सुगीचे दिस..! भाग - ५
दूध घालून झालं तसं, भोळ्या राजू दिनकर आबांच्या टपरीवर जाऊन तासभर बसायचा. मग गावभरच्या गप्पा टपरीवर व्हायच्या अन्; पाच पैश्यात दोन बिड्या घेऊन भोळ्या राजू त्या शिलगवून खडकावर उक्खड बसून त्या तिथं ओढीत बसायचा . भोळ्या राजू जेव्हा बिडी शीलगुन प्यायचा अन् त्याचा धूर जेव्हा तो सोडायचा तेव्हा बुटका राजू त्या धुरात हरवून जायचा. मग तलफ लागल्यासारखे भोळ्या राजू त्या दोन्ही बिड्या फुकीत फुकित पिऊन घ्यायचा.
बिडी पिऊन झालं की दिनकर आबांच्या टपरीला रामराम करून पुन्हा पाच पैश्यात दुपारच्या साठी दोन बिड्या घेऊन त्यांना कोपरीच्या खिश्यात टाकून तो हनुमानच्या देउळ कडे जायचा.देऊळामध्ये हनुमानाचे दर्शन घेऊन तो मोठ्यानं हनुमान चालीसा म्हणायचा अन् डोळे लाऊन दहा-पाच मिनिटं देऊळमध्ये बसून चिंतन करत बसायचा.
मग आरती झाली की शिळणीचा प्रसाद वाटून द्यायचा सगळ्या लोकांना. पाटलांच्या वाड्यावर जाऊन भाकरीचा भुगा खाऊन घेत न्याहारीचा डब्बा घेऊन साऱ्या पांदीने गाणे म्हणत तो पायीच वावरात यायचा. वावरात आला की पुन्हा ढोरगुरांना चारापाणी करून रोजची कामं करायला लागायचा.
रोजंदारीवर बायका आल्या की त्यांना काम सांगायचा अन् त्यांच्याकडून कामे करून घेत त्यांच्याशी गप्पा झोडीत बसायचा. भोळ्या राजू भोळा असल्यानं बायका पण त्याच्याशी काम करत गप्पा झोडत बसायच्या अन् पाटलाच्या खाजगी गप्पा त्याच्याकडून काढून घ्यायच्या.
मग हाश्या पिकला की तो मोठ्यानं म्हणायचा आवरा आवरा पाटील येऊन जाईल आता चकराला, काम दिसायला हवं आवरा आवरा..! सगळे पुन्हा हसायचे अन् कामाला लागायचे. मग भोळ्या राजू पाटलांसारखा रुबाब झाडीत एका बांधाला जाऊन बिडी शिलगुन उक्खड बसून ती पित बसायचा अन् तिथूनच बायकांना आवरा आवरा असा आवाज द्यायचा.
त्याचा हा आवाज ऐकताच बायका हात उचलून काम करायच्या अन् तो तिथेच डोळे लाऊन काही काळ पडून रहायचा. मग पुन्हा बायकांच्या गप्पा कानी पडल्या की पुन्हा तोच त्याचा गलका व्हायचा आवरा आवरा..! तोवर दुपार भरली असायची मग बायकांची भाकरी खाण्याची गरबड मग भोळ्या राजू त्यांना विहिरीतून पानी शेंदून आणून द्यायचा, तो ही त्यांच्या संगतीने भाकर खाऊन घ्यायचा.
तर हे असं सगळं होतं,भोळ्या राजू म्हणजे पाटलांच्या गळ्यातील ताईत बनला होता. पाटलांच्या वावरात असलेली सर्व कामे तो एकहाती करत असायचा, त्यामुळं पाटलांचा शेतात फार असा चक्कर नसायचा. शेतीतून जे काही पिकत होते ज्यात पूर्णपणे भोळ्या राजूची मेहनत असायची यातून पाटील समाधानी असायचा.
बाराचा पार कलला अन् सकाळ दुपारकडे कलली भोळ्या राजू दुपारच्या जेवणाच्या आदीचा एक विसावा म्हणून आम्ही बसलो असताना डोक्यावर पाण्याची घाघर घेऊन आला. मला अन् इस्माईलला चांगलीच तरळ भरली होती, मी तटकन उठून भोळ्या राजूच्या डोक्यावरील घाघर खाली टेकवली अन् चपट्या गिल्लासाने दोन-तीन गल्लास पाणी नरड्यात खाली केलं. इस्माईलने पण तसंच केलं.
उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता, सुगीच्या हंगामात इतकी उन्हं कायम असतात म्हणून ती सवयीची झाली होती. दहा-पाच मिनिटं आराम करावा म्हणून मी अन् इस्माईल जांभळीच्या झाडाखाली असलेल्या दाट सावलीत पडून राहिलो. अन् माय, शांता मामी इस्माईलची आई पण दोन-पाच मिनिटं धरणीमातेला पाठ लाऊन आराम केला.
या दोन-पाच मिनिटात उकत्यात घेतलेल्या कांद्याच्या वावराबद्दल कित्येक अंदाज लाऊन झाले. या अंदाजाला पाटलांचा सालदार भोळ्या राजूसुद्धा आता पाटीलकी हानल्यागत गप्पा पाडीत होता. माय अन् इस्माईलची आई त्याच्या या बोलण्याला हो ला हो करत उठले अन् मग तिघींनी त्यांच्या सऱ्यामध्ये बसून चराचर कांदे कापायला सुरुवात केली. मी अन् इस्माईल पण चवताळून उठलो अन् पटपट दोन सरींचे कांदे उपटून बांधावर आणून ठेवले. शांता मामीला त्यांची मागे पडलेली सरी घ्यायला म्हणून मदत करायला गेलो.
तासाभरात बरच काम ओढून झालं अन् भाकरी खायची वेळी झाली म्हणून आम्ही पाटलांच्या वावरात असलेल्या झुळक्या बावडीपाशी बांधलेल्या ओट्यावर येऊन बसलो. भोळ्या राजुने झुळक्या बावडीतून रहटने पाणी काढलं अन् तो ही भाकरी खायला म्हणून आमच्यात येऊन बसला. मायना केलेलं भरले वांगे अन् भाकरीचा बेत आज बेत जमून येणार होता.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.