रात्रभर पाऊस पडून गेल्याने डोंगराकडे जाणाऱ्या वाटा निसरड्या झाल्या होत्या. हे सगळं थ्रील अनुभवत मी डोंगर वाटांचा प्रवास करत डोंगराच्या माथ्यावर येऊन पोहोचलो होतो. डोंगरावरून दिसणारं दृश्य विलोभनीय आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. दूरवर डोंगराच्या उजव्या अंगाला बघितलं, डोळ्यांचे पारणे फेडणारे अन् हिरवा शालू पांघरलेले झांबेरी हे गाव दिसून येत होतं.
संपूर्ण रात्रभर त्या गावात वस्तीला असूनही त्याचं सौंदर्य माझ्या नजरी मला भरता आलं नव्हतं, ते या डोंगरांच्या कुशीत विसावल्यावर मला अनुभवायला भेटत होतं. मी ही आता चालून चालून थकून गेलो असल्यानं दुपारकडे कलणाऱ्या पाराचा अंदाज घेत एका सागाच्या झाडाखाली पाठ लांब करून दिली अन् निपचित डोळे बंद करून आराम करत राहिलो. सकाळपासून रस्त्यानं असलेली चढण चढून आता पाय भरून आले होते. मी झोपल्याजागी माझा थकलेला श्वास अनुभवत निपचित पडून होतो.
दुपारच्या सूर्यकिरणांची तिरीप सागाच्या पानांच्या आडून डोळ्यांवर आली अन् मी जरासा आळस देतच उठलो. शहराला कॉलेज, नोकरी करायला लागलो तसे हे भटकंतीचं खूळ कमी झालं होतं. त्यामुळे फिरण्याची सवय बऱ्यापैकी मोडली होती अन् आता माझी एकूण झालेली अवस्था वाईट होती.
उठलो अन् कितीवेळ डोंगरावरील झाडांचा गारवा अनुभवत बसून राहिलो, छान वाटत होतं. अधूनमधून पक्ष्यांचा आवाज कानी पडत होता, अरण्यात असलेल्या छोट्या झऱ्यांना पाणी आलं होतं अन् ते ही शांतपणे वाहू लागले होते.
त्यांचा वाहण्याचा आवाज माझ्यापर्यंत येत होता. नकळत वाऱ्यामुळे हवेची झुळूक माझ्या अंगाला स्पर्श करून जात होती अन् सर्व अंग कसं शहारून आल्यासारखं मला वाटतं होतं.
बराचवेळ आराम करून झाला, आता परतीच्या वाटेवर निघायला हवं होतं. कारण डोंगर उतरून झांबेरी फाट्यावर पायी जायचं होतं अन् तिथून एसटी महामंडळाची लालपरी पकडून शहर जवळ करायचं होतं.
मी उठलो वाहत्या झऱ्याच्या पाण्यात तोंड धुवून पोटभर पाणी पिऊन घेतलं, बॅग अटकवून मी परतीच्या वाटेला लागलो. सटकती झालेली वाट आता दुपारच्या पडलेल्या कोवळ्या उन्हामुळे छान कोरडी झाली होती. त्यामुळे फारसा त्रास चालायला होत नव्हता, मी निसर्ग न्याहाळत मनाशी स्वगत करत चालत होतो.
अखेर झांबेरी फाट्याच्या जवळ अन् डोंगराच्या पायथ्याशी आलो. तेव्हा मला एक बकऱ्या चारणारे आजोबा भेटले ते त्यांच्या बकऱ्याना चारत झांबेरी गावच्या दिशेनं निघाले होते.
माझा एकूण शहरी अवतार बघून ते मला बोलू लागले,
“कुठलं हायसा बाबू..?”
ते मला बाबू म्हणाले याचं मला हसू आलं.
मी हसतच त्यांना म्हंटले, “बाबू शहराकडचा आहे, आलो होतो कालच्याला डोंगुर जवळ करायला निसर्ग हिंडायला. काल रातच्याला पाऊस झाला म्हणून झांबेरीलाच परावरच्या देऊळात मुक्काम झाला होता. म्हणून आता खबरदारी घेऊन आज लवकरच शहराची वाट जवळ करतू आहे”.
आजोबा बोलू लागले, “कसा झाला मग सफर आमच्या झांबेरीचा..?”
मी बोलू लागलो, “सफर काय झ्याक झाला, कालच्याला जरा राती आभळ झाली. पण आज मोप भटकंती केली अन् झांबेरीच्या डोंगराचं गोजिरवाणे रूपही बघून घेतलं. बाबू एकूण छान हाय तुमचा! हा परिसर बारा महिने बकऱ्या घेऊन या डोंगरात फिरता तुम्ही यापेक्षा सुख काय असावं आयुष्यात.” मी त्यांना बोलता बोलता बोलून गेलो.
सोबतच मी पण त्यांना बाबू बोललो त्यामुळं त्यांच्या बोळक्या तोंडातून खूप सुंदर हास्य बाहेर पडले अन् आम्ही हातात हात घेऊन एका मोठ्या दगडावर बसून राहिलो.
पुढे बऱ्याच गप्पा झाल्या. त्यांच्या उभ्या आयुष्याची कहाणी त्यांनी माझ्यासमोर मांडली अन् मी पण माझं सगळं आयुष्य खुल्या मनाने त्यांच्यासमोर मांडले. लपवायला हवं असं त्या माणसासाठी माझ्याकडे काही नव्हतं, इतका खुल्या दिलाचा तो आजोबा होता.
बराच वेळ बसल्यावर दोन-चारशे मीटर दूर असलेला फाटा जवळ करायला हवा, म्हणून मी आजोबांचा हातात हात घेऊन ‘येतूया बाबू’ म्हणून निघालो. त्यांनी वाटेला लागलो, तेव्हा सांगितलं की, “फाट्यावर एक लच्छी आईचं देऊळ आहे त्याच्या पाय पडून घे, झांबेरी गावचं ग्रामदैवत हायसा ते. गावात येणारा हर एक नागरिक परतीच्या वाटेला लागला की ते देऊळ जवळ करतो अन् त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होता.”, असं बाबू मला सांगत होता.
क्रमशः
- भारत लक्ष्मण सोनवणे