किती खुश असतो आपण आपापल्या डबक्यात! डराव डराव करत अगदी आनंदात आणि खरंतर फार फार मोठ्या भ्रमात साजरे करत असतो, आपापल्या संकुचिताचे हवेहवेसे उत्सव. नकोच असतं आपल्याला आपले कोष तोडणं आणि बाहेरचं नवं आणि कदाचित फार फार मोठ उबदार उन्ह.. ते सोसणं तर दूरच, खरं पाहणंही नकोच असतं आपल्याला. आपापल्या डब्यातल्या, डबक्या जवळच्या श्वासांच्या चर्चा करत, त्यांच्याविषयी बरे-वाईट, उत्कट-वरवरचे बोल बोलणं म्हणजे आपण डरकाळी समजतो आपली! आणि समाधानी होतो आपल्या पुरते. कदाचित डबक्यातल्या लोकांमध्येही हुशार होतो फार. पण आपल्याच सीमा उदंड करता याव्यात ठरवून, आणि करताही यावं आयुष्याचं सिमोल्लंघन. कारण विफल चर्चा करत आयुष्यात येतात, श्वास घेतात, जगतात तर लाखो कोट्यावधी लोकं. जगता आलं पाहिजे अर्थपूर्ण! सार्थ जगता येणं यातच तर मजा आहे! तरच अर्थ आहे जन्मामधे आणि कृतार्थ सार्थक आहे शेवटच्या श्वासाचंही. नाहीतर येणं जगणं आणि मरण पावणं निरर्थकपणे कोणीही करूच शकतंच की. त्याला कुठे लागतो काही वेगळा, स्वतःचा विचार.. चिंतन.. मंथन.. वगैरे.
अर्थपूर्ण जगणं म्हणजे नसतं प्रसिद्ध होणं किंवा मोठी लोकमान्यताही नसते. खरं त्याहीपेक्षा मोठं असतं हे. विक्टर फ्रँकल यांनी म्हटल्यानुसार अर्थ शोधतच आपण जगत असतो. कारण आपला अर्थ आपल्या जगण्याचं कारण असतो. तो जितका मोठा तितकं मोठं आपण जगू शकू. जेवढ्या मोठ्या अर्थाने जितकं उदात्त आपण जगू आणि त्यासाठी जितकं उत्कटपणे जगू-झटू तितकंच मोठं होत राहील आपलं यशोरूपी शरीर! आणि लाभतही राहील त्याला चिरंतनाचा वरदान.. वारंवार! दूर तर असतातच अगणित, पण आपापल्या डबक्याबाहेरही असतात फार फार मोठे पर्वत. अनेकानेक क्षेत्रातील साधकांनी उभारलेले त्यांच्या कार्यकर्तृत्वाचची क्षितिजं. असतात विचार चिंतनांचे महापर्वत, व्यापक दृष्टीकोनाचे गाभे. त्यांचं मर्म आपल्यावर बरसवण्यासाठी, आपल्याला त्यात चिंब भिजवण्यासाठी सज्ज असतात घननीळ मेघ त्याही वर.
किमान आपलं डबकं ओलांडून, लक्षात यावी आपल्याला आपली डबक्यातली डरकाळी! भ्रमक! ते पर्वत उलगडता येतील आत, समजतील, कळतील, पचतील,? काय माहित.. पण किमान.. किमान त्यांची उंची पाहण्यासाठी तरी मान वर करता यावी. आस्थेवर उभारलेल्या कुतुहलाने. कळणं तर दूरच पण किमान पाहता यावं त्यांना डोळा भरून, मन भरून. आणि ते न कळूनही जाता यावं आनंदून काही जाणवल्याच्या अनुच्चारित जाणिवेने. आयुष्याचा अर्थ तेव्हाच उमलेल आपोआप, आतूनच. ते पर्वत पाहण्याची शक्ती मागतो आहे.. डबकं ओलांडण्याचं सामर्थ्य भाकतो आहे.. आतही उत्कटता ठेवतो आहे ओली, अखंडपणे.
कुणी सांगावं? उत्तमाचा उदात्त अर्थ उमलून येईल आतूनच. सहजच..
अगदी, पुढच्या क्षणीही!
- पार्थ जोशी