कैवल्यगान...!

युवा लेख

युवा विवेक    30-Jul-2023   
Total Views |

कैवल्यगान...!

कंठात आर्त ओळी

डोळ्यात प्राण आले...

आता समेवरी हे

कैवल्यगान आले...

किती आणि काय काय लिहावं या शब्दांबद्दल, संगीताबद्दल आणि गाण्याबद्दल? हे कैवल्यगान म्हणजे खरोखरंच, कैवल्यरसाची एक उत्कट सांगितीक अनुभूतीच!! कंठातील आर्त ओळींची अनुभूती गाण्याच्या सामर्थ्यातून प्रत्ययास येतेच आणि समेवर कैवल्यगान आल्याची आर्त उत्कट चाहूल, त्याचे अस्फुट स्पर्श, कुठेतरी श्रोत्याच्या मनालाही जाणवतातच!

मुळात, कोणतंही गाणं म्हणजे, गीतकार, संगीतकार आणि गायकाच्या प्रतिभांचा त्रिवेणी संगम असतो आणि जेव्हा हे तीनही प्रवाह आपापल्या शुद्ध आर्ततेनिशी, सामर्थ्यानिशी एकत्र येतात, तेव्हा घडतं, 'कैवल्यगान'!

स्वरांच्या चरणांवर माथा टेकवून, आपली अबोल गाथा अर्पून जातानाचे ते क्षण प्रेक्षकांना आतून हेलावून जातात. ती गाण्यातून अभिव्यक्त झालेली भावोत्कटता, प्रत्येकाला देऊन जाते तृप्तीचे नवनवे कोवळे अनुभव. शेवटी, स्वरांच्या चरणांवर आपली गाथा, आपलं सर्वस्व अर्पून टाकण्यासाठी लागतं ते सामर्थ्य, स्वरसाधनेतून प्राप्त झालेलं, तेव्हाच तर दोलायमान होतो ऐहिकाचा भवताल!!

वाटतं की, संपूर्ण समर्पण वृत्तीने जन्मभर केलेल्या या स्वरसाधनेचं फलित म्हणूनच तर पैलावरुन अनाहताचा शाश्वत नाद कानी येतो आणि थेट जवळचा वाटू लागतो! तेव्हा कित्तीतरी युगांचं संचित एका क्षणात मिळून जातं. तेव्हाच तर जाणीव होते की, या मैफिलीत तू आणि मी कुणीच नाही!! अवघे ताल, स्वर, लय शून्यात एक होतात आणि प्रसाद म्हणून उरते ती फक्त पूर्णावस्था!

कुणालाही हेवा वाटावा या क्षणाचा... इतका अलौकिकच आहे हा क्षण आणि त्याची चिमुट अचूकपणे पकडून योजलेले शब्दही... तो परिपाकच आहे जन्मभर अविरतपणे केलेल्या अथक धडपडीचा, अखंड साधनेचा...

अशा अलौकिक क्षणी, सारं काही अर्पून, ईश्वराला तिहाई घेण्याचे केलेलं आर्जव, किती मार्मिकतेने सांगून जातात त्यांची कृतार्थता. तेव्हा, त्या क्षणी, अवघे जन्म सार्थकी लागल्याची सखोल जाणीव, कृतार्थता, जागी झाली असेल त्यांच्या मनात... आणि तिहाईचाही अपूर्व सोहळा झाला असेल! हे शब्द, गाणं, ऐकून प्रत्येकाच्या मनात जाग्या होणाऱ्या प्रसन्नतेला, उत्कटतेला भाषेत शब्द नाहीच!

एखाद्या विलक्षण अनुभवाची चिमुट पकडावी आणि ती नेमक्या शब्दांत व्यक्त करावी तशीच वैभव जोशींनी ही रचना केलीय आणि तितक्याच आर्ततेने, ते भाव, अनुभव, त्या गाण्यामागचं सारं संचित जागं करत, राहुल देशपांडेंनी तितक्याच सामर्थ्यानं ती गायली आहे!! म्हणूनच तर ही भारावणारी आणि सर्वार्थाने समृद्ध करणारी अद्वितीय कलाकृती झाली आहे.

तेव्हा वाटतं, गाण्यातच वर्णिल्याप्रमाणे,

आपणही टेकवावा माथा, या शब्दांसमोर, गाण्यासमोर... कदाचित त्यातूनच आपला पुढला शब्द अधिक सशक्त होईल, अनाहताशी आपलं नातं सांगूनही अधिक कोवळा होईल!

- पार्थ जोशी