काळोखात खाच खळग्याची वाट चालत मी तो प्रकाश जवळ केला अन् एका झोपडीवजा घरात जाऊन बसून राहिलो, पूर्णपणे भिजलो होतो. कसंतरी अंग कोरडं केलं, मशालीचा उजेड वाऱ्याच्या झुळकेसरशी विझायला यायचा; पण त्यात असलेलं इंधन त्याला विझू देत नव्हतं. झोपडीवजा घर हे चहूबाजूंनी निरखून बघितलं तर ते घर नव्हतं. कुठल्याश्या देवीचं ते मंदिर भासावं असं काहीसं होतं. जिला खणाची साडीचोळी घातलेली होती, तिच्याजवळ एक धातूचा त्रिशूळ होता अन् त्याला लिंबाची माळ घातलेली होती.
पाऊस काही केल्या बंद होईना झाला होता, डोंगरातले पाणी उतरतीच्या दिशेनं गावाकडे येत होतं. झांबेरी गावात पूर यावा इतकं पाणी वाहत असल्याचं काळोखात दिसून येत होतं. घटका दोन घटका पाऊस तसाच चालू राहिला. मी पाय लांबवून या मंदिरातून पडत्या पावसाला बघत बसलो होतो. पाऊस काही सरता सरेना झाला होता. अवकाशात काळवंडलेले ढग डोक्यावरून डोंगराच्या पल्ल्याड जाताना काहीतरी अजस्त्र, महाकाय या पडत्या पावसात अवकाशातून जात असल्याचं वाटून जात होतं अन् त्यामुळं काळीज अजूनच चर्रर्र करत होतं.
मध्यरात्र कशी होऊन गेली कळलं नाही अन् दोनच्या ठोक्याला थकव्यामुळे मला बसल्याजागी झोप लागली. गोणपाट खाली अंथरून अंगाचा मुटकळा करून मी झोपून राहिलो होतो. अवकाशात अजूनही विजा कडाडत होत्या, मंदिरही आता गळतीला लागलं होतं, त्याच्या पत्रातून आता पाणी दिसू लागलं होतं; पण नसल्यापेक्षा हा असलेला आधार बरा वाटतं होता.
झोप कशी लागली कळलं नाही, डोळे उघडले तेव्हा पहाट झाली होती. डोळे चोळतच मी मंदिराच्या बाहेर आलो. अजून उजाडलं नव्हतं; पण कोंबड्याच्या बांगेसरशी मला जाग आली होती. गावातली काही मंडळी रात्रभर चालू असलेल्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी नदीच्या दिशेने जाताना दिसले अन् काही टरमळे घेऊन येतानाही दिसले .
मला हसू येऊ लागलं की लोकं नेमकं कशासाठी नदीच्या अंगाला जात असावी. मी उठलो गोणपाट कंबराला बांधून घेतलं अन् नदी थडीला पाण्याचा अंदाज बघावा, म्हणून मी तिच्या किनाऱ्याशी येऊन उभा राहिलो. गावात नवखा असल्यानं सगळे माझ्याकडे बघत होती. त्यांच्यात आपापसात गप्पा चालू होत्या.
नदीही दुथडी भरून वाहत होती. गावातली तरुण पोरं तिच्या मनसोक्त पोहत होती. गावाचा यावर्षीचा पहिला पाऊस इतक्या दणक्यात पडला, त्यामुळे झांबेरी गाव निवासी समाधानी असल्याचं त्यांच्या गप्पातून वाटत होतं.
मी नदीच्या किनारी बराचवेळ बसून आता परतीच्या वाटेला निघायला हवं म्हणून पुन्हा गावात आलो. एका टपरीवजा दुकानात तोंड धुवून त्यांना चहा अन् भजी हवी म्हणून ऑर्डर दिली. मी दुकानावर असलेल्या बाकड्यावर बसून होतो.
तितक्यात दुकानदाराने प्रश्न केला:
“कुठून आले हाय वं सरकार..!”
मी बोलू लागलो.
“इथलाच हाय शहरातला, दोन दिवस सुट्ट्या पडल्या म्हणून आलो होतो फिरायला; पण रात्रीचा पाऊस पडला अन् सगळा प्लॅन फेल झाला.
दुकानदार बोलू लागले.
“म्हजी काल रातच्याला तुम्ही गावात हुता इतक्या पावसात कुठं राहीलासा?”
मी त्यांना हात उंचावून बोट करत दाखवलं, “ते मंदिर हायसा तिथं राहीलोसा, रातभर भिजत होतो. जीवाची बेक्कार आबळ झाली; पण रातीचा वेळ कुठं जाता येईना झालंसा.”
दुकानदार बोलू लागला, “आता कुठं निघाला हायसा?”
“मी? कुठं नाय परतीच्या वाटेला लागणार डोंगर दऱ्यात आलेलं पाणी बघायचं, खळाळते झरे डोळ्यात साठवून घ्यायचं अन् शहराकडे जाणाऱ्या परतीच्या वाटा जवळ करायच्या असा एकूण प्लॅन हायसा.”
तितक्यात दुकानदार काकाने गरमागरम भजे अन् चहाचा कप माझ्यासमोर असलेल्या टेबलावर ठेवला अन् पाण्याचा जग हिसळून त्यात पाणी आणून दिलं.
मी चहा पीत अधूनमधून भजे खात निसर्ग न्याहाळत होतो. ढग दाटून आलेले होते अन् वर डोंगराच्या माथ्यावर ढगांची गर्दी दाटून आलेली होती. पावसाचं पाणी अजून रस्त्यानं वाहत होतं; पण रात्रीच्या प्रवाहापेक्षा आता मात्र प्रवाह ओसरला होता.
मी नाष्टा करत असताना गावच्या तरुण पोरांनी माझी विचारपूस केली, काही जाणत्या लोकांनी विचारपूस केली. माझा सगळा आवजवा, बोलायची भाषा बघून त्यांनी माझ्या समवेत फोटो काढले अन् मी नाष्टा करून गावातल्या या लोकांचा निरोप घेतला. काल रात्रभर अनोळखी गावात एका मंदिरात मी थांबलो होतो. याचा मलाही भरोसा पटत नव्हता.
एकूण हे सगळं अनुभव घेणं मला समृद्ध करून गेलं होतं. मी आता माझी बॅग कंबरेला आटकवून डोंगराच्या दिशेने असलेल्या खाचखळग्याच्या वाटा पार करत डोंगरमाथा जवळ करत होतो. मला कधी एकदा या वाटा पार करून मी डोंगराच्या माथ्यावर असलेल्या ढगात हरवून जातो असं झालं होतं.
रात्रभर पाऊस पडून गेल्याने डोंगराकडे घेऊन जाणाऱ्या वाटा निसरड्या झाल्या होत्या. या वाटेवरून चालणं आता एक दिव्य वाटत होतं; पण एक थ्रील अनुभवायचं म्हणून ही दोन दिवसांची सैर मी केली होती अन् यामध्ये मी बऱ्यापैकी यशस्वी झालो होतो.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे