सूर्य दुपारच्या पाराकडे कलता झाला होता. उन्हं मी म्हणू लागले होते आणि या उन्हाच्या तिरीपेत संतू अन् गोंडाजीचं दांडगे शरीर दगडावर घाव घालीत होतं. प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या उडु लागल्या होत्या, पाथरवट जसा छनीच्या सहाय्याने दगडाला आकार देतो तसा ओबडधोबड दगुड फुटून आकार घेऊ लागला होता.
कालपर्वाच खदानीत बार उडवला असल्यानं आज वऱ्हाटे, पाटे करायला म्हणून मोप दगुड उपलब्ध होता. वेळीच त्याला आकार देऊन शिंगरावर लादून फक्त त्याला झोपडीपर्यंत न्यायचं होतं, हे जितकं सोप्पं वाटत होतं तितकंही सोप्पं काम नव्हतं.
घटकाभर संतू अन् गोंडाजी काही आकार मिळालेला दगड घेऊन सावलीला आले. कॅनीत असलेलं पाणी गिल्लासात घेऊन दोघेही पित होते अन् घोटासरशी नरड्याच्या खाली उतरणारे पाणी सहज नकळत डोळ्यांना दिसून जात होते. पाणी पिऊन काही पाच दहा मिनिटांची विश्रांती म्हणून दोघे सावलीला खदानीच्या भिंतीला पाठ लाऊन आराम करत बसले.
इकडे रानूबाई, सुमनबाई अन् संतूची बाई तालुक्याच्या गावाला आपली वऱ्हाटे,पाटे डोईवर घेऊन गल्लोगल्ली विकत फिरत होत्या. इळाचे दोन सट जरी विकले तर दिवसभराची मजुरी हाताला लागल इतका पैका त्यांना भेटत होता. पण; हल्ली शहरात असो की खेड्यात परिस्थिती सगळीकडेच सारखी झाली होती.
प्रत्येक घरात वऱ्हाटे, पाटे, दिवे, उखळ काळाच्या ओघात लुप्त झालेल्या होत्या. हल्ली त्यांची जागा मिक्सरसारख्या इलेक्ट्रिक साधनांनी घेतलेली होती.
पहाटेच आठला निघालेल्या या तिघी बायका दुपारभरली तेव्हा एका शहराच्या कोपऱ्याला असलेल्या पडक्या घराच्या आसऱ्याला थांबल्या. कुठून बाटलीभर पाणी घेऊन दुपारच्या जेवणाला म्हणून बसून जेवण करू लागल्या होत्या. दोघींचा दुपारपर्यंत एक सट विकून झाला होता. तेवढ्यासाठी त्यांना अख्खं अर्ध शहर पायाखाली घालावे लागले होते. आता इतक्या थकल्या नंतर भाकरी खायची इच्छा नसूनही पोटाला भूक लागली म्हणून बळच त्या भाकरी गिळत होत्या.
सोबतीने गप्पांचा फडही रंगला होता. आयुष्यात इतकी कष्ट असूनही जेव्हा अश्या घटकाभर गप्पांचा फड रंगायचा तेव्हा तितकाच त्यांच्या जीवाला विसावा मिळायचा. मग माहेरच्या आठवणी, बालपणाच्या आठवणी यांनी डोळ्यातून आसवांना मोकळी वाट करून दिली जायची. अश्या वेळी मग तिघीमध्ये अजून जवळीक निर्माण व्हायची अन् एकमेकींचे दुःख रिते करत त्या गप्पा मारत दुपारची भाकर खात बसल्या होत्या.
इकडे आज तिघांच्या झोपड्या असलेल्या त्यांच्या या वस्तीला फक्त नागूचा अन् त्यानं पाळलेल्या दोन कुत्र्यांचा आसरा होता. कंबरा इतके उंच भुरे दोन झिपरे कुत्रे अन् त्यांच्या दातांना बघितलं तर कुणी त्यांच्या झोपडीच्या जवळपास भटकणार नाही, अशी ती कुत्रे होते. कोणी खोडीला गेलं म्हणजे कुत्र्यांनी लचका तोडला समजा अशी एकूण अवस्था होती.
इकडे नागू पहाटेच पोरांना कामाला वाटी लावून देत न्याहारी करून बसल्याजागी छनी अन् हतोड्याची घाव दगडांवर घालीत दगडांना टाके देत त्यांना आकार देत होता. जसं मूर्ती तयार व्हावी तसे वऱ्हाटे, पाटे, दिवे, उखळे तयार होऊ लागले होते. हे काम जरी बैठकीचं होतं पण खरा कस या कामात लागत होता. एखादा चुकीचा टोला दगडाला लागला तर सगळा दगुड फुटून जाईल अन् सगळी मेहनत पाण्यात जाईल ही जोखीम असायची. पण; इतक्या वर्षांच्या कामानंतर आता हे कामाचं कसब नागूला उमगले होते अन् खूप सफाईने तो हे सर्व काम करत होता. तो पोरांच्या अश्या कामाशी काम वागण्याने खुश होता. पोरं अन् त्यांच्या बायका पण कामाशी काम करत असल्यानं नागुचा संसार अन् नागुच्या मित्राचा संसार फुलत असल्याचं त्याला जाणवत होतं. जरी गरिबीची झळ त्याच्या संसाराला कायम होती पण दोन्ही झोपड्यात नागूच्या शब्दाला मान होता.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.