दगडफोड्या संतू अन् नागूचं जगण…! भाग - १

युवा कथा

युवा विवेक    26-Jul-2023   
Total Views |

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगण…सूर्य अस्ताला गेला, पिवळी उन्हं तांबडं फुटल्यागत दिसू लागली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर झोपडीच्या चहूबाजूंनी पसरलेला दगडाला टाके द्यायला लागणारं साहित्य छनी, हातोड्याला अन् इतर वस्तू नागू जमवू लागला होता.

टाके द्यायची छनी, हातोडी त्यानं पाण्यात हीसळली अन् एक टोपल्यात टाकली. गणाबाईनं अंगणा मोहरच्या पडसावलीतल्या अंगणाला सगळं शेणानं सारून माखून घेतलं होतं. झोपडीच्या पुढे झोपडीला शोभेल अशी टिपक्या टीपक्याची रांगोळी तिने काढली होती.

सांज जशी कलायला लागली तसं नागूनं सारा बाडबिस्तरा सावरत दगडात दिवसभर घडवलेली वऱ्हाटे, पाटे, उक्खळ, खलबत्ते, देवळामध्ये ठेवला जाणारा दगडी दिवा सगळं एक मोहरं लावले. अन् तो शेजारच्या झोपड्यात असलेल्या संतू घिसाड्याशी गप्पा मारायला गेला.

संतू घिसाडी पेताड असल्या कारणानं दिवसभर बायकोने डोक्यावर गाव गाव हिंडून वऱ्हाटे, पाटे विकून जमवलेला पैसा संतू त्याच्या बायकोला मागत होता. दोघात दुपारपासून कल्ला चालू होता, नागूला बघताच संतूची बाई नजर हिरमुसल्यासारखी करून झोपडीच्या असलेल्या पडद्याआड गेली अन् हमसून हमसून रडायला लागली; पण नशिबाला आलं त्याला कोण काय करणार.

नागूला बघून संतू स्वतःला सावरत चेहऱ्यावरील भाव बदलत चेहऱ्यावर बळजबरीचं हसण्याचा आव आणत संतू नागूकडे नजर चुकवत बघू लागला अन् जिभेला सावरत एकएक शब्द पुटपुट करू लागला.

“अरे नागू कवशिक आलासा रं?”

नागू बोलता झाला, “हे काय येऊच रहायलो, तुझ्या बायकोचा अन् तुझा भांडण करण्याचा कल्ला ऐकून आलोसा म्हंटल संतूची बायको काहून केकलायली..!”

तितक्यात संतू बोलला, “हम्म..! नायतर काय रं, भाडीची वऱ्हाटे, पाटे विकून आलीय अन् पैका मागितला तर द्यायना झालीया मग दिलं मुस्कटात.”

नागू त्यांच्याकडे बघत नजरेनं त्याला वरखाली न्याहाळू लागला बोलू लागला.

“भाडीच्या ती नव्हं तू हायसा... ती बिचारी अनवाणी पायांनी भर पहाटच्याला झोपडी सोडून डोईवर वऱ्हाटे, पाटे घेऊन गाव पालथं घालतिया. लोकांनी दिलेल्या भाकर तुकड्यावर दिवसभर गुजराण करतीया अन् तू काय आयतं बसून तिच्या जीवावर वरून तिला पैकं मागून रुबाब झाडतूया दळभद्रा कुठलासा...”

संतू खरेपणाचा आव आणत बोलू लागला, “बारंग्या बारबाप्या तुला रं लई माझ्या बायकोची लागलीया. बरं तू म्हणतू त्ये पण बरोबर हायसा. पण मग मी दिवसभर उन्हातान्हाचं दिवसभर खदानीत मपली माय घालत दगड फोडतो ती शिंगरावरून चढवून झोपडी लग आणतो. त्याला टाके पाडून सोयीचं करतू आकार देतू त्याचं काय रं मर्दा, बोल की... अन् तू पण हेच करतुया की पण तुला प्यायला लागत नाय अन् मला पहाटच्या पहाट प्यायला लागतीया..!”

नागू चेहऱ्यावर भोळा भाव आणत बोलू लागतो, “तुझं समदं खरं हायसा लेका. पण; कसं अस्तया तिला वाटतंया पैकाला पैका लावावा भरपदरी पैसा जमल्यावर दोन डाग अंगावर घालण्यात म्हणून दिवसभर फिरत अस्ती ती अनवाणी.”

संतू दात कोरत बोलू लागला, “हावरे नागू तुझं भी सबुत खरं हायसा; पण पैका अन् सोन्याचांदीचे डाग काय मड्यावर न्यायची हायसा का..?

नागू बोलू लागला, “नाय रं लेका मड्यावर कोण नेतूया. जो तू मी नेतूया. पण वाईट वखताला अडीअडचणीला डाग मोडतोड व्हत्यात बाकी म्या काय बोलावं तू लागून झालेला तरणा बांड हायसा संसार करायची रीत येईल तुझ्यापण अंग वळणीला.”

संतू अण्णा नागूच्या गप्पा होऊस्तोवर दिवस अंधारून आला होता. संतू-नागू आता झोपडी महोरं टाकलेल्या खाटेवर बसून गावा पहुतर असलेल्या खदानीबद्दल बोलू लागली होती. खदानीचा दगड काम करण्यालायक हाय का नाय याची दोघांत विचारपूस सुरू झाली होती.

संतूच्या बायना चुल्हीवर भाजलेला कांदा, शेंगदाणे घेऊन ती डोक्यावर पदर सावरत बाहेर पाट्यावर वाटण वाटू लागली अन् तिनं वाटता वाटता रानुबाईंची विचारपूस नागूला केली.

क्रमशः

- भारत सोनवणे

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!