माणूस आणि माती ह्यांचं अविभाज्य नातं अनेकानेक शतकांपासून, नव्हे नव्हे, युगानुयुगांपासून फुलत आलं आहे. या सर्वांगसुंदर नात्याची अतूट विण माणसाच्या वाढत्या प्रगल्भतेबरोबर नित्य दृढ होत जाते ही साक्ष आहे इतिहासाची ! ज्या मातीत माणूस जन्मतो, जगतो, जुना होतो आणि जळून जातो, ती मातीच तर असते त्याच्या सोबत, अगदी जन्मापासून शेवटपर्यंत. जागा कुठलीही असली, तरी बाळाची नाळ पुरली असते 'मातितच'. त्यामुळे, अजाणतेपणीही प्रत्येकाच्या मनात असतोच, एक अनंत लळा, मातिविषयी.
कारण, माणसाच्या मोठेपणामागे असो वा परिपूर्णतेमागे, सगळ्या मागे असतो तो संस्कार, मातीचा, त्या मातितील संस्कृतीचा. आणि म्हणूनच माणसाच्या कर्तृत्वामागे असतो त्याच्या मातीचा, जन्मभुमिचा उदात्त सुगंध ! ज्या मातीत त्याचा जन्म झाला असतो, ती मातीच होते त्याच्यातील मनोमृत्तिका ! आणि या तळावरच, या मनोभुमीवरच साकार होत असतं अद्भूत सृजन.
माणूस जमिनिवर वावरताना कितीही मोठा झाला, त्याचे हात आभाळाला कितीही टेकले, तरी त्याचं भूमिप्रेम त्याचे पाय जमिनिवरच ठेवतं. ज्याच्या मनात खरोखरीच हे मातृप्रेम असतं, त्याची कथा काय सांगावी. आपले आभाळाला टेकलेले हात जर आपल्या मातृमृत्तिकेचा उद्धार करायला समर्थ नसतील, तर त्यांचा काय उपयोग ? असा उत्कट प्रश्नही अनेकांना पडतो. हेच त्या स्वयंपुर्ण मातीबद्दलचं शुद्ध प्रेम, नाही का ? आणि असे लोक आपले आभाळाला गवसणी घातलेले हातही तिथून काढून आपल्या आईसाठी काम करायला सानंद कृतार्थतेने लागतात. आपल्या देशासाठी, मातृभूमीसाठी काही रचनात्मक करायचं, कृतार्थतेने तिचं ऋण फेडायचं हीच जाणीव असते अशा सकृतार्थ अभिमानी सुसज्जनांमधे. आपल्यामधील समस्त मानवजातीची नेणीवही याच मातीची हे ठाऊक असतं त्यांना. म्हणूनच अगदी वैदिक काळापासून हा धर्म कृतार्थ भावे पुजतोय या महन्मंगल धरित्रिला. ऋग्वेदातील पृथ्वीसूक्त असो की आजच्या कोणा नवकवीने केलेली साभार कविता असो, तोच भाव व्यक्त करु पहात आहे, समस्त मानवजात.
आपल्या असमर्थतेची जाण असूनही, हिचं ऋण जे फेडू बघतात, तेच तर होतात महापुरुष ! "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..." ही सावरकरांची आर्त हाक अजुनही भारावते, रोमांचित करते, प्रत्येक चित्ताला. ह्या मातृभूमीप्रतिच्या अलौकिक स्नेहानेच त्यांना जगवलं होतं अंदमानातील कोठडीत. त्यांच्या काव्याच्या आर्त भावामागे दरवळत होता याच मातीचा सुगंध, आणि लखलखत होती श्रावणातल्या वीजेसारखी विलक्षण प्रतिभा. या मातिनेच त्यांना प्रदान केलं, अलौकिक महापुरुषत्व !
युगनायक विवेकानंदांची कथा तर आपण काय आणि कशी सांगावी ? आपल्या मातितील एकमेवाद्वीतीय वेदांत तत्वज्ञान ते घेऊन गेले पाश्चात्य देशांत. हिन्दुत्वाची, तेथील मौलिक तत्वज्ञानाच्या सामर्थ्याची विस्मयजनक ओळख कदाचित पहिल्यांदाच झाली असेल पाश्चात्यांना. तिथे त्यांना लाभलेली प्रतिष्ठा, मान-सन्मान, यशोकिर्ती आणि सुप्रसिद्धी यात ते सहजच रमू शकले असते. तिथे काही प्रमाणात सुरू असलेले वेदांताचे वर्ग तसेच सुरू ठेवून, किंवा वाढवूनही ते सहज व्यतित करु शकले असते त्यांचं आयुष्य, तिथेच, आनंदाने, उपभोग्य ऐश्वर्यात ! पण त्यांनी तसं केलं नाही. तेथील ऐश्वर्य, लोकांकडे असलेला मुबलक पैसा बघून त्यांना तिथे रहावसं तर वाटलं नाहीच, पण आठवलं ते भारतभूमितील लोकांचं दारिद्र्य. तेथील सुखसंपत्ती, ऐशोआराम बघून त्यांना आठवलं, ते अंग झाकायला पुरेसे कपडे नसणार्या भारतातील बहुसंख्यांचं दारिद्र्य. याने ते इतके हेलावून गेले, की ते रडून रडून अक्षरशः लोळले ! असे सत्यसंदर्भ सापडतात त्यांच्या चरित्रात. किती ही संवेदनशीलता आणि किती हे देशप्रेम ! खरोखर शब्दातीत ! आणि हे युगानुयुगांपासून चालत आलेलं प्रेम, ही आस्था, याला कोणतेही युगही अपवाद कसा असेल ?
अगदी त्रेतायुग म्हटलं, तरी आपल्याला सहज आठवतो तो लक्ष्मण. रावण वधानंतर सोन्याची लंका पाहून प्रलोभीत झालेला भ्रातृश्रेष्ठ लक्ष्मण. आणि आठवतात
" अपि स्वर्णमयी लंका...."
हे जानकीवल्लभाचे सस्नेह उत्कट उद्गार. रामचंद्र लक्ष्मणाला समजावतात, की लंका जरी सोन्याची असली तरीही ती मला आवडत नाही. आणि इथेच न थांबता, पुढे ते म्हणातात, माझी आई, म्हणजेच मझी मातृभूमी ही मला स्वर्गाहूनही प्रिय आहे. या वाक्याने लक्ष्मणाच्या मनातील प्रलोभन तर विझून जातेच, पण आपल्या सर्वांसाठीच नित्य प्रेरित करणारं असं हे महवाक्यच ठरतं. कारण ज्यांनी ज्यांनी म्हणून आपल्या पायाला लागलेल्या मातीचं स्मरण आजन्म कृतार्थतेनं केलं, ते आदर्श तर झालेच, पण त्यांचं सादर स्मरणही आज आपण सानंद करतोय. हेच त्यांचं आणि त्यांना निर्माण करणार्या मातीचं भाग्य, नाही का ?
- पार्थ जोशी