एकूण भर दुपारच्या असह्य उन्हांच्या झळा सोसत गाव जवळ केला की हे असं वातावरण गावभरात दिसून येतं. मग नकळत आपलं लहानपण आपल्याला आठवून जातं. मग भर दुपारच्या उन्हात बारा वाजेची शाळा सुटली की, घरला येऊन जेवण करून पारावर झाडांच्या सावलीत मुलांचे घोळक्यात बसून सुरू असलेले बैठे खेळ, सुरपारंब्या हे सगळं आठवून जातं. आपलं जगणं, आपलं बालपण किती समृध्द होतं यांची जाणीव होते.
अशावेळी मग आपणही पारावर बसून रहावं, डोळ्यात भरून घ्यावं हे क्षणिक सुख, पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला नजरेत भरून घेत रहावं. नदीचं संथपणे वाहणं मला माझ्या आयुष्यात आलेल्या संथपणाची, हळुवारपणाची आठवण करून देत असतं. मग या प्रवाहाला न्याहाळत कित्येकदा आयुष्याच्या गणिताला जुळवून बघितल्या जातात, आयुष्याला घेऊन पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधली जातात.
दुपारच्याभरी नदीच्या पाण्यात मासे पकडणारा मच्छिमार असो किंवा देवळात देवाचं नामस्मरण करणारे ते आजोबा. हे मग मला एकच जीव असल्याचा भास होतो. नदीच्या तीरावर असलेल्या गुलमोहरच्या झाडावर असलेला पक्ष्यांचा किलबिलाट, पान गळतीचा मोसम असल्यानं झाडांवरील पानांची होणारी पानगळ बघितली. जितक्या सहज एखादं पान झाडावरून गळून पडत आहे, तितक्याच सहज या देवळात असलेल्या माझ्या आजोबांच्या मधील एखाद्या आजोबांच्या आयुष्याचा शेवट होतांना मी बघितला आहे, जो खूप वेदनादायी आहे. त्यामुळे जितकी ही दुपार मला हवीहवीशी वाटते तितकीच ती जिव्हारी लागणारीही वाटते.
मग कधीतरी अंगावर येणारी दुपार, गावात घरोघर ओट्यावर झोपलेल्या म्हाताऱ्या, घरासमोरच्या पटांगणात आता वाळवणाचे दिवस सरायला आल्यानं वाळू घातलेली वाळवणं, भकास वाहणारा वारा, संथपणे वाहणारं नदीचं पाणी, देऊळ कडी-कुलपात बंद असूनही देवळात झोपलेली माझी माऊली, पारावर गप्पा झोडून दमलेले मायबाप शांत पहुडले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान, बेवारशी पडलेल्या त्यांच्या वाहणा अन् भटकणारे भटके कुत्रे अन् आयुष्याला घेऊन पडलेले कित्येक प्रश्न.
झांबेरी गाव म्हटलं, की नावाप्रमाणे अनोखं अन् निवांतपण देऊ करणारं हे गाव. पहिल्याच भेटीत या गावाच्या प्रेमात पडलो. माझं गाव आठवतं, माझ्या गावातल्या माझ्या माऊलींना मग इथे असणाऱ्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या आजी-आजोबांमध्ये शोधून लागलो.
गावकुसाच्या या कथा लिहायला घेतलं की, आदी हे असं डोळ्यांनी गाव भटकून होतं अन् तितकंच ते मनाच्या आत रिचवून होतं. मग हळुवार उलगडत जातात गावातल्या असंख्य कथा... सायंकाळ होऊन गेली, दिवसभर गावाची भटकंती झाली अन् मनात विचार येऊन गेला की आजची रात्र विसाव्याला झांबेरी गावात मुक्काम करावा अन् पहाटेच या डोंगररांगा अन् त्यात असलेल्या पाऊलवाटा जवळ करून शहराची वाट जवळ करायला घेऊ या.
झांबेरी वीस पंचवीस उंबरे असलेलं गाव. गाव डोंगररांगांच्या कुशीत जाऊन विसावेलेलं असल्यानं गाव आधुनिक किंवा आपल्या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर उभं राहिलं. अशा गावात कोणत्याच खुणा नव्हत्या. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला घेऊन मी काळोखाच्या दिशेनं आजची रात्र गावात निवाऱ्याला जागा शोधत होतो.
गावकुसाची लोकं डोंगरातील दऱ्या, नाल्याखोल्यातून पकडून आणलेल्या खेकडे, मासे, विविध झाडांची कंदमुळे, फळं घेऊन गावं जवळ करत होती.
मी गावात नवखा भासत असल्यानं गावातली लोकं मला रोखून पाहत होती. रात्र ढळून अंधारून आलं; पण अजून रात्रीच्या निवाऱ्याला गावात जागा भेटली नव्हती. बरसदीच्या दिवसांना पंधरदी सरली की सुरू होणार होतीच; पण इथले दमट अन् वेळोवेळी बदलणारे वातावरण म्हणून की काय गावावर काळ्या ढगांचे साम्राज्य निर्माण झाले होते.
पार आठ वाजेकडे कलला होता अन् बरसदीच्या दिवसात जशा पावसाच्या सडका पडाव्या तशा आता पडू लागल्या होत्या. वीस-पंचवीस उंबरे असलेलं झांबेरी हे गाव ढगांच्या आडून आलेल्या काळोखात गुप्त व्हावं तसं शांत पहुडले होते. झोपडीवजा असलेली, पाचटांचं छप्पर असलेली ही घरं त्यांचावर पडणारं पाऊसाचं पाणी अलगदपणे ओघळत पायवाटा भेदून अख्ख्या गावात फिरत होतं.
मी डोक्यावर गोणपाट घेऊन दूरवर चमकत असलेल्या एका मशालीच्या उजेडाकडे गेलो. हळुवार वाटणारा पाऊस अन् रानात असणारी झाडं यांच्यामुळे हवेत असलेला वारा, बिघडलेले वातावरण यामुळे अजूनच हे सगळं मोसमात आलं होतं. काळोखात खाच खळग्याची वाट चालत मी तो प्रकाश जवळ केला अन् एका झोपडीवजा घरात जाऊन बसून राहिलो पूर्णपणे भिजलो होतो.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे