सन २०१४ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होऊन संविधानात्मक मार्गाने सत्तांतर झाले. त्या निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक म्हणावा असा होता. कारण काँग्रेससारख्या मुख्य पक्षाने स्वातंत्र्यानंतरची सर्वात कमी सदस्यसंख्या निवडून आणली होती. त्यानंतर २०१९ ला त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. मोदी सरकार बहुमताने सत्तेत कायम राहिले आणि सध्याची विरोधी पक्षांची एकंदर दयनीय अवस्था पाहता सन २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी खूप खडतर प्रयत्न करावे लागतील असे दिसून येत आहे.
एरवी "ट्रेण्ड आणि फॅशनच्या" प्रवाहात स्वत:मध्ये बदल घडवणाऱ्या बॉलिवूडलासुद्धा हा बदलता राजकीय घटनाक्रम स्वीकारणे क्रमप्राप्त होते. देशाच्या सत्तास्थानी हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे, ही बाब ध्यानी आल्याने त्याचा प्रभाव देशभरात तयार होणाऱ्या सिनेमांमधून पण दिसू लागला.
एस.एस. राजामौलीचा बाहुबली ह्या सर्वांचे प्रातिनिधिक रूप म्हणून सांगता येईल. बाहुबली सिनेमात माहिष्मतीचे राष्ट्रगीतच मुळी संस्कृत भाषेमध्ये होते. “माहिष्मती साम्राज्यम अस्माकम अजेयम” असं ‘ओघवत्या आणि सुलभ’ संस्कृतमध्ये ऐकणे हा सुंदर अनुभव होता. त्यात राजामौलीने ते ज्या ग्रँड स्केलवर दाखवलं तो अनुभवदेखील निराळाच होता. भव्य शिवलिंग खांद्यावर उचलून घेणारा शिवभक्त नायक किंवा नेमात दाखविण्यात येणारा राज्याभिषेक ह्यातून प्राचिन विजयनगर, वारंगल, चालुक्य इ. राजसत्तांचा गौरवशाली इतिहासच जणू अधोरेखित केला गेला होता. बॉलिवूडची संभावना आजवर उर्दुवुड म्हणून होत होती. त्यामुळे देशाच्या सत्तांतरानंतर सिनेमाच्या विषयांसह भाषेत देखील फरक पडल्याचे दिसू लागले.
दरम्यान मधल्या काळात बॉलिवूडमध्ये सुशांतसिंग राजपुतचे आत्महत्या प्रकरण उद्भवले आणि सर्व देशभर गदारोळ झाला. चोहीबाजूंनी हिंदी सिनेसृष्टीवर टीकेचा भडिमार सुरू झाला. बॉलिवूडची घराणेशाही, ड्रग्स व इतर अंमलीपदार्थांच्या व्यवहारात अडकलेले सेलिब्रिटी, गुन्हेगारी जगताचा पैसा ह्यामुळे हिंदी सिनेसृष्टी बदनाम झाली होती. त्याचा फायदा देशातील इतर प्रादेशिक सिनेमांनी घेतला.
तेलगू, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, इ. सर्व सिनेमांनी आपल्या मुळांशी प्रामाणिक राहत सिनेनिर्मिती केल्याने प्रेक्षक बॉलिवूडपासून दुरावले आणि प्रादेशिक सिनेमाकडे ओढले गेले.
RRR, KGF, कांतारा सारखे दाक्षिणात्य चित्रपट गर्दी खेचू लागले, तर हेलारो सारखा गुजराती चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाद मिळवू लागला. मराठी चित्रपटातसुद्धा हिंदवी स्वराज्याचे वारे वाहू लागले.
सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, गश्मिर महाजनी, प्रसाद ओक, अमोल कोल्हे सारखे मुख्य अभिनेते शिवरायांच्या एकेक कथेवर चित्रपट काढू लागले. तर ताराराणी, हंबीरराव, हिरकणी, रावरंभा असे त्याच काळातील इतर ऐतिहासिक अथवा काल्पनिक पात्र देखील कथेच्या केंद्रस्थानी येऊ लागले. धर्मवीर, ठाकरे ह्यांसारखे हिंदुत्ववादी नेत्यांच्या आयुष्यावर बायोपिकदेखील येऊ लागले.
