपण तो काढतो सुद्धा असं
साऱ्यांना सांगत परतीचे बेतही आखते,
कारण डोळे दिपण्यापेक्षा समाधानाने बंद होणं आणि
स्वैर जगण्यापेक्षा प्रेमाच्या सहवासात जगणं अधिक योग्य वाटू लागलं आहे.
~ मैत्रेयी मकरंद सुंकले