संगीत - एक दिव्यानुभूती !

युवा लेख

युवा विवेक    03-Sep-2023   
Total Views |

संगीत - एक दिव्यानुभूती!

अंतःकरणातून कंठामधे आणि कंठातून मुखावाटे स्वर उमलण्याआधी सुरू होतो तो तंबोरा! ते संगीत! तो नाद! आणि संगीत हेच अनादी आहे अगदी तंबोर्याच्या त्या सुरासारखं. तो नाद आधी निर्माण झाला आणि मग आपण आलो. जणू त्या एकमेवाद्वितीय नादाचा परमोच्च आनंद अनुभवण्यासाठीच! त्या सर्वोच्च अवस्थेत बुडून जाण्यासाठीच. आधी आलो, मनसोक्त गायलो, त्या अवस्थेत तल्लीन झालो, तल्लीनतेची तल्लीनता अनुभवली आणि त्याच नादात स्वानंदाने विरघळून गेलो. पण शेवटी, मनावर झालेल्या उत्कट संस्कारांमुळे, त्या नादचैतन्याच्या ब्रम्हानंदाच्या मोहिनीने, पुन्हा आकार धरला. पण यावेळी मात्र मनात आलं, की मागील वेळी आपण तृप्तीची सर्वोच्च अवस्था अनुभवताना, ज्या श्रोतृदेवाला तृप्त केलं, ज्याची दाद सानंद समर्पण वृत्तीने स्वीकारली, त्या श्रोतृदेवाच्या भूमिकेतच जावं आणि पुन्हा तृप्त व्हावं. म्हणून पुन्हा आकार धरिला. मागील वेळी एवढ्या पिपासुंना तृप्तीच्या सर्वोच्च स्थितीची अनुभूती देण्यात आपण यशस्वी ठरलो, किंवा आपण त्याचे माध्यम झालो, त्यामुळे त्या सत्कर्मांच्या संचयामुळे ठरल्याप्रमाणे श्रोतृदेव होण्याची संधी लाभली. अनेक अलभ्य योग त्याने सिद्ध झाले. आणि पुन्हा एकदा त्याच ब्रम्हानंदात बुडण्याची, स्वत्व विसरुन जाण्याची अत्युच्च अनुभूती लाभली, लाभत राहिली. नव्याने, पण नित्यनूतन वाटणारी ही स्थिती लाभतच राहिली, लाभतच राहिली. शेवटी, पुन्हा एकदा त्यातच विरघळून गेलो, त्यातच!

पण तो अनादी चैत्यनाद मात्र झंकारतच होता! क्षणभरही न थांबता. कारण तो आहे स्वयंभू! फरक इतकाच की कुणी तो ऐकू शकत होते, तर कुणी होते शब्दांमधेच अडकलेले त्या चैत्याचे बधिर. हा नाद आहे अनाहत! तो सुरु झाला आपल्या जन्मापुर्वी. किंबहुना समस्त मानवजातिच्या, नव्हे नव्हे , संपुर्ण विश्वाच्या, ब्रम्हांडांच्या जन्मापूर्वी! त्याच्या उगमाचे ज्ञान, ना कुठल्या ग्रंथात, ना पुस्तकात, ना जाणिवेत, ना नेणीवेत! पण हे अलौकिक ज्ञान प्राप्त होते. खरतर, ज्ञान 'होतं' ते या अनाहताला शरण गेल्यावर, त्याचा अनुभव घेतल्यावरच!

हाच अनाहत नाद म्हणजे संगीत! साशंक मनात, तथाकथित वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रश्न डोकावतो, की हा अनादी, स्वयंभू, चैत्यनाद संपणार तरी कधी? खरतर, हा अनादी आहे तसाच अनंत आहे.