हा बदल केवळ ऐतिहासिक किंवा बायोपिकपुरता मर्यादित न राहता राजकीय कथानकाच्या सिनेमांवर पण दिसू लागला. ह्याच काळात दि एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, काश्मिर फाईल्स, ताश्कंद फाईल्ससारखे सिनेमे येऊ लागले.
अजय देवगण तानाजी, शिवाय, भोला सारखे चित्रपट करू लागला तर रणबीर कपूर ब्रह्मास्त्र सारखे सिनेमे करू लागला. रणवीर सिंगने बाजीराव-मस्तानीमध्ये सुद्धा "हिंदू स्वराज" सारखे संवाद उघड उघड उच्चारले होते.
यासर्वात आघाडीवर जर कोणाचे नाव असेल तर अक्षयकुमारचे! गेल्या काही वर्षात टॉयलेट - एक प्रेम कथा, पॅडमॅन असे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या मोदी सरकार प्रणित उपक्रमांवर आधारित सामाजिक विषयांवरचे सिनेमे त्याने केले असून केसरी, बेबी, एअरलिफ्ट, रुस्तम, गोल्ड असे देशभक्तीची झालर असलेले सिनेमेसुद्धा अक्षयकुमारने केले आहे. (इतके की आता त्याला "आधुनिक मनोजकुमार किंवा नवा भारतकुमार" म्हटले जात आहे.)
असे असून देखील नुकत्याच रिलीज झालेल्या आदिपुरुष सिनेमांवर प्रेक्षक - समिक्षकांसह जुन्या जाणत्या अभिनेत्यांनी पण जोरदार आगपाखड केली. तब्बल ६०० कोटी रुपये खर्चुन सुद्धा रामायणाचा मुख्य गाभा न पकडता केवळ हॉलिवूडपटांची उसनवारी करत केलेले VFX दृश्य, चीड आणणारे संवाद, चित्रविचित्र वेशभूषा, कथेशी सुसंगत नसणारे सेट्स अशा अनेक कारणांनी दिग्दर्शक ओम राऊत आणि टीमवर टीकेचा भडिमार झाला आहे.
खरंतर येत्या काळात अयोध्येतील राममंदिराच्या पूर्णत्वाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट ऐतिहासिक ठरला असता. १९८७ साली रामानंद सागर ह्यांनी निर्मिलेल्या रामायण मालिकेच्या यशाची पुनरावृत्ती करणे सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता सहज शक्य होते. पण ओम राऊत, मनोज मुंतशिर व एकंदर सगळ्याच आदिपुरूषने टीमने चांगली संधी गमावली असेच म्हणावे लागले.
या साऱ्या घटनाक्रमाकडे पाहता "आम्हाला गृहीत धरून काहीही माथी मारू नका" हा संदेशच जणू प्रेक्षकांनी अप्रत्यक्षरित्या दिलेला दिसत आहे. केवळ आदिपुरुषच नव्हे तर पानिपत, पृथ्वीराज, मनिकर्णिका ह्या साऱ्यांचा पूर्वानुभव हाच आहे. देशभक्तीचे आणि राष्ट्रवादी विचारांचे वातावरण असले तरी त्याला कुठवर मर्यादा हवी ह्याची जाणिव मर्यादा पुरुषोत्तमाच्या सिनेमाने करून दिली आहे. एक कलाकृती म्हणून लोकांसमोर मांडताना देवादिकांच्या चरित्राचे पावित्र्य राखा, कथेच्या आशयाशी एकनिष्ठ रहा, प्रयोगशीलतेला पण जनभावनेचे कोंदण असू द्या, हाच संदेश प्रेक्षकांनी दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांना गृहीत धरण्याचा बॉलिवूडचा भ्रमाचा भोपळा फुटेल ही आशा बाळगू या.
- सौरभ रत्नपारखी