म.म. देशपांडे आपल्या एका कवितेत अगदी सहजरीत्या म्हणतात,
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण!
आणि वाटतं, या ओळींचं मुर्तिमंत जीवंत उदाहरण म्हणजे विवेकानंद! कारण काहींना लागते अशी तहान, जन्माने दिलेली आणि सिद्धीस नेतात तेही, त्या तहानेचं प्रयोजन, आपल्या अलौकिक कार्याने. पण 'काहीच'! असेच विवेकानंद! ही तहान काही साधीसुधी नाही, अंधाराची तहान त्यालाच लागते, ज्याच्या जाणिवेत प्रकाशाचं अधिष्ठान असतं; पण ते जाणण्याचं आणि पसरवायचं काम हे त्या तहानेसारखंच जीवघेणं असतं! कारण ही ध्येयवेडी जीवने त्या तहानेच्या शमानार्थ काहीही करु शकतात, अगदी काहीही! मग विवेकानंदांचं पाश्चिमात्य जगतातले वैभवविलास बघून, आपल्या देशातील करुण दैन्याची आठवण होऊन लोळणं असो, वा अनोळखी देशात कुणीही ओळखीचं नसताना, केवळ 'त्याच्या'शी असलेल्या नात्यावर, रस्त्यावर प्रसंगी उपाशी रहाणं असो. ही व्याकुळ माणसं पिपासेपायी अशक्यही शक्य करुन दाखवू शकतात. मग एका दिवसात किंबहुना, काही मिनिटांत मिळालेली लोकप्रियता हे त्याचच फलित! पण त्यासाठी, त्यामागे दिलेली पंचप्राणांची आहुती, देशकार्यासाठीचे संपूर्ण समर्पण यानेच शमू बघते. तहान, कदाचित तीही असह्य होऊन हरुन जाते, या व्रतस्थ महापुरुषांच्या अथक परिश्रमांपुढे; पण ही तहान त्या एकट्यासाठीची नसतेच मुळी. ती शमवते समाजमानसातील कित्येक छोट्यामोठ्या पिपासा आणि जो जाऊ पाहतो तिच्या खोलात. या युगपुरुषांच्या चरित्राच्या गाभार्यात, त्यांना सर्वांगानं चिंब करुन सोडते ही ज्ञानाची गंगोत्री आणि असे महापुरुष घडून गेल्यावर त्यांच्या कार्याचे, विचारांचे कित्येक पदर उलगडायला, समजायलाही जातात कित्येक शतकं. पण तरीही हाती सारं येतंच असंही नाही. वाटतं, त्यांनी सांगून ठेवलंय जीवनाचं, जीवनाच्या सर्वांगाचं मर्म, सर्वार्थानं. कुणीही यावं आणि त्यांच्याकडून हवं हे घ्यावं, आचरावं आणि कृतार्थतेचा अनुभव घ्यावा!
विवेकानंदांची अलौकिक ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सस्नेह गुरुबंधुत्व, प्रखर राष्ट्रवाद, सारं आपल्या कस्पटासम असलेल्या इवल्याशा मनाला निशब्द भारावून टाकणारं आहे. ज्यांची कथा लिहिताना शब्दांच्या अंगावरही काटा यावा अशी ही अलौकिक राष्ट्रमूर्ती, विवेकानंद! ज्ञानयोग, भक्तोयोग, राजयोग आणि कर्मयोग यांची समर्थपणे सांगड घालणारं 'विवेक जीवन' म्हणजे जीवनाचा शब्दातीत समन्वयच वाटतो! आणि वाटतं, की आपण जातो विवेकानंदांचं उत्तुंग व्यक्तिमत्व शोधायला, शब्दांच्या वाटेतून... आपल्या किंवा त्यांच्याही. पण विवेकानंद हे केवळ व्यक्तिमत्व नाही! तो एक भारावून टाकणारा विचार वाटतो! शब्दातीत समन्वय वाटतो! आणि त्याहीपलीकडे एक अलौकिक स्वयंतेजस्वी तत्व वाटतं! प्रखर प्रेरणेचे दिवे चेतावणारं, ज्ञानाची उत्कट आस जीवंत करणारं, भक्तीची उत्कटता, ध्यानावस्थेतील आनंद यांप्रतीची उत्कटता जागवणारं. समूळ शांतीचा झरा आपल्या सानशा ओंजळीत सहज देऊ पहाणारं तत्व! आणि उत्तिष्ठत, जाग्रत म्हणत आपल्यातील आपल्याला साद घालणारं, जागावणारं तत्व!
शब्दांना कधीही न गवसणारं, अर्थांना न उमगणारं, मानवी सामर्थ्यांपलीकडलं! अनंताच्या शिखरावर, ते आजही गंधाळतय, अंधारातील शाश्वत निरंजन ज्योत होऊन. जे आतुर आहे, आपला प्रकाशाचा तेजोमय वसा आपल्या हाती सोपवण्यासाठी. पण आपल्याला, हात पुढे करायला हवेत!
- पार्थ जोशी