एकूणच मानवजाती मधले कोणत्याही स्तरावरील अनुभव असोत, शारीरिक, भावनिक, मानसिक किंवा अगदी अध्यात्मिक अनुभूती असो, हे सारे अनुभव किंवा अगदी अनुभूतीही मराठीतील कोणत्याही अक्षराने किंवा अक्षरांने व्यक्त होऊ शकणार नाहीत. किंबहुना, या जगतातील शेकडो भाषांतील लाखो अक्षरं, कोट्यावधी शब्दही व्यक्त करु शकणार नाहीत.

पण ते अनुभव, त्या अनुभूती व्यक्त होतात सा, रे, , , , , नि या सप्तकात! अक्षरांत नव्हे, तर सुरांत! आणि तेही अगदी सहजपणे. जेव्हा एखादा तपस्वी गायक आपल्या साधनेच्या आणि संगीतनिष्ठेच्या बळावर कृतज्ञतेने एक सा लावतो, आणि तो एक सा ऐकूनही आपल्या मनातून अंतःकरणापासून जी उत्कटपणे दाद येते, ती जेवढ्या उत्कटपणे, सहजपणे येते तवढ्याच सहजतेने होत असते अनुभूतींची अभिव्यक्ती, संगीतातून!

शास्त्रीय संगीतातील, सा, रे,....सा हे स्वर म्हणजे जणू ७ मंत्र आहेत, बीजमंत्रच आहेत. कारण मनात ‘त्रायते इति मंत्र’ ही मंत्राची आदिव्याख्या इथे चपखल बसते, नाही का?

आणि या सात स्वरांपासून निर्माण झालेल्या संगीतातील कोणताही राग, कोणताही आविष्कार आपल्याला सहज आनंदानूभूती देतो. मंत्राने जशा व्याधी दूर होतात, दुःखमुक्ती होते तसेच संगीताचेही, नाही का?

हे शास्त्रीय सत्य आहे, की संगीतामधे मनाला शांत करण्याची, मुदित करण्याची अफाट शक्ती आहे. म्हणूनच, अगदी मंत्राप्रमाणेच संगीत मानामधे मोदउमाळे निर्माण करतेच. मंत्रशास्त्र प्रतिपादन करतं, की शास्त्रीय संगीतातील विशिष्ट राग हे आपल्या विशिष्ट शारीरिक व मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करुन, शरीरामधे सकारात्मक बदल घडवून आणते.

मग असं वाटतं आणि पटतंही, की या तीरावरुन त्या तीरापर्यंत पोहोचवणारा स्वरसेतू म्हणजे संगीत. पण क्षणात वाटतं, की सेतू नाही तर समोर अथांग पसरलेला शांत असणारा, शांत करणारा, सतत लाटांचे चांचल्य असूनही सतत शून्यावस्थेत रहाणारा सागर म्हणजे संगीत! पण तसेही नाही. खरतर त्याच्या कृपेने, पैलतीरावर पोहोचल्यावर भान होतं, साक्षात्कार होतो, की आपल्याला या तिरावर घेऊन येणारा स्वरसेतुही संगीत, ते शुन्यावस्थेतील अथांग जलरुप म्हणजेही संगीत. पण या तिरावर सुखरुप पोहोचल्यावर, सुखस्वरुप झाल्यावर तो सागर, तो सेतू सारं मागं पडलं आणि उरलं तेही संगीतच! मग ते आधीही होतचं इथपर्यंत येतानाही आहेच आणि आता ही आहेच. कारण त्याचं असणंच आनंददायी आहे. त्याचं आपल्यातील असणं त्याला हर्षदायी वाटू लागतं. आता शोधण्याची तीव्र आस जागते, किंबहुना ती जागी असल्याची जाणीव प्रखरतेने त्याला होते. त्याचं आपल्यातील किंवा आपलं त्याच्यातील असणं जाणवून त्याच्या मनात चैतन्याच्या लाटा उसळू लागतात आणि तो नकळतपणे अंतर्मुख होतो. शेवटी, अंतर्मुख होण्यातच आनंद आहे!

- पार्थ जोशी