झांबेरी...! भाग - ‌५

युवा लेख

युवा विवेक    19-Jul-2023   
Total Views |


झांबेरी...! भाग - ‌५

माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता; पण त्याचं मन राखावे म्हणून मी हो म्हटले अन् वाटेला लागलो. आतापर्यंत शेतातली लोकं घराच्या दिशेनं परतीच्या वाटेला लागली होती, सूर्य अजून तांबडा-पिवळा होऊन आसमंतात त्याची उपस्थिती दर्शवित होता. बकऱ्याच्या खुरांची धूळ आसमंतात मिळून गेली होती, लोखंडी बैलगाड्या वाटेवर चालत असताना त्यांचा येणारा तो विशिष्ट आवाज कानावर येत होता. मी आता फाट्यावर येऊन विसावलो होतो, अजून अर्ध्या तासात दिवस मावळतीला जाईल असं वाटत होतं.

मनात येऊन गेलं आपण जरी देव मानत नसलो तरी गावच्या इतक्या अख्यायिका लच्छी आईच्या देवळासोबत जुळलेल्या आहे. येणारा प्रत्येक वाटसरू परतीच्या वाटेला लागल्यावर या देवळात देवी चरणी आपला माथा टेकवून जातो. तर आपणही मनात जरी कुठला मनोभाव नसला तरी जाऊन देऊळ बघायला काय हरकत आहे...?

या विचारानं मी फाट्यावर सहज दिसणाऱ्या अन् लगतच असलेल्या लच्छी आईच्या देवळाकडे गेलो. ‘देऊळ’ म्हणावं असं विशेष काही फार तिथं नव्हतं.

पूर्वाश्रमीच्या कुण्या वाटसरूने गावचा निशाणा म्हणून तो दगड ठेवला असावा अन् लोकांनी त्यालाच साडीचोळी घालून, शेंदूर फासून देवी केलं असावं असं मला एकूण लच्छी आईकडे बघून वाटलं; पण माझ्या वाटल्याने काय होणार होतं! मी गेलो देवळात अखंड तेवत राहणारा नंदादीप तेवत होता. देवीच्या पायाशी काल अमावस्या असल्यानं, नैवेद्य म्हणून ठेवलेले बारीक बारीक भाकरीचे चांदके समोरच ठेवले होते. त्याला लागून चिमुट चिमुट साखर अन् शिळणीचा प्रसाद ठेवला होता, त्याला टपोरे मुंगळे लटकलेले होते. एकूण काय तर ते सुखी होते.

मी नको म्हणून तेवढ्यापुरत्या पाया पडलो अन् देवळाच्या बाहेर असलेल्या ओट्यावर येऊन बसून राहिलो. एखाद दुसरं गावात जाणारं कुणी व्यक्ती यायचं अन् ती देवळात असलेली घंटी वाजवून पाया पडून निघून जायची. तिची किणकिण...

मी शेवटपर्यंत हा आवाज कानात भरून घेत बसून राहिलो. एकूण दिवसभराच्या भटकंतीनंतर मिळालेला हा सुखद आराम. त्यामुळे मलाही जरा रिफ्रेश वाटत होतं.

मी बसल्याजागी गावात रानातून येणाऱ्या लोकांना न्याहाळत बसलो होतो. रस्त्यावरून येणाऱ्या काही लोकांचं थोडं विशेष वाटायचं. त्यातली म्हातारी माणसं लच्छी आईच्या देवळासमोर आली की पायातल्या वाहणा काढून रस्त्यावरंच देवळाच्या पाया पडून घेत असत. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघून त्याच्याकडे पाया पडत असत अन् पुन्हा काहीतरी तोंडातच पुटपुटत, वाहणा घालून तिथून घराच्या दिशेनं वाटचाल करत असत.

काय बोलत असतील ही आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणारी माणसं...? असा प्रश्न मला पडून जात होता. उभे आयुष्य कष्टात घालूनही त्यांची देवाकडे कुठली तक्रार नव्हती, त्यांचं सर्व कसं मनोभावे अन् कुठलीही देवाकडे तक्रार न करता हे सर्व चालू होतं.

मी फाट्यावर असलेल्या एका खुण्यावर बसून हे सगळं न्याहाळत होतो अन् काही वेळात बस येईल अन् हा प्रवास संपेल. म्हणून दोन दिवस केलेली भटकंती अन् आता शहर जवळ करायची वेळ आली, तेव्हा मला जरा भरून आलं होतं.

मला हे नेहमीचं होतं. गाव-शहर असं करत मी जगत होतो; पण काही केल्या गावची ओढ मला त्याच्यापासून दूर करत नव्हती. मग असं कधीतरी पोटभरून गाव अनुभवायचा म्हणून गावाला जवळ करून त्याला अनुभवत असे. मग तिथली असंख्य प्रकारची भेटणारी माणसं जी मला नेहमी अनोळखी असूनही मला माझी वाटत असायची, त्यांना भेटलं की मला माझ्या गावातील माझ्या माउलींना भेटलं असं वाटायचं.

गाव रहाटीचं हे जगणं माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देऊन गेलं होतं अन् या कारणाने मी अधिकच संवेदनशील झालेलो होतो.

अखेरीस बस आली, दोन दिवसांचा प्रवास संपला होता. मी बसमध्ये येथून बसणारा एकटाच होतो. वाटत होतं गावातून निरोप देणारं कुणी असायला हवं होतं; पण आज कुणी नव्हतं अन् नकळत मला त्या बकऱ्या चारणाऱ्या बाबांच्या बोलण्याची आठवण झाली की, लच्छी आई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते..!

खरं काय खोटं काय मला माहीत नव्हतं; पण ती देवळातून मला जाताना बघत असावी असं वाटत होतं अन् आता मी बसमधून मनोभावे लच्छी आईचं देऊळ बघत तिचे पाया पडत झांबेरी गाव सोडत होतो.

हळूहळू मी बराच दूर आलो होतो. आता गाव मागे पडला होता. गावच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या, मात्र गावचा डोंगर अन् हिरवी शाल पांघरलेला निसर्ग अजूनही गावाचं दर्शन घडवत होता. काही दहा-पाच मिनिटांत अंधारून आलं, गाडी शहराच्या दिशेनं कूच करत होती. मी दिवसभराच्या भटकंतीचा विचार करत होतो, आजवर केलेल्या भटकंतीमध्ये सर्वाधिक सुख मला या भटकंतीमध्ये भेटलं होतं एक अनामिक समाधानही मनाला भेटलं होतं.

गाव, डोंगरे, निसर्ग, तेथील माणसं मला नेहमी का इतकी जवळची वाटतात? याचं उत्तर मिळालं होतं. आता काही दिवसांसाठी मी शहरात जगण्यासाठी पुन्हा सज्ज होतो. कॉलेज, नोकरी करत असताना असा काही दिवसांचा विसावा मिळाला की सुख काही वेगळं असतं जे एक अनामिक समाधान देऊ करणारं असतं.

हा सगळा विचार करत मी शहरात कधी आलो कळलं नाही. बस थांबली, मी उतरलो अन् पुन्हा एकदा शहराच्या या गर्दीत हरवून गेलो पुढे काही दिवस स्वतःला घडविण्यासाठी...!

समाप्त.

- भारत लक्ष्मण सोनवणे

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!