वाळूत पाऊले उमटताना
स्थैर्य लाभते अबलक मनाला
पाऊलखुणा सोडताना...
गाज त्याची देऊन जाते
भूतकाळातील चर्चा
रूप लाटांचे घेउन येते
प्रयत्नांच्या पराकाष्ठेची इच्छा
समोर जलसमाधी घेत असतो
तांबूस तारा केव्हाचा...
वरून सळसळ ऐकू येते
निरोप असतो माडांचा...
एकला तू नाही जगी
व्यक्ता अव्यक्ताचा खेळ ज्याचा
बघून सागरा मनास कळतो
अथांगपणा मग विचारांचा
पुन्हा एकदा अस्त होतो
निराशेचा मनातल्या
निसर्गाची सोबत मिळते
पुन्हा नव्याने जगायाला
शांत चित्ती बसून रहावे
मनोरे वाळूचे बांधताना
पुन्हा मिळावा अर्थ आयुष्या
सागरकिनारा पाहताना
दूरवरून मग ऐकू येते
साद लहानग्या विहंगाची
भानावर मग येते मी ही
लागूनी ओढ घराची
नजरेमध्ये मग कैद करते
अफाट रूप सागराचे
पुन्हा नव्याने येईन भेटीस
गुंफण्या नाते त्याचे माझे
- मैत्रेयी सुंकले