कोरियन सुपी नूडल्स/रामेन सगळ्यांना माहीत आहेत. मार्केट आणि युट्युबवरील रिल्स या रामेनने ओसंडून वाहतेय; पण आपल्या भारतात असेच रामेन खाल्ले जाते हे कोणाला माहीत नसेल. लडाखमध्ये कित्येक वर्षांपासून स्क्यू नावाचा पदार्थ बनवतात. आता याला आपण रामेन म्हणू शकतो किंवा पास्ताही. रेसिपी पाहिली तर काहीशी डाळ-ढोकळीच्या जवळपास जाणारी आहे.
स्क्यू बार्ली पिठापासून मुख्यतः बनवतात; पण त्याऐवजी गव्हाचे पीठही घेऊ शकता. गव्हाचे पीठ, मीठ, तेल आणि पाणी घालून भिजवून घ्यावे. पोळ्यांची कणिक असते तशी मऊसर कणिक असते. या कणकेचे लहान गोळे घेऊन त्यावर अंगठ्याने दाब देऊन पणतीसारखा आकार देऊन तयार करावे. याचा आकार आणि ओरेचिएट पास्त्याचा आकार खूप सारखा आहे. त्यानंतर कढईत तेल किंवा बटरची फोडणी करून त्यात वेगवेगळ्या भाज्या परतल्या जातात. याकच्या दुधाचे बटर बहुदा वापरले जाते. भाज्या शिजण्यासाठी पाणी आणि मसाला घालून उकळतात. अर्धवट भाज्या शिजल्या की, त्यात स्क्यू टाकून परत उकळतात. सर्वात शेवटी यात याकचे दूध मिसळतात.
स्क्यूमध्ये टर्नीप, बटाटा सारख्या भाज्या, साग सारख्या पालेभाज्या आणि मांसही असते. गरमागरम स्क्यू थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय छान पदार्थ आहे. नाश्यासाठीच नाही तर रात्री वन डिश मिल म्हणूनही उत्तम पर्याय. ताज्या स्पगेटी नूडल्स जितक्या प्रसिद्ध आहेत तितका स्क्यू नाही. बाजारात रेडिमेड स्क्यू मिळत नाही. हा तर गहू किंवा सातूच्या पिठापासून बनवतात आणि पौष्टिकही आहे. पहाडात गेल्यावर सुंदर पहाडांच्या बॅकग्राऊंडला मॅगी बनवून खाल्ली जाते आणि त्याचे रिल्स बनवले जातात. अजून स्क्यू सारखा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ खातांना आणि त्यावर पोस्ट टाकतांना मी तरी कोणाला पाहिले नाही. किंबहुना यावर इंटरनेटवर माहितीही कमीच आहे. याच्या इतिहासाबद्दल माहितीही मिळाली नाही. सध्यातरी माझे लडाखी मित्रमैत्रिणी कोणी नसल्याने मलाही फार काही सांगता येणार नाही. त्यासाठी लडाखलाच जावे लागेल. दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी घरी हा पदार्थ करून पाहू शकतो किंवा आपली वरणफळं/डाळचिकोल्या किंवा डाळ ढोकळी आहेच, त्याचा आस्वाद घेऊ शकतो.