'थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा...' या दासू वैद्यांच्या ओळी वाचून आपण स्तब्ध होतो क्षणभर. अंधाराला लागलेली उजेडाची आर्तव्याकूळ तहान आपल्याला हवीशीच वाटते हे खरंय; पण 'थकलेला' हे अंधाराच्या अलिकडे ठेवलेलं एक विशेषण फारच विशेष वाटतं. चिंतनीय आणि मनामध्ये अनाम भावनांचं मोहोळ जागं करणारं. आधीच अंधार आणि त्यातही तो थकलेला पाहून आपल्याला आगतिक झाल्याची किती खोल जाणीव होते! शब्द पाहून त्यांची गंमत तर वाटतेच; पण अर्थाशयाची व्यापकता पाहून आपण अवाक् होऊन जातो!
वाटतं, का बरं थकला असेल हा अंधार? सायंप्रहरानंतरच आगमन झालेला असतो तो. मग इतक्यात थकावं? इतक्यात शिणून जावं? की दिवसंच थकून भागून निस्तेज होता होता मावळून जातो स्वतःमध्ये? आणि उरतो फक्त गळून गेल्यावर, तेज हरपल्यावर उरणारा हतबल अंधार? असे कितीतरी अनुत्तरित आणि खरंतर अनुच्चारित प्रश्न आत जागे होतात. आपण मात्र अस्वस्थ होत रहातो. रात्रीसारखेच!
पण एखाद्या वेलीचं हिरवेपण शोधत जावं मुळापर्यंत, तसं सहज जावसं वाटतं मागच्या ओळींपाशी. रात्रीचा शोध घ्यायला संध्याकाळच्या गूढरम्य रंगाकडेच तर जावं लागतं!
संध्याकाळी कातरवेळी
खोलवरी लागे दिवा
थकलेल्या अंधाराला
उजेडाचा स्पर्श हवा!
दिवस आता मावळू लागलाय. मावळलाय. मग तो खरंच एखदा दिवस असेल किंवा अगदी आयुष्य असेल! कोवळी उन्हं तर आता केवळ पोळलेल्या स्मृतीकोषातच आहेत. कारण रात्रीची चाहूल लावणारी संध्या आता हळूहळू ढगांआडून नकळतच आलीये. ती कातरवेळ हवीशी वाटतेय कुणाला, कुणाला मात्र आतून उदास करणारी ती आकाशातली ओली हळहळ आहे. अशा सांजवेळेतूनच तर हे शब्द आले असणार. कारण अशा गूढरम्य वेळी खोलवर एक दिवा लागला आहे. खरं तो लागला नाहीये, जागून आलाय. तो तर पहिल्या श्वासाच्याही आधीपासून तेवतो आहे, आदिम तहानेची साक्ष देत. ही संध्याकाळ त्या दिव्याच्या जाणिवेला जागी करणारी झालीये. म्हणून तो दिवा लागला आहे. वाटतं, की त्या जाणिवेतूनच तर पुढच्या ओळी आल्यात, नव्हे त्या ओळी म्हणजे जाणीवच तर आहेत! तेव्हा मग आतली रात्र उजेडाच्या तहानेने नव्याने व्याकूळ झालीये. तिला उजेडाला कवेत घ्यायचे नाहीये, न उजेडावर आपला हक्क सांगायचाय, तिला केवळ एक स्पर्श हवाय उजेडाचा. कारण त्या एका प्रकाशस्पर्शानंतर ती तिची उरणारच नाहीये. अंधार प्रकाश होऊन जाणारे हे ती रात्र जाणते. सहज वाटतं, की 'उजेडी रहावे, उजेड होऊन' हे माऊली म्हणते, तेव्हा त्यामागे असाच स्पर्श अपेक्षित असेल का?
तो स्पर्श झाला, की तृष्णा शमणार आहे. अंधार संपून जाणार आहे; पण अंधाराची तहान आहे ती उजेडाच्या स्पर्शाची. त्या स्पर्शानेच तो शांत होणार आहे. आनंदी होणार आहे; पण उजेडाचा स्पर्श झाला की, अंधार कुठे रहाणार आहे? तो स्वाभाविक विरघळून जाणारे उजेडात. तेव्हा वाटतं की, नसलेपणातच असतो का आनंद? की ती सोय असते? असलेपणात असणाऱ्या कर्तव्य जबाबदाऱ्यांच्या ओझ्यापासून दूर जायची... आनंदी व्हायची? अर्थात नाही. आनंद नसलेपणात असतो हे अगदी खरंय; पण हे नसलेपण आपलं नाही, आपल्या अज्ञानाचंय! कुरवाळत जपलेल्या अहंकाराचंय, अशाश्वताला चिरंतन समजण्याच्या भ्रामक जाणिवेचंय, त्यांच्या नसलेपणातच तर आनंद आहे. कारण त्यांनी निर्माण केलेल्या संकुचितात आपण प्रकाशाचेही भाग पाडू लागतो! या अज्ञानाच्या, अहंकारासाठी तळमळणाऱ्या भ्रामक खटाटोपीत किती थकून जातो आपण! आपल्या थकव्याचे आपणच कारक होतो; पण एकदा आत खोलवर जाणिवेचा दिवा लागला की, आपोआप वाटू लागतं.. .
'थकलेल्या अंधाराला, उजेडाचा स्पर्श हवा!'
किमान आपल्या अंधाराचा ज्वर उतरु लागतो, उजेडाची स्वप्न नव्याने आकारु लागतात...
- पार्थ जोशी